जलपर्यटन बोटींना या क्षेत्रात बंदी

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

राजभवन क्षेत्रातील समुद्रात मच्‍छीमारांना बंदी

बंदर विभागाच्या कॅप्टनने या प्रकाराची नाविकांना नोटीस बजावली आहे. राजभवनाच्या आसपास समुद्रात जलपर्यटन करणाऱ्या बोटींना व जहाजांना, त्याचबरोबर डोंगर परिसरात होणाऱ्या उपक्रमांना प्रतिबंधित केले आहे.

पणजी : दोनापावला परिसरात असलेल्या राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या राजभवनाभोवती असलेल्या समुद्रातून सुरक्षेच्या कारणावरून दोनापावलाच्या दिशेने जाणाऱ्या मासेमारीसाठी आणि इतर उपक्रमातील जहाजांना राज्य सरकारने बंदी घातली आहे.

केंद्र सरकारने जेव्हा जम्मू काश्‍मीर या राज्याचे विभाजन केले, तेव्हा मलिक तेथे राज्यपाल म्हणून काम पाहत होते. त्याचबरोबर त्यांच्या कार्यकाळात तेथील ३७० कलमही रद्द करण्याचा निर्णयही झाला होता. तेव्हापासून गुप्तचर संस्थेने त्यांच्या जीवितास धोका असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मलिक यांच्या निवासस्थाना भोवतालची सुरक्षाही वाढविण्यात आली असून, सुरक्षेचा उपाय म्हणून जहाजांना बंदी घालण्यात आली आहे.
त्यामुळे सर्व मासेमारी करणारे बोट मालक, क्रूझ बोट्स, पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बोटी, फेरी बोट्स, फिशिंग ट्रॉलर्स आणि यांत्रिकी बिगरयांत्रिकी बोटींचे चालक यांना राजभवनाच्या सान्निध्यात न येण्याचा इशारा दिला आहे.
दोनापावला येथील राजभवनापासून जवळ असलेल्या मार्वेल परिसरातील मच्छीमारांना आपल्या बोटी आता पश्‍चिमेकडे नेण्यासाठी वास्को बाजूला सरळ जाऊन पश्‍चिमेकडे वळवाव्या लागणार असल्याचे येथील मच्छीमारांनी ‘गोमन्तक'ला सांगितले. त्याशिवाय दोनापावला परिसरात मच्छिमारी करावी लागणार आहे. आम्हाला सरकारच्या नोटिसा मिळाल्या असून, त्याचे पालन करावे लागणार असल्याचे मच्छीमार पाश्‍कालो यांनी सांगितले.
 

संबंधित बातम्या