बास्केटबॉलपटू निखिलचे गरजूंसाठी योगदान

Nikhil
Nikhil

पणजी,

कोरोना विषाणू महामारीमुळे लॉकडाऊन अत्यावश्यक ठरले, या खडतर कालावधीत गोव्यातील क्रीडापटू निखिल चांदवानी आणि अजिंक्य सावंत यांनी गरजूंना मदतीचा हात देत सामाजिक जबाबदारीचे भान ठेवले.

गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये मार्केटिंग आणि कॉमर्स विषयाचा विद्यार्थी असलेला २१ वर्षीय निखिल हा बास्केटबॉलपटू आहे. त्याने राष्ट्रीय पातळीवर गोव्याचे प्रतिनिधित्वही केले असून राज्यस्तरीय स्पर्धांत नियमित खेळतो. सिंगापूर ऑलिंपिक फौंडेशनने घेतलेल्या आशियाई युवा क्रीडा नेतृत्व शिबिरासाठी निखिलची गोवा ऑलिंपिक असोसिएशनने निवड केली होती. कोविड-१९ लॉकडाऊन कालावधीत गरजूंना केलेल्या मदतीविषयी निखिलने सांगितले, ``नागरिकांनी स्वयंसेवी उद्देशाने स्थापन केलेल्या `कोविड आऊटरीच गोवा` या गटाचा मी सदस्य आहे. राज्यातील स्थलांतरीत मजूर वर्गास रेशन, तसेच अन्य अत्यावश्यक वस्तू पुरविण्यावर आमचा भर असतो. हे मजूर दैनंदिनी कमविणारे आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या मिळकतीवर गदा आली आहे. आम्ही त्यांना डाळ, आटा, तांदूळ, इतर अत्यावश्यक, तसेच स्वच्छताविषयक वस्तू पुरवतो.``

निखिल याला सामाजिक कार्याची आवड आहे. म्हापशाच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात शिकत असताना तो सांस्कृतिक सचिव होता. लॉकडाऊन गरजवंतांना मदतीच्या मोहिमेविषयी त्याने सांगितले, की ``आतापर्यंत आम्ही २००० गरजवंतांना मदत केली आहे. पिळर्ण, बेती, चिंबल, मेरशी येथे स्थलांतरीत मजूर वर्ग राहत असलेल्या भागात आम्ही मदत कार्य केले आहे. मदत मिळाल्यानंतर या मजूर वर्गातील सदस्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांचे आशीर्वाद यामुळे मदतकार्य अमूल्य ठरल्याची जाणीव होते.``

बॅडमिंटनपटू अजिंक्यही आघाडीवर...

बॅडमिंटनपटू असलेल्या २४ वर्षीय अजिंक्य सावंत याचीही गोवा ऑलिंपिक असोसिएशनने सिंगापूर ऑलिंपिक फौंडेशनने घेतलेल्या आशियाई युवा क्रीडा नेतृत्व शिबिरासाठी निवड केली होती. सध्या तो आर्थिक बाजारविषयक बाबींत कार्यरत आहे. पणजीतील या युवकाचा छायाचित्रांकन आणि लेखनातही हातखंडा आहे. त्याने राष्ट्रीय पातळीवरील विभागीय बॅडमिंटन स्पर्धेतही गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे. मुंबईतील नरसी मोन्जी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून त्याने व्यापार पदवी मिळविली आहे. लॉकडाऊनमध्ये गरजवंतांना मदत करण्यासाठी अजिंक्यही आघाडीवर राहिला आहे. कठीण वेळ कणखर बनवते यावर अजिंक्यचा विश्वास आहे. त्यानेही वेळोवेळी सामाजिक बांधिलकी जपली आहे. समाजाप्रती जागरूकता बाळगत विविध स्वच्छताविषयक उपक्रमात आघाडीवर आहे.

..................................................

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com