बंगळूर विजयासाठी प्रयत्नशील

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

मागील सामन्यात बंगळूरने ओडिशा एफसीवर ३-० अशी मात केली.त्यात स्ट्रायकर देशोर्न ब्राऊन यांनी खाते उघडले.अद्याप क्लीन शीट राखू न शकलेल्या हैदराबादच्या बचाव फळीविरुद्ध ब्राऊन आक्रमणाचे नेतृत्व करण्याची अपेक्षा आहे.ब्राऊन आघाडीवर असल्यामुळे सुनील छेत्री डावीकडे खेळू शकेल,जेथे तो बराच फलदायी ठरला आहे. बंगळूरने स्पेनचा विंगर नील पेर्डोमो यालाही करारबद्ध केले आहे. सामन्यादरम्यान तो मैदानावर उतरू शकतो.

बंगळूर: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी येथील श्री कांतीरवा स्टेडियमवर बंगळूर एफसीची हैदराबाद एफसीविरुद्ध लढत होईल. यावेळी घरच्या मैदानावर विजयासाठी गतविजेते प्रयत्नशील असतील.

घरच्या मैदानावरील कामगिरी बघता बंगळूरचे पारडे जड असेल. त्यांनी येथे झालेले मागील तीन सामने जिंकले आहेत. यंदा त्यांच्याविरुद्ध येथे केवळ चार गोल झाले आहेत. बंगळूर एफसीचे प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात यांनी सांगितले की, मला दडपण जाणवत नाही. शक्य तेवढे गुण मिळविण्याची आम्हाला गरज असल्याचे वाटते. गोवा आणि एटीके सर्व सामने जिंकल्यास आमच्या पुढे असतील.

कुआद्रात यांनी सांगितले की, हैदराबादने डावपेच बदलले आहेत. ते वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत. उद्या आमच्यासाठी त्यांचे खेळाडू आणि प्रशिक्षक सर्वाधिक धोकादायक असतील. पुढील मोसमात संघात राहण्याइतकी योग्यता असल्याचे प्रत्येकाला दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
हैदराबादमधील लढतीत कुआद्रात यांच्या संघाला १-१ अशी बरोबरी साधावी लागली होती. मागील सामन्यात हैदराबादने घरच्या मैदानावर बरोबरी साधताना मुंबई सिटी एफसीला १-१ असे रोखले. बाहेरील मैदानांवरील लढतीत हैदराबादला अद्याप एकही गुण मिळालेला नाही, पण त्यांचे नवे प्रशिक्षक जेव्हीयर लोपेझ या निकालानंतर कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्नशील असतील. लोपेझ यांनी सांगितले की, संघ बरीच सुधारणा करतो आहे. तरुण खेळाडूंना आमच्या धोरणाचे आकलन होत आहे. आम्ही संघ म्हणून खेळण्याच्या प्रयत्नात असून यशाकडे नेणारा हा मार्ग आहे. प्रयत्न करून जिंकण्यासाठी आम्ही बेंगळुरूला आलो आहोत.

मार्सेलिन्हो आणि बोबो यांना हैदराबादच्या आक्रमणाची धुरा सांभाळावी लागेल आणि ते उंचावण्याची गरज असेल. मुंबई सिटीविरुद्ध सामन्याचा मानकरी ठरलेल्या आदील खान याच्यावरही मोठी मदार असेल. त्याने मुंबईविरुद्ध प्रभावी खेळ केला. प्रतिस्पर्ध्याचे पासेस १९ वेळा अडविणे आणि पाच वेळा त्यांना रोखणे अशा कामगिरीमुळे आदीलसाठी सामना चमकदार ठरला. तो फॉर्म कायम राखेल अशी लोपेझ यांना आशा असेल.

 

संबंधित बातम्या