जागर ...........

Dainik Gomantak
बुधवार, 22 एप्रिल 2020

जागर ........... 

 

स्टेट्‍स ते आणि हे...
- किशोर शां. शेट मांद्रेकर

‘कोरोना’ने जगभरात हाहाकार उडवला आहे. अनेकांना रोजच्या जेवणाचीही भ्रांत आहे. अशा वेळी कोणीतरी काहीतरी खायला देईल, धान्य देईल म्हणून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना काहीजण वस्तू आणून देतात आणि मग गरजवंतांच्या पोटात दोन घास जातात. हे चित्र कोणी रंगवलेले नाही, तर सध्या कमीअधिक प्रमाणात सर्वच ठिकाणी अशी स्थिती असल्याचे दिसते. या काळात अनेक दानशूर पुढे आले. एका अर्थाने हे चांगले झाले. अडलेल्यांच्या मदतीला जाणे हे खरे कार्य. त्यातून म्हणे आपल्याला पुण्य मिळते. निरलस आणि उदात्त हेतूने केलेले कार्य लोक विसरत नाहीत. पण काहीजण असेही असतात की देणार थोडे आणि प्रसिध्द मिळवणार खूप... सांगायचा मुद्दा हाच की या दिवसांत अशी अनेकांची रूपे पाहायला मिळाली. काहीजणांनी स्वार्थी हेतूने मदत केली तर काही जणांनी आपल्या व्होटबँकेला भगदाड पडू नये म्हणून मनात नसतानाही सहाय्य केले.
कोणतेही दान हे सत्पात्री असायला हवे, असे म्हणतात. कर्ण हा उदार होता, दानशूर होता, असे आपण ऐकलेले आहे आणि अनेकदा कोणी मदत करायला पुढे आला की त्यालाही आपण कर्णाची उपमा देऊन मोकळे होतो. देणाऱ्याने किती दिले, कसे दिले आणि का दिले, याचा विचार काहीजण करीत नाहीत तर काहीजण त्यातून वेगवेगळे अर्थ काढतात. यामुळे आजच्या युगातील अशा कर्णाच्या दानशूरपणाबाबत शंका निर्माण झाली तर त्या दानाचा काय उपयोग? असो. सांगायचा मुद्दा हाच की ‘कोरोना’च्या भीतीमुळे दक्षता म्हणून टाळेबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली. सुरवातीच्या काळात तर अन्नधान्य, भाजीपाला मिळवणे म्हणजे एक मोठे दिव्य होते. काही जणांना तर ते मिळवताना नाकीनऊ आले. तर अडलेल्यांच्या मदतीसाठी शेकडो हात पुढे झाले. यातील काही हात राजकारण्यांचेही होते. गरजूंना मदत केली हे ठीक, पण त्या मदतीचे फोटो सर्व सोशल मीडियावर एवढे व्हायरल केले की जणू काही लाखो, करोडो रुपयांची अशा महाभागांनी मदत केली असावी. परंतु असेही काही मदतगार होते की त्यांनी पडद्याआड राहून मदत केली आणि प्रसिध्दीही मिळवली नाही. वृत्तपत्तात्रून काही जणांना प्रसिध्दी मिळाली हा एखाद्या बातमीचा भाग होता. मात्र सोशल मीडियाच्या सर्व माध्यमांतू्न जी मदतीची छायाचित्रे सर्वत्र पसरवली गेली, ती पाहिली की एवढी मदत तरी या लोकांनी किती केली, असा प्रश्‍न कोणाच्याही मनात यावा. अनेकांनी अशा मदतीचे व्हॉट्‍सॲप स्टेट्‍स एवढे ठेवले की ते सर्व पाहून होईपर्यंत थकून जावे. मदत करणे हा अशा दानशूरांचा एक स्टेट्‍सचा भाग होता, हे समजण्यासारखे आहे. समाजात तथाकथित कार्यकर्ता म्हणून वावरणाऱ्यांनी आणि राजकीय नेतृत्व करण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना अशी मदतीची संधी दवडून कशी चालणार होती? त्यांनी ती घेतली म्हणून कोणाची हरकतही असू नये. पण त्यातून प्रसिध्दी मिळवण्याचा खटाटोप किती करावा याला मर्यादा निश्‍चितच आहे. स्वत:ची स्वत:च प्रसिध्द करून घेण्याचा हल्ली स्टंट आला आहे. ही हौस अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून भागवून घेतात. दुसऱ्यांनी कौतुक केले, अभिनंदन केले तर तो आनंद अवर्णनीय असा असतो. आपलीच पाठ आपण थोपटून घेण्यात काय हशील?
कोणी आपली प्रसिध्दी करून घेऊ नये, असे नाही. पण ती किती असावी याला मर्यादा आहेत. रोज व्हॉटसॲपचे स्टेट्‍स अपलोड करण्यात काहीजण धन्यता मानतात. ही अशी प्रसिध्दी पाहून सोशल मीडियावर अनेक मेसेज फिरत होते. त्यातील फारच चर्चेत राहिलेला मेसेज म्हणजे, ‘अडलेल्यांना या काळात तुम्ही मदत करता, दान करता, ती काही भीक नाही... मग अशी मदत केलेल्यांना सोशल मीडियावर आणून काय साध्य करता..?, भीक मागणाराही आपल्या हलाखीपोटी ती मागत असतो. ‘कोरोना’च्या संकटात अनेकजण अडकले म्हणून त्या गर्तेत सापडले. अशा अगतिक लोकांना मदत केली तर ती जगजाहीर करायची काहीच गरज नाही, असे म्हणणारेही कितीतरी पोस्ट वाचायला मिळत होते.
या काळात अनेकांना फार वाईट अनुभव आले. एकवेळचे जेवणही मिळणे मुश्‍किल बनले. अशावेळी काहीजणांचे स्टेट्‍स पाहिल्यावर या जगात काय चालले आहे त्याचा अंदाज येत होता. आपण आणलेले ताजे मासे, बनवलेले चमचमीत पदार्थ टाकायचा मोहसुध्दा अनेकांना आवरता आला नाही. कोणीतरी बाहेर उपाशी आहेत, त्यांची खाण्यापिण्याची आबाळ होत आहे, अशावेळी आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन स्टेट्‍समधून दाखवून काय साध्य, केले, अशा खरमरीत प्रतिक्रियाही सोशल मीडियावर वाचायला मिळत होत्या. पोलिस रस्त्यावर ड्युटी करीत आहेत आणि त्यांना चकवून आपण कसे फिरलो, हे सांगताना आपण जणू काही हिमालयाचे शिखर गाठण्याचा पराक्रम केल्याच्या आविर्भावात सांगणारेही काही महाभाग होते. त्यातही त्यांना आपला ‘स्टेट्‍स’ दाखवून द्यायचा होता.
‘कोरोना’च्या भीतीने आधीच अनेकांना कापरे भरले आहे. त्यांची भीती दूर करणारेही अनेक मजेशीर व्हीडिओ, मार्गदर्शक व्हीडिओ शेअर करीत होते. तर काहीजण ताण घालवण्यासाठी मिश्‍किल संदेश टाकत होते. यातून काही प्रमाणात तरी मन हलके होईल, असेही काही जण पाहत होते. तर काहीजण गांभीर्य स्पष्ट करणारे मेसेज टाकत होते. परवा पाऊस पडला त्यावर कोणीतरी एक चांगली पोस्ट टाकली होती... ‘सगळे स्वच्छ झाले म्हणून आनंदी होऊ नका, पाऊस थोडाच पडला आहे... अजून मोठ्या सरी कोसळायच्या आहेत...’, ही पोस्ट गोवा कोरोना रुग्णमुक्त झाला हे जाहीर झाले या पार्श्वभूमीवर टाकली होती. यावेळी सर्वांनी सुटकेचा निश्‍वास सोडला होता. पण अजूनही कोरोना संशयितांच्या चाचण्यांचे निकाल यायचे होते, त्या संदर्भातील ही पोस्ट नक्कीच डोळे उघडणारी होती. ‘ट्रकच्या मागे जे लिहायचे ते वाक्य आता माणसांच्या मागे लिहिण्याची वेळ आली आहे... ‘सुरक्षित अंतर ठेवा.’ आपण सोशल डिस्टन्सिंग गांभीर्याने घेतले नाही म्हणून हे सांगायची वेळ आली. ‘चंद्र आणि मंगळावर जीवन शोधणारा माणूस..., आज पृथ्वीवर स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतोय...’, लोक समोरच्या परिस्थितीचा किती विचार करतात हे यावरून लक्षात येते. ‘कुदरत का सुंदर संदेश, आप पृथ्वी के मेहमान हो, मालिक नहीं.’ ‘कोरोना’च्या भीतीमुळे आपले पाय जमिनीवर राहावे, असे अनेकांना वाटू लागले आहे. त्यातून असे संदेश दिले जात आहेत. टाळेबंदीमुळे घरातच अेनक दिवस राहावे लागल्याने काहीजणांना अस्वस्थता जाणवू लागली होती. त्यावरही भाष्य करणारा हा संदेश फारच बोलका आहे. ‘कमाल है... जिस घर को बनाने मे जिंदगी लगा दी, आज उसी घर में रहने से बेचैन है इंसान...’ शिवाय ‘आयुष्य रिवाईंड झाले... निसर्गाने किमया केली, माणसे ३० वर्षे मागे गेली, रियालिटी शोज झाले बंद, महाभारत, रामायण सुरू झाले’ आठवून आपले पुन्हा छंद, कुटुंब सारे एकत्र आले... ’, ‘ना तूम दूर जाना, ना हम दूर जाएंगे.., कोरोनाको भारतसे भगायेंगे, तनसे ‘नेगेटिव्ह’, मन से ‘पॉझिटिव्ह’ रहें, स्वस्थ रहेंगे हम...’, ‘वक्त सबका आता है, स्कूल ने मोबाईल को, बे इज्जत कर के स्कूल से निकाला था, (मोबाईल्स आर नॉट अलाऊड इन स्कूल), आज वही मोबाईल स्कूल चला रहा है... ऑनलाईन स्टडी...’. ‘शाळेत असताना बाई सारख्या म्हणायच्या, ‘तुम्ही काय दिवे लावणार ते एप्रिलमध्ये दिसणार परीक्षेत, तेव्हापासून मनात इच्छा होती, एकदा तरी बाईंना एप्रिल महिन्यात दिवे लावून दाखवणार.. अशक्य होते ते पण, मार्चमध्येच मी दिवे लावून दाखवले...’. ‘सरकारने फक्त जाहीर करावं की, बाहेर फिरताना पकडलं तर त्याला कोरोना पेशंटच्या सेवेसाठी पाठवण्यात येईल... गल्लीतच काय, गॅलरीतसुध्दा कोणी दिसणार नाही...’ आणि ... ‘जेव्हा हा लॉकडाऊन उघडेल तेव्हा खूप सारे लोक हे पण विसरून जातील, आपण कामधंदा काय करत होतो... ’ असे अनेक संदेश, पोस्ट या दिवसांत वाचायला मिळाले. करमणूक झाली पण त्यातील गांभीर्य ज्यांनी ओळखले असेल त्यांना त्यातील अन्वयार्थ नक्कीच समजला असणार. आपण जीवनात दुसऱ्यांचा विचार करायला हवा आणि स्वत:लाही सुरक्षित ठेवायला हवे. आणि... सुरवातीच्या दिवसांत फिरणारा मेसेज ‘प्रत्येक आजारावर, आयुर्वेदात कुठला ना कुठला काढा असतो... ‘कारोना’वरही आहे ‘२१ दिवस घरात ‘काढा’ व त्यापुढे जाऊन... ’२१ दिवसांत आराम मिळाला नाही तर आणखी १९ दिवस घरात ‘काढा...’ 

 

संबंधित बातम्या