भाजप उमेदवारांची अजून एक यादी

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 मार्च 2020

भाजपची दुसरी यादी जाहीर
प्रदेशाध्यक्षांकडून १३ उमेदवारांची नावे जाहीर

पणजी : भारतीय जनता पक्षाने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी १३ उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी जाहीर केली. राज्य निवडणूक समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी या यादीतील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवार असे सुकूर - कार्तिक कुडणेकर, रेईश मागूश- रुपेश नाईक, पेन्ह द फ्रान्स - राधिका सावंत, सांताक्रुझ- सावाना मारीया आरावजो, ताळगाव- अंजली नाईक, चिंबल- गिरीश उस्कैकर आणि सेंट लॉरेन्स- धाकू मडकईकर, कुर्टी खांडेपार- संजना नाईक, शिरोडा- नारायण कामत, सावर्डे- सुवर्णा प्रभू तेंडोलकर, धारबांदोडा- सुधा गावकर आणि शेल्डे - सिद्धार्थ गावस देसाई.

तानावडे यांना माजी आमदार किरण कांदोळकर हे आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले, की पक्षातील प्रत्येकाला उमेदवारीसाठी आग्रह धरण्याचा लोकशाहीत अधिकार असतो, तो ते बजावत आहेत. उमेदवारी कोणाला द्यायची याचा अंतिम निर्णय राज्य निवडणूक समिती घेते. शक्य तो सर्वांच्या सहमतीने उमेदवार ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. शिरसई मतदारसंघ हा दोन विधानसभा मतदारसंघाशी सलग्न आहे. त्यापैकी आमदार ग्लेन टिकलो हे बाहेरगावी असल्याने त्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. ते परतल्यावर तेथील उमेदवाराबाबत निर्णय घेतला जाईल.

खासदार विनय तेंडुलकर आणि माजी आमदार सुभाष फळदेसाई यांच्यातील वादाबाबत जाहीर भाष्य करणे तानावडे यांनी टाळले. तो पक्षांतर्गत प्रश्न असून तो सोडवण्यात आला आहे, याशिवाय त्यावर टिप्पणी करता येणार नाही असे सांगत त्यांनी हा विषय गुंडाळला.

हे पहा :सांगे भागातील काजू उत्पादकांत चिंता

‘जिल्हा पंचायतीवर भाजपचीच सत्ता’
पक्षात उमेदवारी मिळवण्यावरून वाद होत असल्याने उमेदवार निश्चितीस वेळ लागतो का असे विचारल्यावर ते म्हणाले, एका जागेसाठी एकापेक्षा जास्त जण इच्छूक असणे केव्हाही चांगलेच असते. पक्ष संघटना किती व्यापक व विस्तारीत आहे याचे दर्शन त्यातून घडते. अनेक ठिकाणी आरक्षणांमुळे उमेदवारांचे समाज दाखले मिळवायचे आहेत. ते मिळाल्यावरच उमेदवारी जाहीर करता येते. त्यासाठी उमेदवारी जाहीर करण्यात थोडा उशीर होत आहे. मात्र, प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघात आतापासूनच प्रचार करू लागल्याने उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीवर भाजपची सत्ता येईल यात शंका नाही. उशीराने उमेदवारी जाहीर करण्याचा यावर कोणताही परिणाम होणार नाही.

संबंधित बातम्या