भाजपा सोडणार नाही. सत्कारमुर्ती कवळेकर

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

खोला ग्रामस्थांतर्फे उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्या नागरी सत्कार करताना मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. बाजूला खासदार विनय तेंडुलकर, प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे, जि.पं. सदस्‍य शाणू वेळीप, नगरसेवक दिवाकर पागी, केपे नगराध्‍यक्ष दयेश नाईक व मान्‍यवर. 

स्‍थिर सरकार व नागरी विकास करण्‍यास आम्ही कटिबद्ध आहोत. येत्या वर्षभरात सरकारी व बिनसरकारी नोकऱ्या उपलब्ध होतील. त्‍यासाठी ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ची स्थापना करण्यात आली आहे.

आगोंद :  चंद्रकांत (बाबू) कवळेकर हे जिद्द, चिकाटी, जनतेचे प्रेम यामुळेच ते आज उपमुख्यमंत्रिपदी आहेत. दहा महिन्यांच्या कार्यकाळात सर्व घटकांचा विकास करण्यासाठी सर्व बाराही मंत्री विचारविनिमय करून निर्णय घेतात. विकासकामे करण्‍यासाठी त्‍यांनी भाजपात प्रवेश करण्‍याचा निर्णय घेतला.टुरिझम गाईडसाठी मोफत प्रशिक्षण योजना, श्रम सन्मान योजनेंतर्गत युवकांनी प्रशिक्षण घेऊन रु. ५ हजारचे मानधन प्राप्त करावे. तसेच खासगी क्षेत्रात काम करण्याची तयारी असल्यास त्यांना काम देण्यात येईल, असे आश्‍‍वासन मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

खोला ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांचा आज ता. ९ रोजी नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्‍यमंत्री बोलत होते. यावेळी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर व भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सत्कारमूर्ती चंद्रकांत कवळेकर, जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, नगरसेवक दिवाकर पागी, केपे नगराध्यक्ष दयेश नाईक, उपसरपंच बाबू प्रभूदेसाई, फातर्पा सरपंच मेदिनी नाईक, जि.पं. सदस्य खुशाली वेळीप, मोरपिर्ला सरपंच, श्रीस्थळचे माजी सरपंच देवेंद्र नाईक, माजी नगराध्यक्ष रत्नाकर धुरी, केपे गटाध्यक्ष संजय वेळीप, काणकोण गटाध्यक्ष महेश नाईक, माजी दक्षिण गोवा भाजपा अध्यक्ष सर्वानंद भगत, कुंकळ्ळी गटाध्यक्ष मारुती देसाई व अन्य पंचसदस्य आदी उपस्थित होते.

नंदकुमार खोलकर यांनी स्वागत केले. सौ. सीमा खोलकर, सौ. सुप्रिया, सौ. विनंती, सौ. उषा यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्वागतगीताने कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. जि.पं. सदस्य शाणू वेळीप, प्रदेश भाजपाचे अध्यक्ष तानावडे यांनी उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्या कामाचे व सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याच्या त्यांच्या स्वभावाचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्‍या.

स्‍थिर सरकार असले, तर काम करण्यास मुख्यमंत्र्यांना सोयीचे असते, हे हेरून बाबू कवळेकर व त्यांच्या नऊ सहकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता, हे आग्रहपूर्वक राज्यसभा खासदार तेंडुलकर यांनी सांगितले. सत्कारमूर्ती कवळेकर यांच्या मानपत्राचे वाचन पत्रकार हरिश्चंद्र खोलकर यांनी केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते खोला ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ, मानपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. भाजपातर्फे पुष्‍पहार घालून त्‍यांना सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उत्तेजन मिळायाला हवे

भाजप सोडणार नाही : कवळेकर
सत्काराला उत्तर देताना उपमुख्‍यमंत्री बाबू कवळेकर म्हणाले की, गेली २२ वर्षे आपण केलेल्या विकासकामांची ही पोहोच पावती आपण स्वीकारत असून पूर्वाश्रमीचे व आत्ताचे आपले कार्यकर्ते मिळून केलेला हा सत्कार आपल्यासाठी महत्त्‍वपूर्ण ठरत आहे. आपण कधीच आपल्या व अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यामध्ये भेद केलेला नाही. ज्या पक्षात राहिलो प्रामाणिकपणे काम केले. यापुढे मी कधीच भाजपा सोडणार नसल्याची ग्वाही त्‍यांनी सत्‍कार समारंभावेळी दिली.

४०० कोटी खर्चून
लवकरच ऑर्गेनिक शेती

भाजप जातीयवादी पक्ष असल्याच आरोप करण्‍यात येत आहे. मात्र, आपल्याला व अन्य सर्व आमदार, मंत्र्याना भाजपा हाच धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचे जवळून पाहिल्याने खात्री पटली आहे. आपण सात मुख्यमंत्र्यांचे काम जवळून पाहिले आहे. मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सर्वांना बरोबर घेऊन राज्याचा विकास करण्यात कसर सोडत नाही. सामान्य जनतेला कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी अर्थसंकल्‍प सादर केला. दक्षिण गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीत पक्षाला मोठा विजय मिळणार. गोव्यात रु. ४०० कोटी खर्चून लवकरच ऑर्गेनिक शेती महाविद्यालयाची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी यावेळी केली.

ज्येष्ठ नागरिक गोविंद वेळीप तसेच पंचसदस्य अजय पागी यांच्या हस्ते डॉ. सावंत, श्री. तेंडुलकर व श्री. तानावडे यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन संतोष कुलकर्णी, तर आभार प्रशांत खोलकर यांनी केले.

 

संबंधित बातम्या