म्हादई वाचविण्यासाठी मगोतर्फे घरोघरी जागृती

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

ढवळीकर यांची माहिती :३१ रोजी डिचोलीत जागृती फेरी ! मगो पक्षाने म्हादई बचावाचे आंदोलन हाती घेतल्यानंतर दोन ठिकाणी आम्ही याविषयी जागृती केली आहे. आता पक्ष राज्यातील सर्व गावागावात आणि घरोघरी म्हादई वाचविण्यासाठी जागृती करणार आहे.लोकांनी या आंदोलनात एकत्रित यावे, यासाठी पक्षाचा हा प्रयत्न आहे.

पणजी:  सरकार म्हादईविषयी अजिबात गंभीर दिसत नाही. त्यामुळे सरकारने म्हादईविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विधानसभेवर मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

याप्रसंगी कार्यकारिणीचे सदस्य दीपक ढवळीकर, बाजूला नरेश सावळ, प्रदीप फडते, सुमीत वेरेकर, नारायण सावंत आणि श्रीधर मांद्रेकर आदी उपस्थित होते. ढवळीकर म्हणाले की, म्हादईविषयी राज्य सरकार म्हादईविषयी गंभीर दिसत नाही. म्हादईबाबत केंद्र सरकारवर दबाव आणणे आवश्‍यक असताना राज्य सरकार ते करीत नाही. म्हादई वाचविण्यासाठी मगोने पुढाकार घेतला असून, राज्यातील प्रत्येक गावागावांत, वाड्यावस्त्यांवर पक्षातर्फे जागृती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही डिचोली, साखळी, म्हापसा, मये या ठिकाणी म्हादई बचाव आंदोलनाचा भाग म्हणून जागृती फेरी काढली जाणार आहे.
राज्य सरकार खाणी बंद झाल्यानंतर, म्हादईच्या विषयावर आणि वाढत्या बेरोजगारीबाबत काहीच स्पष्टीकरण देत नाही, असे सांगत ढवळीकर म्हणाले की, दीड वर्षांत केवळ राज्य सरकार घोषणा करीत राहिले आहे. हे सरकार केवळ स्वतःसाठीच काम करीत असल्याचे गोव्यातील जनतेला दिसत आहे.

त्याशिवाय पायाभूत सुविधाही निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. सरकार कर्ज काढीत आहे, पण त्या पैशात किती कामे पूर्ण झाली हे सांगत नाही. अर्थसंकल्प जाहीर केला जातो पण मागील कामे त्या पैशात पूर्ण झाली आहेत का, हे सरकार अजिबात पाहत नाही. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत आहेत. प्रकाश नाईक याच्या प्रकरणात काहीच उत्तर मिळत नाही, त्यामुळे राज्यातील स्थिती खालावली असल्याचे दिसून येते.
सावळ म्हणाले की, मगो पक्षाने वाळपई आणि खांडेपार येथे म्हादई बचावासाठी जागृती केली आहे. दि. ३१ रोजी डिचोलीत शिवाजी मैदान येथून जागृती फेरी निघून ती सेतू संगम येथे फेरीची सांगता होईल. म्हादईसाठी केंद्र सरकारवर एकजुटीने दबाव आणण्याचा प्रयत्न होणे अपेक्षित आहे, पण तसे होत नाही. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विधानसभेवर मोर्चा काढण्यात येईल, त्यासाठी येत्या १ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत तारीख निश्‍चित करून नियोजनावर चर्चा होईल.

फाईल अडवून ठेवल्या जातात!
याप्रसंगी ढवळीकर यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. ग्रामीण भागात आपल्या पक्षाचा आहे का, असे पाहून त्या व्यक्तींची कामे केली जात आहेत. सर्वसामान्यांच्या कामांमध्येही सरकार राजकारण आणत आहे. सरकार या ना त्या कारणाने आम्हालाही त्रास देत असल्याचे त्यांनी सांगितले, त्यावर तुम्हालाही त्रास दिला का, असे पत्रकारांनी विचारले असता त्यावर ढवळीकर म्हणाले की, आमच्या फाईल अडवून ठेवल्या जातात, हा त्रासच आहे.

 

ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात विद्यार्थीही रस्त्यावर

 

संबंधित बातम्या