भारतात हिंदूंबरोबर काम करण्याची तयारी ठेवा

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

जगामध्ये सर्वाधिक अत्याचार जर कोणत्या देशावर झाले असतील, तर ते भारतावर झाले आहेत. इतिहास वाचला, तर आपल्यालाही आश्चर्य वाटेल. इतके होऊनही भारत या जगात स्वतःचे अस्तित्व टिकवून आहे. कारण भारतावर संपूर्ण जगाची जबाबदारी आहे. त्यामुळे भारतात ज्यांना काम करण्याची इच्छा असेल त्यांना हिंदूंसोबत हिंदूंसाठी काम करावे लागेल.

पणजी: जगामध्ये सर्वाधिक अत्याचार जर कोणत्या देशावर झाले असतील, तर ते भारतावर झाले आहेत. इतिहास वाचला, तर आपल्यालाही आश्चर्य वाटेल. इतके होऊनही भारत या जगात स्वतःचे अस्तित्व टिकवून आहे. कारण भारतावर संपूर्ण जगाची जबाबदारी आहे. त्यामुळे भारतात ज्यांना काम करण्याची इच्छा असेल त्यांना हिंदूंसोबत हिंदूंसाठी काम करावे लागेल. भारताने जगाला समन्वयाची शिकवण दिली असून या मार्गावर जगाने चालावे हीसुद्धा भारताची जबाबदारी असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय सचिव भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, अनेकजण भारताला ‘सुपर पॉवर’ व्हायचे असल्याचे बोलतात. मात्र, ‘पॉवर’ म्हणजे साम्राज्य आणि साम्राज्य प्रस्थापित करणे हे भारतासारख्या देशाला तात्त्विकदृष्ट्या शोभा देत नाही. माझ्या मते भारतापुढे ‘सुपर राष्ट्र’ होण्याचे आव्हान असून भारताने या दृष्टीने प्रवास करायला हवा. कारण या दोन शब्दांप्रमाणे यांच्या भूमिकांमध्येही अंतर आहे. भारताला जगासमोर एक वेगळा आदर्श प्रस्थापित करण्याची जबाबदारी पार पाडायची असून भारताने ही भूमिका समजून घेणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

हिंदू धर्माला नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. हिंदू मंदिरे तोडली, ग्रंथालये जाळली. मात्र, हिंदू धर्म नष्ट झाला नाही. कारण हिंदू धर्माच्या बाह्य रूपांना संपविण्याचा प्रयत्न होता. मात्र, अशा प्रयत्नांनी हिंदू धर्म जराही संपला नाही उलट तो अधिक क्षमतेने तगून राहिला. आणि तो अद्यापही तगून आहे. हिंदू धर्म तगून राहण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथली समाजव्यवस्था होय. इथल्या समाजव्यवस्थेने हिंदू धर्माला जोपासण्याचे आणि तारून ठेवण्याचे काम केले आहे. इतिहासानेसुद्धा हेच सांगितले आहे, की हिंदू धर्म हा कधीच विध्वंसक होऊ शकत नाही. त्यामुळे भारतामध्ये जो कोणी आला त्या प्रत्येकाने हिंदू धर्माला सोबत घेऊन काम सुरू ठेवले आणि येथून पुढेही भारतात ज्यांना काम करण्याची इच्छा असेल त्यांना हिंदूंसोबत हिंदूंसाठी काम करावे लागेल, असेही जोशीजी म्हणाले.

संघच भारताला ‘सुपर राष्ट्र’ बनवेल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विरोधक खूप आहेत. जे लोक संघाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असतात, पण संघाला स्वतःची अशी मानवतेची विशाल तत्त्वे असून संघ या तत्त्वांच्या आधारावर भारताला पुढे नेण्यासाठी कार्यरत आहे. आमचे हे कर्तव्य आहे की आम्ही भारताला जगासमोर ‘सुपर राष्ट्र’ करू, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय सचिव भैय्याजी जोशी यांनी सांगितले.
 

संबंधित बातम्या