टाळेबंदीमुळे उत्तर गोव्यातील महामार्गाचे काम रखडले

Dainik Gomantak
सोमवार, 20 एप्रिल 2020

टाळेबंदीमुळे उत्तर गोव्यातील महामार्गाचे काम रखडले

कोलवाळ,

उत्तर गोव्यात पत्रादेवी ते पर्यंतच्या सहापदरी राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम ‘कोविड-१९’च्या जिवघेण्या संसर्गरोगामुळे जारी केलेल्या टाळेबंदीमुळे सध्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. डिसेंबर २०२० पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. आता लगेच पावसाळा सुरू होणार असल्याने नियोजित अवधीत ते काम पूर्ण होण्याची शक्‍यता दिसत नाही.
गोव्यातील राष्ट्रीय महामार्गावर काम करणारे बहुसंख्य कामगार उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र इत्यादी राज्यांतील असून, सरकारने टाळेबंदी जाहीर केल्यांतर बहुतांश कामगार कसेबसे आपापल्या राज्यांत परतले आहेत, तर काही कामगार राज्यांच्या सीमारेषेवर अथवा इतरत्र अडकून पडले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम आता पावसाळ्यानंतरच पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. महामार्गावरील अर्धवट स्थितीतील अत्यावश्‍यक तातडीची कामे टाळेबंदी उठवल्यानंतर सर्वप्रथम पूर्ण करण्याची आवश्‍यकता आहे. अन्यथा या मार्गावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्‍यता आहे.
देशात व राज्यात टाळेबंदी जाहीर केल्यामुळे सध्या या मार्गावरून मोजक्‍याच संख्येने केवळ अत्यावश्‍यक असलेली वाहने धावत आहेत. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे व नव्याने तयार केलेल्या रस्त्यांची वाहनांच्या वाढत्या रहदारीने झालेली दुर्दशा या बाबी अपघातांस कारणीभूत ठरत आहेत. महमार्गाच्या डागडुजीचे काम करण्यासाठी सध्या कामगार उपलब्ध नसल्यामुळे रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांतून वाहनचालक स्वत:ची वाहने घेऊन कसेबसे मार्गक्रमण करीत आहेत.
केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गोव्याच्या भेटीत पत्रादेवी ते काणकोणपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम जलद गतीते पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. दर दिवशी वीस किलोमीटर महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्गाचे एकंदर काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी तेजगतीने लहानसहान कामे करण्यात येत होती. महामार्गावरील उड्डगणपुलांचे काम अर्धेअधिक पूर्ण करण्यात आले होते. कोलवाळ ते करासवाडापर्यंत येणाऱ्या उड्डाणपुलांचे खांब तयार झाल्यानंतर त्यांच्यावर स्लॅब घालण्यासाठी कॉंक्रीटचे छोटेखानी स्लॅब तयार करून ठेवण्यात आले आहेत. तयार केलेले ते स्लॅब क्रेनच्या साहाय्याने उचलून खांबांवर ठेवल्यानंतर उड्डाणपुलांचे काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामे उरकण्यात येत होती. पण, टाळेबंदीमुळे ती सर्व कामे अर्ध्यावरच राहिली आहे

लोकांची गैरसोय...
महामार्गाच्या कामात येणारे सर्व अडथळे दूर करून महामार्गाची कामे पूर्ण होण्याची चिन्हे दिसत असतानाच ‘कोविड-१९’चा अडथळा निर्माण झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णपणे बंद पडले आहे.
कोलवाळ येथील रस्त्यावर कॉंक्रीट घालून वाहतूक सुरळीत करण्यासाठी तयार केलेला रस्ता तसाच पडून राहिल्यामुळे लोकांची वाहतुकीची बरीच गैरसोय झाली आहे.

संबंधित बातम्या