बाप्पाच्या दरबारात प्लास्टिकमुक्तीचा जागर

PTI
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

मुंबई - पाच वर्षांपासून "सकाळ' गणेशोत्सवात राबवत असलेल्या विविध उपक्रमांना समाजातून उत्स्फूर्त प

मुंबई - पाच वर्षांपासून "सकाळ' गणेशोत्सवात राबवत असलेल्या विविध उपक्रमांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यंदा "सकाळ'ने सुरू केलेल्या प्लास्टिकमुक्ती मोहिमेला गणेशोत्सव मंडळांबरोबरच स्वयंसेवी संस्था, सरकारी यंत्रणा, लोकप्रतिनिधी, शाळा, महाविद्यालयांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अनेक गणेशोत्सव मंडळांनी या मोहिमेत सहभागी होत प्लास्टिकमुक्तीची शपथ घेतली; तर काहींनी प्लास्टिकविरोधी संदेश देणारे देखावे साकारले आहेत. 

पाणीबचतीचे महत्त्व सांगणारी जलदिंडी, 24 तास ड्युटीवर असलेल्या पोलिसांसाठी सकस आहार, स्त्रियांच्या सन्मानासाठी स्त्री सक्षमीकरण प्रतिज्ञा, "वे टू ऍम्ब्युलन्स' असे विविध उपक्रम "सकाळ'ने राबविले आहेत. या वर्षी "सकाळ'ने प्लास्टिकविरोधी मोहीम राबवली आहे. "सकाळ'ने हा उपक्रम जाहीर केल्यावर अनेक स्वयंसेवी संस्थांनी व गणेशोत्सव मंडळांनी आपणहून सहभागी होण्याची तयारी दाखवली. प्लास्टिकविरोधी मोहिमेचे फलक, पत्रके, होमहवन आदी सांस्कृतिक कार्यक्रम या माध्यमातून अनेक ठिकाणी जनजागृतीही सुरू झाली. आता प्रत्यक्ष गणेशोत्सवातही प्लास्टिकमुक्ती या विषयावरील चित्रकला, वक्तृत्व, पोस्टर स्पर्धा, देखावे, प्रभातफेऱ्या असे कार्यक्रम अनेक मंडळे घेणार आहेत. केवळ प्लास्टिकला विरोध करण्याऐवजी त्याला पर्याय दिला तर ते अधिक उचित ठरेल हे जाणून अनेक मंडळे कापडी पिशव्यांचे वाटपही करत आहेत. 

प्लास्टिकचे आपल्या जीवनातील महत्त्व पाहता प्लास्टिकवर संपूर्ण बंदी योग्य ठरणार नाही; पण विघटन न होणाऱ्या प्लास्टिकचा पुनर्वापर करणे योग्य ठरेल, अशी भूमिका "सकाळ'ने मांडली होती. शहरात काही स्वयंसेवी पूर्वीपासूनच प्लास्टिकचा पुनर्वापर करीत आहेत. त्यांनीही "सकाळ'च्या मोहिमेला पाठिंबा देताना या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. महापालिका अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, प्रदूषण नियंत्रण मंडळ, रेल्वे हेदेखील "सकाळ'सोबत उपक्रम राबवणार आहेत. 

शाळकरी मुले पिशव्या करणार 

"सकाळ'च्या प्लास्टिकमुक्ती मोहिमेत शाळाही सहभागी होत आहेत. धारावीतील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या शिवाजी विद्यालयाची मुले कागदी पिशव्या तयार करून त्या मंडळांमधील भाविकांना वाटणार आहेत. त्यासाठी सोमवारी (ता. 28) शाळेतील दीड हजार मुलांना त्याचे प्रशिक्षण दिले जाईल. संस्थेचे अध्यक्ष बाबूराव माने आणि मुख्याध्यापिका वीणा दोनवलकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम होईल. 

संबंधित बातम्या