गोव्याच्या बॅडमिंटनपटूकडून तंदुरुस्तीसाठी लॉकडाऊनचा वापर

Dainik Gomantak
सोमवार, 20 एप्रिल 2020

``दुखापतीमुळे मला सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. मला वाटतं, लॉकडाऊन कालावधीत मला विश्रांतीची आणि तंदुरुस्ती मिळविण्यासाठी चांगली संधी मिळाली.

पणजी,

फोंड्याची अनार सिंगबाळ ही गोव्याची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू, पण काही महिन्यापूर्वी झालेल्या पायाच्या दुखापतीमुळे तिला बॅडमिंटन कोर्टपासून दूर राहावे लागले, आता या २१ वर्षीय खेळाडूस लॉकडाऊन कालावधीत दुखापतीतून सावरण्याची संधी लाभली आहे.

``दुखापतीमुळे मला सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. मला वाटतं, लॉकडाऊन कालावधीत मला विश्रांतीची आणि तंदुरुस्ती मिळविण्यासाठी चांगली संधी मिळाली. लवकरच पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची आशा आहे आणि नंतर मी कोर्टवर उतरेन. लॉकडाऊन संपले, की राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीनिमित्त झोकून घेईन, मला गोव्याचे प्रतिनिधित्व करायचे आहे,`` असे अनारने सांगतिले. अनार बीकॉमच्या तृतीय वर्षात शिकते. तिने गोव्याचे राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांत नियमितपणे प्रतिनिधित्व केले आहे. लॉकडाऊन कालावधीत तिने मंडाला कलेतही पारंगतता साधली. हिंदू आणि बुद्ध संस्कृतीचा मिलाफ मंडाला कलेत अनुभवायला मिळतो, असे अनारने नमूद केले.

फोंड्याची आणखी एक गुणवान बॅडमिंटनपटू यास्मिन सय्यद हिला लॉकडाऊन आव्हानात्मक वाटले, त्याचवेळी काही नव्या गोष्टी शिकण्याची, तसेच स्वतःच्या क्षमतेची चाचपणी करणे शक्य झाले. ``लॉकडाऊन आव्हानात्मक वाटले, त्याचवेळी अदभूत अनुभवही मिळाला. शालांत परीक्षेमुळे इतर साऱ्या गोष्टी बाजूला ठेवल्या होत्या, पण लॉकडाऊनमुळे मला ताकदीवर लक्ष केंद्रित करणे शक्य झाले. यूट्यूब माध्यमातून मी फिटनेस मार्गदर्शक मिनास नागेशकर यांच्या संपर्कात राहू शकले,`` असे यास्मिनने सांगितले. गतवर्षी यास्मीनने पश्चिम विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या दुहेरीत रौप्यपदक जिंकले होते.

गोव्यातील पुरुष बॅडमिंटन मानांकनात चौथ्या स्थानी असलेल्या डिचोलीच्या करण धावसकर याने लॉकडाऊनचा वापर स्वतःला प्रेरित करण्यासाठी वापरला. बॅडमिंटन खेळायला मिळत नसल्याची निराशा त्याने झटकून लावली. तंदुरुस्त आणि आरोग्यदायी राहण्यावर भर दिला आहे, असे करणनने सांगितले.

 ``गोव्याचे सारे बॅडमिंटनपटू प्रगती साधत आहेत. लॉकडाऊनमध्ये त्यांनी स्वतःला प्रेरित राखणे आवश्यक आहे. स्टेडियम पुन्हा खुली झाली, की खेळाडूंना पुन्हा एकाग्रपणे प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करता येईल. गोव्यातील विविध भागात असलेल्या अतिरिक्त सुविधांचाही त्यांनी लाभ उठवावा.``

- नरहर ठाकूर,

गोवा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष

 

.....................…

संबंधित बातम्या