केंद्र सरकारकडून दैनंदिन वापराच्या २०० वस्तूंवरील करात सूट

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

४० लाख रूपयांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या कंपन्यांना जीएसटीतून सूट देण्यात येत असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे. याआधी ही मर्यादा २० लाख रूपये होती. 

नवी दिल्ली: दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील करआकारणीतील वस्तू व सेवा कराबाबत (जीएसटी) केंद्र सरकारने करदात्यांना मोठी सूट देण्याची घोषणा केली आहे. डोक्‍याचे तेल, टूथपेस्ट, साबण यासारख्या गोष्टींवर जीएसटीपूर्वी लावला जाणारा कर २९.३ टक्‍क्‍यांवरून १८ टक्‍क्‍यांपर्यंत घटविण्यात आलेला आहे, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ४० लाख रूपयांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या कंपन्यांना जीएसटीतून सूट देण्यात येत असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे. याआधी ही मर्यादा २० लाख रूपये होती. 

१ जुलै २०१७ रोजी ‘जीएसटी’च्या ऐतिहासिक करसुधारणेवेळी नरेंद्र मोदी सरकारमध्ये अर्थमंत्रिपद सांभाळणारे भाजप नेते अरूण जेटली यांच्या पहिल्या पुण्यतिथीदिनी अर्थ मंत्रालयाच्यावतीने ‘जीएसटी’बाबतची ही माहिती दिण्यात आली आहे. 

दैनंदिन जीवनात गरजेच्या अशा २३० वस्तू याआधी जीएसटीतील सर्वाधिक २८ टक्के कर टप्प्यात येत होता. आता त्यातील चैनीच्या व प्रकृतीला हानीकारक वस्तू वगळता तब्बल २०० वस्तू २८ टक्के कराच्या स्लॅबमधून बाहेर काढण्यात आल्याचेही अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. यामुळे जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरवाढीतून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. बांधकाम क्षेत्र ५ टक्‍क्‍यांच्या स्लॅबमध्ये येते. मात्र कमी दरांतील घरांवरील जीएसटीही १ टक्‍क्‍यांवर आणण्यात आला आहे. जीएसटी लागू होण्याआधी करदात्यांना मूल्यवर्धित कर (व्हॅट), उत्पादन शुल्क व विक्रीकर द्यावा लागत असे. त्याचा एकत्रित मानक दर ३१ टक्‍क्‍यांपर्यंत जाऊन वस्तूंच्या किमतींमध्येही साहजिकच वाढ होत असेल. 

जीएसटीच्या अंमलबजावणीत व जीएसटी परिषदेतील एकवाक्‍यतेने झालेल्या अनेक दूरगामी निर्णयांत दिवंगत अरूण जेटली यांना मोलाचा वाटा होता. देशाच्या इतिहासात भारतीय करप्रणालीतील सर्वांत मुलभूत व ऐतिहासिक करसुधारणा म्हणून जीएसटीचा उल्लेख केला जाईल, असेही अर्थ मंत्रालयाने
म्हटले आहे. 

मंत्रालयाचे म्हणणे

  • नवीन करप्रणाली ही उत्पादक व करदाते (ग्राहक) या दोघांसाठी अनुकूल कररचनेत शिस्त आली आहे 
  • नवीन करप्रणालीमुळे करदात्यांची संख्या वाढली
  • दैनंदिन वापराच्या बहुतांश वस्तूंची करआकारणी ० ते ५ टक्‍क्‍यांमध्येच ठेवण्यात आली आहे. 
  • ३२ इंची टीव्ही संच फ्रिज, वॉशिंग मशीन, व्हॅक्युम क्‍लीनर, मिक्‍सर, ज्यूस काढण्याचे यंत्र, दाढी करण्याचे ट्रीमर, हेयर क्‍लिपर आदी अनेक वस्तूही आता १८ टक्के जीएसटी कराच्या परिघात

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या