पेज, भाकरीची जागा घेतली पावाने

Dainik Gomantak
रविवार, 29 डिसेंबर 2019

अवित बगळे
पणजी

अवित बगळे
पणजी

गोव्यात दिवसाकाठी २५ लाख रुपयांचे पाव खपतात हे कोणाला सांगूनही पटणार नाही. मात्र गोमंतकीय जीवनशैलीचा व आहारपद्घतीचा विचार करता हा आकडा निश्टिचपणे अतिशोक्तीचा नाही.
जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे माणसाची जीवनशैलीच बदलली आहे. राहणीमान, मनोरंजनाची साधने, पेहराव अशा दैनंदिन जीवनातील विविध गोष्टींतही बदल होत गेले. खाद्य संस्कृतीला त्याचे वारे लागणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार सकाळच्या न्याहरीतील पेज व भाकरीची जागा बेकरी उत्पादनांनी घेतली. सणासुदीच्या पुरणपोळीची जागा श्रीखंड व आम्रखंडाने कधी घेतली हे कळलेही नाही.
पूर्वी सकाळच्या नाश्‍त्याला महत्त्व नव्हते, असे नाही; परंतु त्यातील पदार्थ वेगळे असावेत, असे बंधन नव्हते. रात्रीसाठी भाजीभाकरी असली, तरी चालत होती. कधीतरी पोहे किंवा शिरा यापुढे ही यादी जात नसे. पोर्तुगीजांच्या काळात गोव्यात बेकरी व्यवसाय मूळ धरू लागला. आरंभी फक्त श्रीमंतांच्या खाण्यात असणारे हे पदार्थ हळूहळू सर्वसामान्यांच्या जिभेवरही रुळू लागले. ख्रिस्ती लोकांच्या वस्तीत या पदार्थांच्या खपाचे प्रमाण जास्त असायचे. सध्याचे चित्र वेगळे आहे.
घरातील कामाच्या रचनेत बदल झाले. पती- पत्नी दोघेही नोकरी करू लागल्याने तयार मालाला प्राधान्य देण्याची मानसिकता वाढीला लागली. व्यावसायिकांनी त्याचा लाभ घेत नवनवीन चवीचे पदार्थ ग्राहकांच्या जिभेपर्यंत पोचवले. यातूनच पूर्वी मोठ्या प्रमाणात बटर व साध्या पावापर्यंत मर्यादित असणाऱ्या बेकरी पदार्थांची यादी मसाला बटर, टोस्ट, मसाला टोस्ट, खारी, मिल्क ब्रेड, केक, डोनेट अशी वाढत जाऊन दैनंदिन जीवनात रुजली. गोव्यातील बेकरी व्यावसायिकांनीही उत्तम दर्जा, रास्त किंमत, ताजा माल यांची सांगड घालत नुसत्या चवीद्वारे ग्राहक उत्पादकाचे नाव सांगू शकेल, अशी ओळख निर्माण केली आहे. अशीच परिस्थिती दुग्धजन्य व इतर खाद्यपदार्थांच्या बाबतीत आहे. फरसाण, पापडी, गाठी असे पदार्थ निवडक हॉटेल व्यावसायिक करत असत; परंतु माल तयार करण्याचे प्रमाण कमी असल्याने किंमत वाढीव असायची. तसेच ग्राहकाला तीच चव पाहिजे असल्यास त्याच हॉटेलवर जावे लागे; परंतु मार्केटिंगच्या तंत्रामुळे एकाच कारखान्यात मोठ्या संख्येने तयार झालेली उत्पादने राज्यात वितरित होत आहेत. यामुळे ग्राहकांना स्वस्तात त्याच चवीचा व गुणवत्तेचा पदार्थ मिळू लागला, तसेच फरसाण, वेफर्स, चिवडा, डाळी, शेंगदाणे, या पदार्थांचे विविध प्रकार उपलब्ध झाले. दुधापासून तयार होणारे श्रीखंड, बासुंदी, आम्रखंड असे पदार्थही सहज मिळू लागले आहेत. यामुळे गृहिणी सणादिवशी पुरणपोळीचा घाट घालण्यापेक्षा कमी वेळात जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी या पदार्थांच्या वापरावर भर देतात, असे दिसून येते. बेकरी, दुग्धजन्य पदार्थ, फरसाण, वेफर्स यासारख्या उत्पादनांनी गोव्याच्या खवय्येगिरीत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. त्यात अर्थातच पावाचा वाटा मोठा आहे.  

 

 

संबंधित बातम्या