वाहनचालकांनो सावधान! टोल भरताना फास्टॅग नसल्यास भरावा लागणार भुर्दंड

दैनिक गोमन्तक
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

राष्ट्रीय महामार्गांवरील टोल भरण्यासाठीचे व्यवहार हे 15 फेब्रुवारीपासून संपूर्णपणे डिजिटल होणार आहेत.

राष्ट्रीय महामार्गांवरील टोल भरण्यासाठीचे व्यवहार हे 15 फेब्रुवारीपासून संपूर्णपणे डिजिटल होणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आज याबाबतची माहिती जाहीर केली असून, 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून टोल प्लाझावरील सर्व लेन या फास्टॅग लेन होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याशिवाय, एखाद्या वाहनास फास्टॅग नसेल तर वाहनचालकाला टोलच्या दुप्पट रक्कम भरावी लागणार आहे.  

सैन्य दलाची क्षमता वाढणार; अर्जुन टॅंकची पुढील अत्याधुनिक आवृत्ती सेनेत दाखल  

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने डिजिटल पद्धतीच्या व्यवहारांना चालना मिळण्यासाठी, तसेच वेळ आणि इंधनाच्या बचतीसाठी देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझा या फास्टॅग नियंत्रित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. व यामुळे टोल प्लाझावरील गर्दी टाळली जाऊन, अखंड रस्ता मिळणार असल्याचे मंत्रालयाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. यापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या एम आणि एन प्रकारातील गाडयांना टोल भरण्यासाठी म्हणून नवीन वर्षाच्या एक जानेवारीपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आले होते. एम प्रकारातील चार चाकी प्रवासी वाहन, तर एन प्रकारातील माल वाहतुकीसह प्रवासी चार चाकी वाहनांना फास्टॅग लावण्याचे आदेश मंत्रालयाकडून देण्यात आले होते.  

दरम्यान, नवीन वर्षाच्या सुरवातीपासूनच सर्व राष्ट्रीय महामार्गावर टोल भरण्यासाठी फास्टॅग प्रणाली लागू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिली होती. मात्र त्यानंतर फास्टॅगच्या उपलब्धतेसाठी याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आणि त्यानंतर पुन्हा एकदा मंत्रालयाने टोल प्लाझा वरील फास्टॅग अनिवार्य केले असून, फास्टॅग न लावल्यास वाहनचालकांना टोलची दुप्पट रक्कम भरावी लागणार आहे.            

 

         

संबंधित बातम्या