आसामच्या पूरस्थितीत सुधारणा; दीड लाखाहून अधिक नागरिक प्रभावित

AFP
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

गुवाहाटी : आसाममधील पूरस्थिती आता सुधारू लागली असली, तरी अद्यापही दीड लाखाहून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत. आसामच्या आपत्ती निवारण विभागाच्या अहवालात म्हटले आहे, की कालपर्यंत राज्यातील सहा जिल्ह्यांतील दोन लाख 3 हजार नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे. धेमाजी, बारपेटा, चिरंग, मोरीगाव, नगाव आणि कबीर या जिल्ह्यांना त्याचा फटका बसला आहे.

या पुरामुळे आत्तापर्यंत 73 जणांचा बळी गेला आहे. यंदाच्या वर्षी आसाममध्ये आलेल्या या पुरामुळे 157 जणांचे बळी गेले आहेत. त्यातील आठ जण हे गुवाहटीमधील आहेत. या पुराचा सर्वाधिक फटका हा मोरीगाव जिल्ह्याला बसला असून, 92 हजारांहून अधिक जण त्यामुळे प्रभावित झाले आहेत. त्यानंतर नगावात 54 हजार नागरिकांना या पुराचा फटका बसला आहे. सध्या राज्यातील 343 गावे पाण्याखाली गेली असून, 25 हजार हेक्‍टरवरील पिके बाधित झाली आहेत. प्रशासनातर्फे चार जिल्ह्यांत 91 मदत शिबिरे आणि वाटप केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या शिबिरांमध्ये सध्या 24 हजार 557 नागरिक राहत आहेत. सद्यःस्थितीत गोलाघाट जिल्ह्यातील नुमालीघर येथील धनसिरी नदी, हैलाकंडी जिल्ह्याच्या मतीझुरी येथील कटखाल आणि करिमगंजमधील कुशियारा या नद्या धोक्‍याच्या पातळीवरून वाहत आहेत.

संबंधित बातम्या