भाजपने खाते खोलले!

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 मार्च 2020

उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपची पूर्ण बहुमताने सत्ता येणार असून त्याची सुरवात आज सांकवाळ मतदारसंघातून झाली आहे.
- सदानंद शेट तानावडे , भाजप प्रदेशाध्यक्ष

पणजी: भाजपच्या उमेदवाराचा पाडाव करण्यासाठी अन्य कोणत्याही उमेदवाराला पाठींबा देऊ, असे जाहीर करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना भाजपने आज चकवा दिला. जिल्हा पंचायत निवडणुकीत सांकवाळ मतदारसंघात काँग्रेसकडे उमेदवार नसेल, अशी खेळी भाजपकडून खेळली गेली आणि तेथे भाजपच्या ॲड. अनिता थोरात या छाननीआधीच बिनविरोध ठरल्या.

सांकवाळमध्ये काँग्रेसने उमेदवार मिळावा, यासाठी मोठे प्रयत्न चालवले होते. संकल्प आमोणकर व मारियान यांच्‍यावर चोडणकर यांनी ही जबाबदारी दिली होती. भाजपमधील एका नाराज महिला उमेदवारी अर्ज सादर करेल. त्या महिला उमेदवाराला काँग्रेसने पाठिंबा द्यावा, अशी रणनीती आखण्यात आली होती. ही चाल भाजपच्या लक्षात आली. त्यांनी त्या महिला नेत्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घडवली. मुख्यमंत्र्यांनी समजूत काढल्याने त्या महिला नेत्याने जिल्हा पंचायत निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला. तो त्यांनी आज दुपारी १ वाजेपर्यंत गुलदस्त्यातच ठेवला. त्यामुळे त्या महिला नेत्याच्या भरवशावर राजकारण करायला गेलेले काँग्रेसच्या नेत्यांचा मुखभंग झाला. दुपारपर्यंत त्या महिला नेत्याने अर्जच सादर केला नाही आणि भाजपच्या ॲड. थोरात याच एकमेव उमेदवार सांकवाळ मतदारसंघात असल्याचे स्पष्ट झाले.

नियमानुसार थोरात यांच्या अर्जाची छाननी उद्या होणार आहे. त्या छाननीत त्यांचा अर्ज वैध ठरला, तर परवा अर्ज माघारीची वेळ टळून गेल्यानंतर त्यांना राज्य निवडणूक आयोगाकडून बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवार म्हणून घोषित केले जाणार आहे. थोरात या बिनविरोध निवडून येण्याचे निश्चित झाल्यानंतर भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी थोरात यांचे अभिनंदन करतानाच भाजपचे कार्यकर्ते सर्व ताकद पणाला लावून दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपचा झेंडा फडकवतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपच्या महिला आघाडी मोर्चानेदेखील सांकवाळ मतदारसंघातून बिनविरोध निवडून आल्याबद्दल थोरात यांचे अभिनंदन केले आहे.

भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्य सुलक्षणा सावंत म्हणाल्या, जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जनतेने भाजपवर विश्वास दाखवत दिलेली अनोखी भेट आहे. महिलांच्या सशक्तिकरणासाठी भाजप नेहमी कटिबद्ध आहे. केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना आणि उपक्रम राबवून महिलाना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. थोरात यांच्यावर दाखवलेला विश्वास हा भाजपच्या धोरणांवर दाखवलेला विश्वास आहे. दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपचा झेंडा फडकेल आणि सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्यांनी निवडून येतील यात शंका नाही.

दरम्यान, सांकवाळमध्ये काँग्रेसला उमेदवार का सापडला नाही, अशी विचारणा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली आहे. मंत्री माविन गुदिन्हो यांचे बंधू विल्सन गुदिन्हो हे पोलिसांना सापडत नाही. त्यांचे वकील हे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. यामुळे सांकवाळमध्ये भाजपला पुढे चाल देण्यात काँग्रेसचाच हात असावा अशी शक्यता त्यानी व्यक्त केली.

 

संबंधित बातम्या