राष्ट्रीय पदकाची आशा असलेले बॅडमिंटनमधील ‘पंचक’

Dainik Gomantak
मंगळवार, 21 एप्रिल 2020

राष्ट्रीय पदकाची आशा असलेले बॅडमिंटनमधील  ‘पंचक’

पणजी,

गोव्याच्या बॅडमिंटनपटूंनी गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पृहणीय कामगिरी केली आहे. त्यामुळे या वर्षी नियोजित असलेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याला बॅडमिंटनमध्ये पदक जिंकण्याची आशा आहे. अनुरा प्रभुदेसाई, तनिशा क्रास्टो, प्रांजल चिमुलकर, आश्रुन गौतम, प्रांजल चिमुलकर या पाच खेळाडूंकडून पदकप्राप्तीची अपेक्षा बाळगली जाते.
गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदीप हेबळे आशावादी आहेत. केरळमध्ये २०१५ साली झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याने महिलांत सांघिक ब्राँझपदक जिंकले होते. याकडे हेबळे लक्ष वेधतात. ‘‘फोंड्याची अनुरा प्रभुदेसाई बॅडमिंटन वर्तुळात गेली काही वर्षे नाव कमावित आहे. १६ वर्षीय तनिशा क्रास्टोमुळे गोव्याची बॅडमिंटनमधील ताकद वाढली आहे. तिने राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटविला आहे. राष्ट्रीय मानांकनात अनुरा व तनिशा यांनी अव्वल क्रमांकाची कामगिरी केलेली आहे आणि पदकेही जिंकली आहेत. त्यामुळे आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्यांच्याकडे पदकांचे दावेदार या दृष्टिकोनातून पाहिले जाईल. याशिवाय प्रांजल चिमुलकर, आश्रुन गौतम, अंजना कुमारी यांच्यापाशी पदक जिंकण्याची भरपूर क्षमता आहे,’’ असे गोवा बॅडमिंटन संघटनेच्या सचिवांनी नमूद केले.
कोरोना विषाणू महामारी लॉकडाऊनमुळे खेळाडू घरीच नियमित सरावापासून दूर एकांतवासात असले, तरी या खेळाडूंनी तंदुरुस्ती आणि बॅडमिंटनला दूर केलेले नाही, असे हेबळे यांनी विश्वासाने सांगितले.
अनुरा सध्या भारतीय महिला एकेरी मानांकनात अकरावी आहे. २०१८ साली तिने राष्ट्रीय सीनियर बॅडमिंटन एकेरीत ब्राँझपदकाची कमाई केली होती. ‘‘लॉकडाऊनमुळे मी बॅडमिंटन कोर्टवर जाऊ शकले नाही, पण घरीच मर्यादित स्वरूपात वॉल प्रॅक्टिसद्वारे सराव मिळवत आहे. तंदुरुस्तीसंदर्भात मी ट्रेनरनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करत आहे. जागतिक क्रमवारी मी सध्या १०१व्या स्थानी आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर पहिल्या १०० जणींत आणि नंतर टॉप ५० खेळाडूंत येण्याचे लक्ष्य आहे,’’ असे अनुराने सांगितले.
तनिशा सध्याची राष्ट्रीय ज्युनियर मिश्र दुहेरीतील विजेती आहे. राष्ट्रीय ज्युनियर मुलींच्या दुहेरीतील ती उपविजेती आहे. तिलाही लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर पडणे शक्य झालेले नाही. जागेची कमतरता असूनही सरावास तिचे प्राधान्य आहे. सध्या तिने घरीच फिटनेसवर भर दिला आहे. वॉल प्रॅक्टिससाठी तिला घरातील सामान हलवावे लागले, पण तिची तक्रार नाही. ‘‘मी समतोल आहारास प्राधान्य दिलेले आहे. लॉकडाऊनमुळे कुटुंबीयांसमवेत खूप वेळ घालविण्याची संधी मिळत आहे,’’ असे ती म्हणाली.
आश्रुन १९ वर्षांचा आहे, गेली दोन वर्षे तो गोव्यातील पुरुष एकेरी बॅडमिंटन मानांकनात अव्वल आहे. त्याने सांगितले, की ‘‘कोरोना विषाणू महामारीमुळे विलगीकरण आहे, बॅडमिंटन कोर्टवर जाता येत नाही, पण मी कायम प्रशिक्षकांच्या संपर्कात आहे. विलगीकरण संपले, की लगेच मी कोर्टवर उतरणार आहे. गोव्याचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट कामगिरीसाठी मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खंबीर आहे.’’
अंजना कुमारी गोव्याची महिला एकेरी मानांकनातील पहिल्या क्रमांकाची खेळाडू आहे. २०१८ साली झालेल्या जागतिक शालेय स्पर्धेत तिने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवर लक्ष केंद्रित करताना जागतिक मानांकनात पहिल्या शंभर जणीत येण्याचे उद्दिष्ट्य अंजनाने बाळगले आहे. सध्या ती जागतिक महिला क्रमवारीत २३९ स्थानी आहे. याशिवाय तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचेही स्वप्न बाळगले आहे.
गेल्या दोन वर्षांत प्रांजल हिने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये छाप पाडलेली आहे. गतमोसमात राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत ती मिश्र दुहेरीत ब्राँझपदकाची मानकरी ठरली, तर २०१८ मध्ये तिने पोलंडमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती. आशावाद व्यक्त करताना प्रांजल म्हणाली, ‘‘अडथळे अडवणूक करू शकत नाहीत, उलट पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. जीवनात सत्यस्थितीचा सामना करून लक्ष्यप्राप्तीसाठी प्रेरित राहणे महत्त्वाचे आहे. सध्या मी बंगळूरमध्ये अडकली आहे. प्रेरणा देणारे पालकही सोबत नाहीत. माझ्या मोठ्या भावासमवेत वेळ व्यतित करते. मोकळ्या वेळेत चित्रकाल इत्यादी गोष्टींत मन रमवते. तंदुरुस्त राहण्यासाठी मी वेळापत्रक ठरविले असून ते कटाक्षाने पाळते.’’

संबंधित बातम्या