२२ ते २५ दरम्यान म्हापशा मध्ये जल्लोष

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

कार्निव्हलनिमित्त म्हापशात उद्यापासून भरगच्च कार्यक्रम

आयोजन समितीच्या अध्यक्षपदी मुख्याधिकारी क्‍लेन मदेरा; २५ रोजी मिरवणूक

कार्निव्हल कार्यक्रमासंदर्भात माहिती देताना म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी क्‍लेन मदेरा. बाजूला नगराध्यक्ष रायन ब्रागांझा व नगरसेवक संदीप फळारी.

म्हापसा : म्हापसा कार्निव्हल उत्सव समितीतर्फे म्हापसा शहरात शनिवारी २२ ते मंगळवारी २५ या दरम्यान कार्निव्हल उत्सव साजरा करण्यात येणार असून, यानिमित्त विविध भरग्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजन समितीच्या अध्यक्षपदी म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी क्‍लेन मदेरा यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष रायन ब्रागांझा व समितीचे सरचिटणीस नगरसेवक संदीप फळारी यांनी सीम खोर्ली येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नगरसेवक फ्रॅंकी कार्व्हालो, राजसिंह राणे व क्‍लेन मदेरा उपस्थित होते.

कार्निव्हल मिरवणूक २५ रोजी होणार असून, त्या दिवशी चित्ररथ पथकांनी तार म्हापसा येथील चर्चच्या परिसरात दुपारी तीनपर्यंत पोहोचणे आवश्‍यक आहे. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता मिरवणुकीचा प्रारंभ केला जाईल. अन्य व्यासपीठीय कार्यक्रमांना दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता प्रारंभ होणार आहे. शेवटच्या दिवशी सर्वाधिक लोकप्रिय बॅंडपथकांना निमंत्रित करण्यात आले आहे.

कार्निव्हल मिरवणुकीत व्यावसायिक चित्ररथांना सहभागी करून घेतले जाणार असल्याने त्यांचा स्पर्धेत समावेश असणार नाही. नोंदणीवेळी पूर्णत: स्क्रीनिंग करूनच चित्ररथांना प्रवेश दिला जाईल. केवळ सकारात्मक संदेशाची अभिव्यक्‍ती करणाऱ्या चित्ररथांना मिरवणुकीत तसेच स्पर्धेत सहभागी करून घेतले जाणार आहे. नकारात्मक संदेश देणाऱ्या चित्ररथांना प्रतिबंध असेल. सरकारविरोधात तसेच सरकारच्या धोरणांविरोधात लोकांना संदेश देणाऱ्यांना वगळले जाईल.
क्‍लेन मदेरा या वेळी बोलताना म्हणाले, यंदा सर्व कार्यक्रमात स्थानिक कलाकारांना स्थान देण्यात आले आहे. गोव्याची गानकोकिळा गणली जाणारी नामवंत गायिका लॉर्ना ही यंदाच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण असल्याचे ते म्हणाले.

दरवर्षी म्हापशाचा आमदार कार्निव्हल समितीचा निमंत्रक, तर नगराध्यक्ष चेअरमनपदी असतो. परंतु, यंदा निवडणूक आचारसंहितेच्या कारणास्तव समितीच्या अध्यक्षपदी मुख्याधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या समितीवर उपाध्यक्षपदी सर्व नगरसेवकांची निवड करण्यात आली आहे. मिरवणूक वगळता अन्य सर्व कार्यक्रम श्री बोडगेश्‍वर मंदिराच्या बाजूच्या परिसरात होणार आहेत.
म्हापसा हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असल्याने पर्यटकांना गोव्याकडे अधिकाधिक आकर्षित करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे संदीप फळारी यांनी या वेळी स्पष्ट केले. सुव्यवस्थित नियोजन करून साजरा होणार असलेल्या या उत्सवासंदर्भात म्हापसा पोलिस स्थानक, वाहतूक पोलिस विभाग, अग्निशामक दल व वीज खाते यांचे सहकार्य घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

फ्रॅंकी कार्व्हालो म्हणाले, उत्सवाच्या ठिकाणी खाद्यजिन्नसांचे स्टॉल्स असतील. तसेच व्यासपीठावरील बॅकड्रॉपही आकर्षक असेल. या उत्सवाला कलर आणि ग्लॅमर प्राप्त करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसेच विविध प्रकारच्या मनोरंजनपर खेळांसंदर्भातील अम्युझमेंट पार्क असेल, जिथे विशेष करून लहान मुलांना आनंद लुटता येईल.

चार दिवस विविधांगी कार्यक्रम
उत्सवाच्या पहिल्या दिवशी २२ रोजी ‘म्युझिक रिदम स्टार्स’ हा ऑर्केस्ट्रा होईल. गोमंतकीय पारंपरिक नृत्य, ‘फाल्स अलार्म’ या लाइव्ह बॅंडपथकाचे सादरीकरण व अखेरीस डीजे म्युजिक सादर होईल. २३ रोजी प्रारंभी डीजे म्युझिक, त्यानंतर ‘टॉकिंग ड्रम्स’ हे लाइव्ह बॅंडपथकाचे सादरीकरण होईल. ‘फायर डान्सर्स’ हा कार्यक्रम होईल. त्यानंतर ‘के सेव्हन’ हे लाइव्ह बॅंड सादरीकरण व अखेरीस डीजे संगीत सादर होणार आहे. २४ रोजी ‘डीजे म्युझिक’ने प्रारंभ होणार आहे. त्यानंतर रोटरॅक्‍टतर्फे नृत्य स्पर्धा, लॉर्ना यांचे लाइव्ह म्युझिक सादरीकरण, त्यानंतर बॉलिवूड कलाकारांचे नृत्य व अखेरीस डीजे म्युझीक सादर होणार आहे. २५ रोजी दुपारी तीन वाजता तार येथील सेंट जेरोम (मिलाग्रीस) चर्चच्या परिसरात स्पर्धकांनी नावनोंदणी केल्यानंतर कार्निव्हल मिरवणुकीचा प्रारंभ होणार आहे. त्यानंतर गोमंतकीय पारंपरिक नृत्य, कार्निव्हल मिरवणुकीचा पारितोषिक वितरण सोहळा व अखेरीस ‘कॅसकेड्‌स’ हा लाइव्ह बॅंडचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमांचे निवेदन नामवंत निवेदक जीजस रिबेरो आणि आर.जे. पंकज कुडतरकर करणार आहेत.

गटाराच्या पाण्याच्या मार्ग सुरळीत करण्यासाठी नगरसेवकांचा विरोध 

आयोजन समितीचे पदाधिकारी असे...
यंदा निवडण्यात आलेली ‘म्हापसा कार्निव्हल उत्सव समिती’चे पदाधिकारी असे ः क्‍लेन मदेरा (अध्यक्ष), उपाध्यक्ष - रायन ब्रागांझा, मार्लीन डिसोझा, अल्पा भाईडकर, मार्टिन कारास्को, सुशांत हरमलकर, मधुमिता नार्वेकर, अनंत श्‍यामराव मिशाळ, ऍनी आल्फान्सो, जोशुआ पीटर डिसोझा, दीप्ती लांजेकर, स्वप्नील शिरोडकर, विभा साळगावकर, सुधीर कांदोळकर, चंद्रशेखर बेनकर, सरचिटणीस - संदीप फळारी, संयुक्‍त सचिव : योगेश खेडेकर, खजिनदार - राजसिंह राणे, संयुक्‍त खजिनदार - मिलाग्रीस डिसोझा.
विविध उपसमित्यांचे अध्यक्ष : कार्यक्रम समिती : फ्रांसिस्को कार्वाल्हो, साधनसुविधा समिती : रोहन कवळेकर, स्वागत समिती : कविता आर्लेकर, चित्ररथ समिती : कार्ल डिसोझा, प्रसिद्धी समिती : तुषार टोपले.

 

संबंधित बातम्या