काँग्रेस उमेदवारांवर भाजपचा दबाव प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा आरोप

BJP's pressure on Congress candidates State President Girish Chodankar charged
BJP's pressure on Congress candidates State President Girish Chodankar charged

पणजीः कॉंग्रेसच्या उमेदवारांनी जिल्हा पंचायत निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी सत्ताधारी भाजपने मोठा दबाव आणला. सत्तरीतील उमेदवारांना उत्तर गोव्यात अज्ञातस्थळी न्यावे लागले, तर ताळगावमधील उमेदवाराला वाहनात ठेऊन सातत्याने जागा बदलत रहावे लागले, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

येथे पत्रकार परिषदेत ते म्हणाले, आमचे आमदार नेऊन कॉंग्रेस पक्ष संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला. आम्ही संघटना पुन्हा उभारली. त्यामुळे आता उमेदवारच पळवण्याचा प्रयत्न केला. उमेदवारी माघे घ्यावी यासाठी आर्थिक आमिषांसोबत बळाचा वापर करण्यात येत होता. त्यामुळे उमेदवार सुरक्षित कसे ठेवावे या चिंतेत आमचे दोन दिवस गेले. आमच्यासोबत जनतेचे आशीर्वाद आहेत. या निवडणुकीत म्हादई मातेचा सौदा करणाऱ्या भाजप सरकारविरोधात जनता मतदान करणार आहे. धारगळ, तोरसे, कारापूर सर्वण, बेतकी खांडोळा, बोरी, शिरोडा, धारबांदोडा व कवळे मतदारसंघात कोणाला पाठिंबा द्यावा याचा निर्णय पक्ष लवकरच घेणार आहे. उत्तर गोव्यात ताळगाव, तर दक्षिण गोव्यात बार्से मतदारसंघातील अपक्षाला कॉंग्रेसचा पाठिंबा आहे.

नागरिकत्व कायदा दुरुस्तीमुळे आदिवासी व बहुजन समाजात निर्माण झालेली धास्ती, न सोडवलेला खाण प्रश्न, ३५ टक्क्यांपर्यंत पोचलेली बेरोजगारी, फॉर्मेलिनमुक्त मासे आहेत असे न सांगू शकणारे सरकार, राज्यावरील खर्चाचा डोंगर वाढत चालला आहे, गैरव्यवहाराने कळस गाठला आहे. यामुळे जनता या सरकारला वैतागली आहे. दोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला घरी पाठवण्यासाठीच या निवडणुकीत जनता मतदान करणार आहे. राज्याच्या एकूण मतदारापैकी ८० टक्के मतदार या मतदानासाठी पात्र असल्याने त्यांचा कौल निर्णायक ठरणार आहे.

दरम्‍यान, दिव्यांगांच्या हक्कासाठी लढणारे श्रीपाद पै बीर यांनी आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी चारचाकी व दुचाकी वाहन चालवण्यासाठी दिलेला लढा विधानसभेपर्यंत पोचला होता. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न अधिक नेटाने हाताळण्यासाठी कॉंग्रेसमध्ये आल्याचे पै बीर यांनी सांगितले. चोडणकर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com