‘अटल सेतू’ पूल वाहतुकीस चार आठवडे राहणार बंद

dainik gomantak
रविवार, 26 एप्रिल 2020

‘अटल सेतू’ पूल वाहतुकीस चार आठवडे राहणार बंद 

पणजी,

मांडवी नदीवरील ‘अटल सेतू’ पुलाला जोडणाऱ्या मेरशी सर्कल ते कदंब सर्कलपर्यंतच्या रस्त्याच्या रँपचे काम हाती घ्यावयाचे असल्याने लगेच हा पूल चार आठवडे वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. यासंदर्भातचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.
या बंद काळात पुलावरून फोंड्याच्या दिशेने जाणारी वाहनेही वळविण्यात येणार आहे. या तिसऱ्या पुलाचे उद्घाटन गेल्यावर्षी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते झाले होते मात्र त्यानंतर या पुलाला जोडणाऱ्या उड्डाण पुलांचे काम रखडलेले आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यात या पुलावरून वाहने उतरून मरेशीच्या दिशेने येणाऱ्या रस्त्याच्या रँपच्या ठिकाणी पाणी भरले होते. त्यामुळे त्याच्या या दुरुस्तीसाठी हा पूल बंद करून हे सिमेंट काँक्रिटचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने या पुलाची तपासणी तसेच डागडुजीचे कामही हाती घेण्याची शक्यता आहे. या दरम्यान पुलाच्या रस्त्यावरील दोषही दूर करण्याचा प्रयत्न होणार आहे. पुलावरून मोठ्या प्रमाणात यापूर्वी वाहतूक होत असे मात्र लॉकडाऊनच्या काळात ती कमी झाली आहे. त्यामुळे या संधीचाच फायदा घेऊन हे काम हाती घेऊन पूर्ण करण्यासाठी तो बंद ठेवण्यात येणार आहे असे गोवा साधनसुविधा विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
अटल सेतू पुलामुळे म्हापसाहून मडगाव व फोंडा तसेच वास्को या दिशेने जाणाऱ्या वाहनांना पणजी शहरात न येता सरळ जाणे सोपे होत होते व वाहतुकीच्या कोंडीतही अडकावे लागत नव्हते, मात्र या चार आठवड्याच्या काळात वाहन चालकांना जुन्या मांडवी पुलांवरून पणजी शहरात येऊन पुढील मार्गाकडे जायला लागणार आहे. या पुलाच्या बंदची तारीख लवकरच दिली जाणार आहे असे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.

 

संबंधित बातम्या