मी भूतखांब पठार बोलतोय...!

Dainik Gomantak
बुधवार, 22 जानेवारी 2020

केरी- फोंडा येथील भूतखांब पठारावर नायलॉन ६,६ कंपनीविरोधात आंदोलन झाले. त्यात केरीचा नीलेश नाईक हा तरुण पोलिसांच्या गोळीबारात हुतात्मा झाला. त्या घटनेला २३ जानेवारी २०२० रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने...

मोहन वेरेकर
सावईवेरे

गोव्यात जी मोजकीच पठारे प्रसिद्धीच्या झोतात आहेत, त्यात माझे नाव प्रथमस्थानी असायला हवे, असे मला वाटते. सगळी पठारे तशी वयाने सारखीच असली तरी कर्तृत्वाच्या रांगेत माझा पहिला क्रमांक असायला हवा. हे मी गर्वाने सांगतो असे नाही, तर अभिमानाने सांगतो.
‘नायलॉन ६६’ या प्रकल्पाच्या विरोधात जे ‘न भुतो भविष्यती’ असे आंदोलन झाले, त्यात बांध - सावईवेरे येथील नीलेश मोहन नाईक या गरीब घराण्यातील युवकाला फोंडा पोलिसांच्या गोळीबारात हौतात्म्य प्राप्त झाले. आज त्याला पावशतक म्हणजे पंचवीस वर्षे होत आहेत. आज हा पंचविसावा स्मृतीदिन त्याच्या मित्रांद्वारे याच पठारावर बांधलेल्या त्याच्या स्मारकाजवळ साजरा केला जात आहे. ते पाहिल्यानंतर गत स्मृती जागृत झाल्या. या युवकाच्या हौतात्म्याने पंचवीस वर्षांनंतर का होईना माझ्या या जागेत काही नाविन्य घडावे अशी तीव्र इच्छा निर्माण होऊन माझे डोळे डबडबले आहेत.
तसे पाहता माझा जन्म कधी झाला, असे कुणी विचारल्यास माझ्याकडे त्याचे उत्तर नाही. पण, ज्या वेळी या विश्‍वात पृथ्वी निर्माण झाली, त्यावेळीच माझा जन्म झाला असावा. नाहीतर कुणाचा जन्म कधी झाला हे दुसऱ्यांनीच सांगितल्यावर ते ठरवले जाते.
मी सध्या केरी ग्रामपंचायत क्षेत्रात आहे. तरी मी केरी आणि वेरे-वाघुर्मे या पंचायतींच्या सीमांशी निगडित आहे. माझ्या पाठीवर भूतखांब दैवत असून, ते अत्यंत जागृत दैवत असल्याचे लोक मानतात. मुख्य रस्त्यावरून फोंडा-सावईवेरे भागात जाता येता भाविक लोक भूतखांबाला नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात नाहीत, ही या भूतखांबाबद्दल असलेली श्रद्धा आहे.
माझ्या जमिनीचे क्षेत्रफळ अंदाजे १२ लाख ३३२ हजार चौरस मीटर असावे. या भागातील रस्त्याच्या एका बाजूला धनगर समाज राहतो. त्यामुळे सदैव मला त्यांची सोबत असते. रोज माझ्या अंगावर त्यांची गुरे आणि बकऱ्या बागडत असतात. माझ्याच आशीर्वादाने माझ्या अंगावर बरेच सांस्कृतिक कार्यक्रमही होतात, त्यामुळे निदान विरंगुळा तरी...!
मडकई, कुंडई, वेर्णा आदी पठारांवर ज्याप्रमाणे औद्योगिक वसाहती आल्या त्याप्रमाणे माझ्याही कुशीत एखादी औद्योगिक वसाहत यावी व या परिसरातील युवा युवतींना रोजगार मिळून या भागातील बेरोजगारीचा प्रश्‍न मार्गी लागावा अशी माझी मनोमन इच्छा होती. प्रेताप्रमाणे निपचित पडून राहण्यापेक्षा माझ्या या जागेचा समाजाला उपयोग व्हावा व माझ्या हातून परोपकार घडावा असे वाटत असतानाच १९८९ सालात सरकारने माझी जमीन संपादनासाठी घेतली व १२ लाख ३२ हजार चौरस मीटर जमीन संपादित केली. त्यातील ३ लाख ३१ हजार चौरस मीटर जागा वगळण्यात आली. त्यानंतर कलम ४, ६, ११ लावण्यात आले आणि १९९२ मध्ये जमिनीचा ताबा घेण्यात आला.
१९८५ पासूनच माझ्या या जागेवर थापर ड्यूपॉंटचा नायलॉन ६६ हा प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न चालू झाले होते. सुरवातीला या परिसरातील लोकांना त्याची कल्पना नव्हती. एखादी औद्योगिक वसाहत येत असावी अशी कल्पना होती, मीही डोके वर उंचावून कुंडई, मडकई भागातील औद्योगिक वसाहतीकडे पाहिले. तेथील औद्योगिकीकरण पाहून मला आनंद झाला, पण थोड्याच दिवसांत नायलॉन ६६ हा प्रकल्प प्रदूषणकारी असल्याची कल्पना येताच मीही ठाम विरोधातच भूमिका घेतली.
माझ्या पाठीवर आधी कूपनलिका खोदायला सुरवात झाली. इमारती बांधकामांना प्रारंभ झाला. परिसरातील विहिरींच्या, तळ्यांच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली. लोकांत जागृती निर्माण झाली. प्रकल्पासंबंधीची माहिती गोळा होऊ लागली आणि शेवटी हा प्रदूषणकारी प्रकल्प असून त्यामुळे या भागातील पर्यावरणावर, पाण्यावर, लोकांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होईल म्हणून डॉ. दत्ताराम देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नायलॉन ६६ प्रकल्प विरोधी कृती समिती तयार झाली. त्यातून लढा सुरू झाला. केंद्र सरकार, गोवा सरकार, पोलिस, लोकप्रतिनिधी एका बाजूला तर नायलॉन ६६ विरोधी कृती समिती आणि नागरिक एका बाजूला अशी ही लढत सुरू झाली. १९९२ पासून सुरू झालेला हा लढा तीन वर्षे चालला. अनेकांना पोलिस कोठडीची हवा खावी लागली. पण, कुणीही माघार पत्करली नाही. या प्रकल्पाला केरीतूनच नव्हे तर गोव्यातूनच हद्दपार केला जावा म्हणून जोरदार प्रयत्न झाले. शेवटी प्रकल्पविरोधी आंदोलन मोडून काढण्यासाठी माझ्या अंगावर पोलिसांना सोडण्यात आले. प्रचंड पोलिस फौजफाटा पाठवण्यात आला, पण याचा सुगावा आंदोलकांना लागला आणि त्यांनी आर्ल भागात ठिकठिकाणी लपून राहून गनिमी काव्याने लढा देण्याचे ठरले. दगडांचा मारा सुरू झाला. आल्यापावली पोलिस वाहनातून पळ काढायला लागले. त्यातच एका पोलिसाने गाडीचा पाठलाग करणाऱ्या युवकांपैकी नीलेश मोहन नाईक याच्या दिशेने गोळी झाडली आणि नीलेशला हौतात्म्य प्राप्त झाले.
२४ जानेवारी रोजी प्रचंड प्रमाणात जमा झालेल्या लोकांच्या उपस्थितीत नीलेशची अंत्ययात्रा निघाली. मी उंचावून फोंड्याकडे पाहिले. सर्व पोलिस स्थानकातच दडून बसले होते. एकही पोलिस रस्त्यावर दिसत नव्हता. धन्य ते आंदोलन आणि धन्य ती कृती समिती म्हणत असताना दुसऱ्याच आठवड्यात थापर ड्युपॉंट हा प्रकल्प माझ्या जागेवरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज या घटनेला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. आंदोलनकर्ते नीलेशच्या स्मृतीला वंदन करतीलच, पण मीही आज नतमस्तक आहे, नीलेशच्या हौतात्म्याबद्दल..!

संबंधित बातम्या