टीसीएसमध्ये ४० हजार जणांची भरती शक्य

PTI
मंगळवार, 14 जुलै 2020

गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही प्रक्रिया सुरू ठेवणार; अमेरिकेच्या निर्णयावर नाराजी

नवी दिल्ली

कोरोना संसर्ग आणि लॉकडाउनमुळे उत्पन्नात घट होत असल्याने बहुतांश कंपन्या वेतन आणि कर्मचारी कपातवर भर देत आहेत. अशा स्थितीत टाटा कन्सल्टंसी सर्व्हिस म्हणजेच टीसीएस कंपनीकडून तरुणांची भरती सुरू राहण्याची शक्यता आहे. जागतिक महामारीमुळे शेवटच्या तिमाहीत नफ्यात घट होऊनही टीसीएस कंपनीकडून भरती सुरू ठेवण्यात येणार आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच याहीवर्षी ४०, ००० ते ४४, ००० फ्रेशरना घेण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी व्यवसायात वाढ होईल, अशी आशा टीसीएस कंपनीने वर्तविली आहे.
कंपनीचे इव्हीपी आणि ग्लोबल हेड ह्यूमन रिसोर्सेसचे मिलिंद लक्कड यांच्या मते, टीसीएस कंपनी तरुणांच्या संपर्कात आहे. त्यांच्या शैक्षणिक वर्षात विलंब झाल्याने ते कंपनीत रुजू होऊ शकलेले नाहीत. परिणामी त्यांच्या भरती प्रक्रियेला उशिर होत आहे. टीसीएसचे सीइओ राजेश गोपीनाथन म्हणले की, सध्या टीसीएसमध्ये समान दर्जा आणि वेतन असलेल्या पदांवरील भरती होत आहे. त्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. अर्थात ही भरती कोणत्या क्षेत्रात होणार आहे, हे मात्र सांगितले नाही. सर्वसाधारणपणे टीसीएसकडून दरवर्षी मार्च महिन्यात भरती सुरू केली जाते. परंतु यावर्षी कोरोना संसर्ग आणि लॉकडाउन सुरू झाल्याने भरती प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. लॉकडाउनमुळे रखडलेली भरती जुलै महिन्यापासून सुरू होऊ शकते, अशी शक्यता आहे. आकडेवारीचे आकलन केल्यास, जून तिमाही अखेरीस टीसीएसमध्ये एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ४ लाख ४३ हजार राहिली आहे. कोरोनाचे वातावरण असले तरी टीसीएसच्या धोरणात कोणताही बदल झालेला नसल्याचे लक्कड यांनी सांगितले आहे. टीसीएसने तिमाहीचे निकाल जाहीर केले असून त्यात निव्वळ नफा हा दरवर्षाच्या आधारावर जून तिमाहीच्या आसपास १४ टक्क्यांनी घसरून ७००८ कोटी रुपये राहिला आहे.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय दुर्देवी
एच वन बी आणि एल वन व्हीसावर बंदी घातल्याने टीसीएस कंपनीने अमेरिकेत कॅम्पस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून २ हजार जणांना घेण्याची शक्यता आहे. टीसीएस कंपनीकडून अभियंत्याची भरती करण्याबरोबरच बिझनेस स्कूलमधील विद्यार्थ्यांना देखील घेतले जाते. २०१४ पासून आतापर्यंत २० हजाराहून अधिक अमेरिकी तरुणांची भरती केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसावर घातलेली बंदी अन्यायकारक आहे, असे मत मिलिंद लक्कड यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाचा प्रभाव हा तात्पुरता असणार आहे. टीसीएसमधील कर्मचारी मोठ्या बँका, रिटेलर्स, टेलिकॉम आणि प्रत्येक क्षेत्रात सहकार्य करतात आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत योगदान देतात. त्यामुळे ट्रम्प यांचा निर्णय दुर्देवी आहे.

शंभराहून अधिक अनुभवी कर्मचाऱ्यांची भरती
भारतात गेल्यावर्षी ४० हजाराहून अधिकांना रोजगार दिला होता. यावर्षी जुलैच्या मध्यापर्यंत फ्रेशर मंडळी रुजू होतील. ४० हजारापैकी ८७ टक्के कर्मचारी ऑनलाइनच्या माध्यमातून सक्रिय झालेले आहेत. सुमारे ८ हजाराहून अधिक तरुण मुलांनी कंपनीत रुजू होण्यापूर्वी डिजिटल सर्टिफिकेट अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. याशिवाय विविध पदांवर शंभराहून अधिक अनुभवी कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ही संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत असून नसल्यासारखी आहे.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या