मतदार राजा..जागा हो ! मतदारांना जागविणारा ‘मतदार दिन’

अंकिता गोसावी
सोमवार, 25 जानेवारी 2021

तदारांना निवडणुकांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदारदिन साजरा केला जातो.

तदारांमध्ये आणि खास करून युवा मतदारांमध्ये मतदानाच्या अधिकारासंबंधी जागृती करण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना निवडणुकांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदारदिन साजरा केला जातो. त्यानिमित्त हा लेख. मतदान करणे हा एक मूलभूत अधिकार आहे. कित्येक लोक मतदानाकडे दुर्लक्ष करतात आणि मतदानासाठी समर्पित दिवसाचा केवळ सुट्टी या नजरेतून विचार करतात. तसेच निवडणूक लढवणारे उमेदवार आपल्या निवडीचे नसतील, तर निवडणुकीत नोटा बटण दाबण्यापेक्षा मत न देणे पसंत करतात. अशा पद्धतीविरुद्ध जनजागृती करण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय मतदारदिन हा एक दिवस मतदारांना समर्पित करण्यात आला आहे.

25 जानेवारी हा भारतीय निवडणूक आयोगाचा (ईसीआय) स्थापना दिवस आहे. सदर आयोग 1950 मध्ये अस्तित्वात आला. मतदारांना आणि त्यातही खास करून अधिकाधिक तरुण मतदारांना निवडणूक प्रक्रियेत भाग घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस 2011 मध्ये प्रथम साजरा करण्यात आला. मतदानाचा हक्क आणि भारतीय लोकशाही हे साजरे करण्याचे दिवस आहेत यात शंका नाही. त्यानंतर भारत सरकारने दरवर्षी 25 जानेवारी हा ‘राष्ट्रीय मतदारदिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

हा दिवस केवळ तरुणांना निवडणूक प्रक्रियेत भाग घेण्यास प्रोत्साहित करण्यापुरताच मर्यादित नसून, तर मतदानाचा हक्क हा मूलभूत अधिकार आहे यावरही लक्ष केंद्रित करतो. दरवर्षी राष्ट्रीय मतदारदिन दिल्लीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांनीशी साजरा केला जातो. पूर्वी मतदारांचे पात्रता वय 21 वर्षे होते, परंतु 1988 मध्ये ते कमी करून 18 वर्षे करण्यात आले. एखादी व्यक्ती 18 वर्षे वयाची असेल आणि भारताची नागरिक असेल तर ती मतदार म्हणून नावनोंदणी करू शकते. सामान्यत: निवडणूक आयोग एखाद्या व्यक्तीस जिथे राहतो किंवा राहत आहे तेथे मतदान करण्यास परवानगी देतो. 

दोन किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी मतदान झाल्यास तो गुन्हा मानला जातो. जेव्हा एखादी व्यक्ती आपली राहण्याची जागा बदलते तेव्हा त्याची निवडणूक आयोगास माहिती दिली पाहिजे. तसेच निवडणूक आयोग दर पाच वर्षांनी किंवा निवडणुकांपूर्वीही मतदारयाद्या सुधारित करतो. मतदानाच्या वेळी मतदार ओळखपत्र ठेवणे आवश्यक नसते, तर तुम्ही तुमचे पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड इत्यादी बाळगू शकता.

राष्ट्रीय मतदारदिन प्रत्येक वर्षी एका विशिष्ट संकल्पनेसह साजरा केला जातो. गेल्या वर्षी राष्ट्रीय मतदारदिन 2020 साठी "मजबूत लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता" हा विषय होता, तर यंदाच्या राष्ट्रीय मतदारदिन 2021 चा विषय “आमच्या मतदारांना सक्षम बनविणे, जागरूक करणे, सुरक्षित करणे आणि माहिती देणे” यावर आधारित आहे. हा मतदार दिवस गोव्यातही विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करून साजरा केला जातो.

गोव्याची लोकसंख्या 15.28 लाख इतकी असून 16 नोव्हेंबर, 2020 रोजी प्रसिद्ध झालेल्या मसुदा यादीनुसार एकूण मतदारांची संख्या 11,36,591 होती. उजळणीनंतर एकूण मतदारांची संख्या 11,44,987 झाली आहे. एकूण परदेशस्थ मतदारांची नोंद ६२ इतकी आहे. उजळणीनंतर मतदार यादीमध्ये 17,250 नवीन मतदारांची भर पडली आहे, तर एकूण 8,854 मतदारांना हटविण्यात आले आहेत. गोव्यातील मतदारांच्या दृष्टीने हा मतदारदिन विशेष महत्त्वाचा आहे. कारण पुढील वर्षभराच्या कालावधीला निवडणूक वर्ष म्हणून संबोधता येईल. 

आपण निवडत असलेल्या नेत्यांमध्ये आपल्या क्षेत्राचे किंवा राज्याचे, देशाचे भवितव्य लपलेले असते. आपण पुढे येऊन योग्य नेत्याची निवड केली नाही, तर प्रगतीत अडथळा येईल व त्याचा परिणाम जनतेवरही होईल. मतदान करणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा हक्क आहे आणि त्यामुळे त्याने तो बजावलाच पाहिजे. 

संबंधित बातम्या