मुक्तिपूर्व व मुक्तीनंतरचा गोवा

मुक्तिपूर्व व मुक्तीनंतरचा गोवा
Analysis of Goa before the liberation and after the liberation on the occasion of Goa Liberation Day 2020

पोर्तुगिजांच्या गुलामगिरीतून गोवा १९ डिसेंबर १९६१ रोजी विमुक्त झाला. आज १९ डिसेंबर २०२० रोजी आपण हीरक महोत्सवी मुक्तिदिन साजरा करत असून १९ डिसेंबर २०२१ पर्यंत संपूर्ण वर्ष गोवा शासनाने गोवामुक्ती हीरकमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्याचे घोषित केले आहे. या लेखात मुक्तिपूर्व गोवा ते मुक्तीच्या हीरक महोत्सवी वर्षांतील गोवा या व्यापक कालखंडातील समाजजीवनाचा तुलनात्मक विचार संक्षिप्त रूपाने मांडत आहे.

गोवा संपूर्ण देशात आज एक उत्कृष्ट विकसित राज्य म्हणून पाहिले जात आहे. सर्व क्षेत्रांत गोव्याने नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे व काही प्रमाणात या विकासाचा पाया मुक्तीच्या पूर्वीच घातला होता. गोव्यातील जनता लोकशाही तत्त्वे व मूल्ये यांच्यापासून वंचित होती. गुलामगिरीतून छळणूक, पिळवणूक, जांच इत्यादी अनिष्ट पद्धतींमुळे समाजजीवनावर विपरीत परिणाम होत होता. तरीसुद्धा पोर्तुगीजकालीन काही कायद्यांमुळे गोमंतकीयांना लाभ झाला; पण, स्वातंत्र्याचे मोल करता येणार नाही.


प्रशासन व्यवस्था

पोर्तुगीज काळात त्रिस्तरीय प्रशासनव्यवस्था गोव्यात होती. राज्य स्तरावर ‘गव्हर्नादोर’, तालुका स्तरावर ‘आदमिस्त्रोदोर, तर ग्राम पातळीवर ‘रेजिदोर’ असे अधिकारी प्रशासन पहात असत. त्यापैकी रेजिदोर हा पगारी सरकारी कर्मचारी नव्हता व त्याला मानधनही नव्हते. सर्वसाधारणपणे पोर्तुगीज भाषा लिहिता-वाचता येणारी ती व्यक्ती गावातील उच्चवर्णीयांपैकीच असे. बहुसंख्य रेजिदोर हे हुकूमशहा, जुलमी असायचे व संपूर्ण गावात त्यांचा वचक असायचा. सर्वसाधारणपणे रेजिदोरच्या समोर सामान्य माणसाला वर बसता येत नसे. गावातील तंटे मिटविणे, जन्म-मृत्यू तसेच विवाहनोंदणीसाठी दाखला देणे, हेच त्याचे काम असे.


त्या काळात पोलिस, वन खाते, शेती तथा सर्वेक्षण खाते, शासकीय तिजोरी व लेखा खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, शिक्षण खाते, आरोग्य खाते अशीच शासकीय कार्यालये होती. दोन-तीन तालुक्यांसाठी न्यायालय असायचे. प्रत्येक गावात न्यायालयाचा एक प्रतिनिधी म्हणून एका प्रतिष्ठित व्यतीची नेमणूक होत असे; पण, त्याला वेतन अथवा मानधन नसे. साक्षीदाराला न्यायालयात हजर रहाण्याचा सांगावा त्या प्रतिनिधीमार्फत दिला जात असे. खून, मारामारी, चोऱ्या, दरोडे क्वचितच व्हायचे. न्यायालयातील प्रमुख तंटे हे कौटुंबिक व जमीन विषयकच असायचे. पोलिस व वन या खात्यांमध्ये नोकरी करणे हे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाई.


नगरपालिका ही संपूर्ण तालुक्यासाठी असायची. पिण्याच्या पाण्याच्या विहिरी बांधणे, घर बांधण्याचा परवाना, धंदा-व्यवसाय करण्याचा परवाना नगरपालिकेडून घ्यावा लागत असे. उदाहरणार्थ, भुसारी दुकान परवाना, तंबाखू विक्री परवाना, कॅरोसीन विक्री परवाना, फटाके विक्री परवाना असे वेगवेगळे परवाने पालिकेडून घ्यावे लागत असत. गोव्यातील तालुक्यांची संख्या अकरा होती. मुक्तीनंतर गोव्यातील प्रशासन लोकांच्या दारी पोहोचले आहे. दोन जिल्हे असून बारा तालुक्यांतून एकूण १९५च्या आसपास ग्रामपंचायती, दोन जिल्हा पंचायती, तेरा नगरपालिका, एक महापालिका व इतर राज्यांच्या तुलनेत एका जिल्ह्यापेक्षाही लहान असलेल्या आपल्या राज्याला चाळीस सदस्यीय विधानसभा व एकूण तीन खासदार एवढे लोकप्रतिनिधी गोव्याला आहेत. गोव्याच्या कोनाकोपऱ्यातील जनतासुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटून परत स्वत:च्या घरी एकाच दिवसात जाऊ शकते. प्रत्येक पंचायत स्तरावर, तालुका स्तरावर, उपजिल्हा स्तरावर व जिल्हा स्तरावर प्रशासकीय कार्यालये व मोठ्या प्रमाणात शासकीय अधिकारी व कर्मचारी जनतेसाठी उपलब्ध आहेत. संपूर्ण भारतात लोकसंख्येच्या तुलनेत एवढ्या मोठ्या प्रमाणात शासकीय कर्मचारी फक्त गोव्यातच आहेत.


शिक्षणव्यवस्था

पोर्तुगीज काळात वर्ष १९१०पर्यंत पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी व्यावहारिक ज्ञानापुरते शिक्षण व कौटुंबिक कौशल्य शिक्षण मिळत असे. १९१०च्या दरम्यान पोर्तुगालमध्ये प्रजासत्ताक स्थापन झाल्यानंतर काही प्रमाणात शिक्षणव्यवस्था आपल्या गोव्यात उपलब्ध झाली. मराठी प्राथमिक शिक्षण गावच्या जमीनदाराच्या घरी किंवा सामुदायिकरीत्या गावातल्या मंदिरात होत असे. पोर्तुगीज सरकारने काही ग्रामीण भागांतसुद्धा प्राथमिक शाळा स्थापन केल्या होत्या. सर्व शिक्षण पोर्तुगीज माध्यमातून होत असे. गोव्यात वैद्यकीय महाविद्यालय, सुश्रृषासेवा, सुईणसेवा, शिक्षक प्रशिक्षण संस्था, पणजी येथे सात वर्षांच्या उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाचे विद्यालय, म्हापसा व मडगाव येथे तीन वर्षांचा अभ्यासक्रम असलेली विद्यालये, पणजी, वाळपई व सांगे येथे व्यवसायिक विद्यालये, पणजी येथील महिला विद्यालय, गोव्याच्या विविध भागांत १७० शासकीय पोर्तुगीज प्राथमिक शाळा, ६ शासकीय पोर्तुगीज-मराठी, तर ४ शासकीय पोर्तुगीज-उर्दू अशा दुहेरी माध्यमाच्या प्राथमिक शाळा, विनाअनुदान खाजगी ३०० मराठी प्राथमिक शाळा, ९५ इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदान हायस्कूल्स, ३ खासगी पोर्तुगीज माध्यमाच्या लायसियम शाळा, या व्यतिरिक्त २५० चर्चशी संलग्नित कामचलाऊ पार्तुगीज भाषेच्या ज्ञानाबरोबरच धार्मिक शिक्षण व पाश्चात्त्य संगीताच्या शाळा होत्या.


मुक्तीनंतरच्या लष्करी प्रशासन काळांत जून १९६२पासून ६०१ सरकारी प्राथमिक शाळा स्थापन झाल्या व पुढे मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या दूरदृष्टीतून अतिग्रामीण भागातसुद्धा प्राथमिक शाळा सुरू झाल्या व अनेक भागांत माध्यमिक विद्यालये स्थापन करण्यात आली. लोकसंख्या वाढ नियंत्रणामुळे आजच्या घडीला असलेल्या एकूण जवळजवळ बाराशे प्राथमिक शाळा, चारशेच्यावर माध्यमिक शाळा, तर शंभरच्या वर असलेल्या उच्च माध्यमिक शाळा पैकी अनेक शाळांना किमान विद्यार्थी मिळविणे कठीण होत आहे. अनेक स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या व व्यवसायिक, अभियांत्रिकी अशा अनेक शिक्षणसंस्था आज स्थापन झालेल्या आहेत. मुक्तीच्या वेळी तीस टक्के असलेली साक्षरता आज शंभर टक्क्यांच्या जवळपास पोहोचलेली आहे. गोव्याचे स्वतःचे विद्यापीठ आहे. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असला तरी शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने आपली पिछाडी होत आहे. निकालाची टक्केवारी म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता नव्हे, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे.


आरोग्य सेवा

पोर्तुगीज काळांत आरोग्य सुविधा आजच्या प्रमाणे सर्वत्र उपलब्ध नव्हत्या; परंतु, तालुक्याच्या ठिकाणी ‘देलेगाद साऊद’ म्हणजे वैद्यकीय अधिकारी असायचा. या अधिकाऱ्याचा स्वच्छतेच्या बाबतीत वचक असे. सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, बाजाराची स्वच्छता, केशकर्तनालय, हॉटेल्स व खानावळी, मासे विक्री या ठिकाणी निरीक्षण केले जात असे. अनेक प्रमुख ग्रामीण भागांत एक पुरुष आरोग्यसेवक असे व तो लोकांना इन्जेक्शन टोचणे व अन्य तत्सम आरोग्यसेवा देत असे. सगळ्या महिलांचे बाळंतपण घरच्या घरीच गावातील वैजीण करायची. पोर्तुगीज काळात लग्नापूर्वी वर-वधूने वैद्यकीय लस घेणे (बहुतेक ही लस देवी रोगाची असावी) अनिवार्य होते. सर्व रोगांवर घरच्या घरी उपचार केले जायचे. शहरी भागात व काही प्रमुख ग्रामीण भागांत खासगी डॉक्टर असायचा. पणजी, म्हापसा व मडगाव येथे मोठी इस्पितळे होतीच. मुक्तीनंतरच्या काळात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व काही प्रमुख गावांत शासकीय इस्पितळे आहेत. बांबोळी, मडगाव व म्हापसा येथील इस्पितळे आज सुसज्ज व आकर्षकही आहेत. प्रत्येक प्रमुख शहरात आज महागडी खाजगी इस्पितळे आहेत. गावागावात अनेक खासगी डॉक्टर्स कमी शुल्कात आरोग्य सेवा देत आहेत. आज सगळ्या प्रकारच्या वैद्यकीय सेवा विनामूल्य किंवा अल्प मूल्यांत उपलब्ध आहेत. गोव्यातील मृत्यूदर, अर्भक मृत्यूदर, मुलांचा मृत्यूदर, बाळंतपणातील मृत्यूदर देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत फारच कमी आहे.


शेती व्यवसाय

मुक्तिपूर्व काळात संपूर्ण जनजीवन शेती व्यवसाय, कुळागर, नारळ व काजू बागायतीवर अवलंबून होते. शेती मालाला त्या काळातही तसा मोठा दर मिळत नसे. ग्रामीण भागात पावसाळ्यात घरच्या जवळपास पोरसू असायचेच व त्यात प्रामुख्याने मिरची, भेंडी, दुधी भोपळा, टरबूज/कलिंगड आदी पिके घेतली जात होती व हे उत्पन्न स्वतःच्या कुटुंबापुरतेच व्हायचे. पावसाळ्यात सपाट डोंगराळ किंवा माळरान भागात नाचणी, पाकड, वरी यांची शेती व्हायची व त्याला ‘कामत’ म्हणत, तर मोठ्या उतारावरील नाचणीच्या शेतीला ‘कुमेरी’ म्हणत. या व्यतिरिक्त ‘सांगोड’ ही सामुदायिक पद्धतीची शेती असायची. गावातील जमीन ही मोठ्या प्रमाणात उच्चवर्णीयांच्या मालकीची असायची. त्या मालकाला ‘भाटकार’ म्हणत. भाटकाराची शेती करणारा ‘कूळ’ असे तर माड-कुळागराची शेती करणारा किंवा देखभाल करणारा ‘मुंडकार’ असे. काही ठिकाणी जमीनमालक व कसणारा यांच्यात जरी सौहार्दाचे नातेसंबंध असले तरी अनेक ठिकाणी दबलेला बहुजन समाज व उच्चवर्णीय असा संघर्ष असायचा. याचे मुख्य कारण म्हणजे छळ, सतावणूक, पिळवणूक मोठ्या प्रमाणात होत असे.
पोर्तुगीज काळात शेतीसाठी पाणीपुरवठा व्यवस्था केपे येथील कुशावती नदीवर व सांगोड–मोले येथे दूधसागर नदीवर बांध घालून कालव्याची व्यवस्था होती. शेती ही मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्यावरच होत असे. पावसाळा संपल्यानंतर गावातील ओढ्यांवर मातीचे बांध घालून अडवलेल्या पाण्यावर ‘वायंगण’ शेती करत. मोठे ओढे व नदीच्या उथळ पात्रांत भराव टाकून ‘पूरण’ शेती करण्याची पद्धत आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.


मुक्तीनंतरच्या काळात आज गोव्यात अनेक लहान-मोठी धरणे बांधलेली आहेत व अनेक गावांत उपसा सिंजन योजना कार्यान्वित आहे; परंतु शेती व्यवसाय दुर्लक्षितच आहे. काजू बागायती आजही चालू आहेत व अनेक परिवार पारंपरिकरीत्या त्या दारू गाळण्याच्या तीन महिन्यांच्या व्यवसायावर स्वत:चा उदरनिर्वाह करतात. फक्त गूळ उत्पादन करण्यासाठी पोर्तुगीज काळात उसाची शेती व्हायची; परंतु, संजीवनी साखर कारखाना झाल्यानंतर अनेक ग्रामीण भागांत उसाची शेती मोठ्या प्रमाणात होऊ लागली. पोर्तुगीज काळात दुग्धव्यवसाय तसा नव्हताच. मध्यमवर्गीयांच्या घरी एक-दोन गुरे-म्हशी स्वतःसाठीच असायच्या, तर भाटकारकडे गाई-म्हशी मोठ्या प्रमाणात असायच्या व त्यासाठी गुराखीही ठेवला जात असे; पण, गावातील अन्य गुरांसाठी सामुदायिक गुराखी असे. दुधाची विक्री फक्त गवळी या तत्कालीन भटक्या जमातीकडून केली जात असे. गोवामुक्तीनंतर दुग्ध व्यवसायाला चालना मिळाली. आज शासनाकडून शेती, बागायती, दुग्ध व्यवसाय यासाठी अनेक योजना उपलब्ध आहेत.


खाण व्यवसाय

मुक्तिपूर्व काळात वर्ष १९१०च्या सुमारास गोव्यात खाण व्यवसायाला जरी प्रारंभ झाला तरी वर्ष १९४७पासून अनेक खाणी सुरू झाल्या. सुरुवातीच्या काळात सुरुंग फोडून व मनुष्यबळाचा वापर करून खनिज माल काढत असे व बैलगाडीतून जवळपासच्या नदीकिनारी बंदरावर पाठवून नंतर बार्जमधून मुरगाव बंदरातून निर्यात होत असे. पुढच्या काळात वर्ष १९५०च्या सुमारास युरोपीयन राष्ट्रे व जपानमधून ट्रक्स आयात झाल्याने बैलगाडीऐवजी ट्रक्सचा वापर सुरू झाला. खाण व्यवसायामुळे त्या त्या ग्रामीण भागात आर्थिक भरभराट झाली. स्थानिकांसह अनेकांना मजूर, ठेकेदार, ड्रायव्हर्स, क्लीनर्स, मॅकेनिक्स, पर्यवेक्षक, कार्यालयीन कर्मचारी अशा नोकऱ्या मिळाल्या. तसेच भुसारी दुकाने, खानावळी, हॉटेल्स, दारुचे गुत्ते असे व्यवसाय व ट्रक्सचे मालक व तत्संबधित अनेक व्यवसाय सुरू झाले.
काही खाणमालकांनी त्या त्या गावात प्राथमिक शाळाही सुरू केल्या. खाणमालकांमुळे गावातील मंदिरांचा जीर्णोद्धार झाला. खाण व्यवसायामुळे शेती–बागायती, कुळागरे, काजू-बागायती यांचा विध्वंस झाला; परंतु, शेतीमालाला नगण्य भाव असल्यामुळे व पर्यावरणीय संवेदनशीलता वगैरे कोणालाच माहिती नसल्याने खाण उद्योगातून आर्थिक फायदा ही जमेचीच बाजू असल्याचे मानले जात होते. तत्कालीन परिस्‍थितीनुसार अन्य तोटे नगण्य असाच विचार सर्वमान्य झाला होता.


मुक्तीनंतर जवळजवळ दोन हंगाम खाणी बंद होत्या. त्यानंतर त्या सुरू झाल्या. वर्ष १९७०च्या नंतर खाण उद्यागाचे मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाल्यामुळे पर्यावरणासह शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खाणमालकांनी गावातील लोकांना खूश करण्यासाठी भाडे तत्त्वावर ट्रक्स देण्याची योजना सुरू केली व त्या माध्यमातून अनेकांनी विनाभांडवल ट्रक व्यवसाय सुरू केले. वर्ष २०१२पर्यंत व्यवस्‍थित चाललेला खाण व्यवसाय बंदीमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेबरोबरच शहरी भागाची व राज्याचीही अर्थव्यवस्था खिळखिळी करून टाकली आहे. पर्यावरण, नैसर्गिक पाण्याचे स्रोत, शेती-बागायती या सर्वांचे रक्षण करून कायदेशीररीत्या खाण व्यवसाय सुरू व्हावा अशी सर्वांचीच आज अपेक्षा आहे. प्रतिवर्षी पंचवीस हजारांच्या आसपास जन्माला येणाऱ्यांसाठी किमान बारा ते पंधरा हजार रोजगार प्रतिवर्षी निर्माण होण्यासाठी आवश्‍यक असलेले उद्योगधंदे स्थापन करण्याची गरज आहे.


लोकजीवन

मुक्तीपूर्वी गोव्यात मोठ्या प्रमाणात संयुक्त कुटुंबपद्धत होती. विभक्त कुटुंबांतसुद्धा सर्वसाधारणपणे सहा ते बारा सदस्य असायचे. सर्वसामान्यांची घरे माडाची झावळे व गवत यांनी शाकारलेली असत, तर मध्यमवर्गीयांची घरे साध्या कौलांची असायची. मात्र जमीनदारांची घरे हळूहळू मंगलोरी कौलांची झाली होती व त्यापैकी काही घरांना माडी असायची. एखाद्या घराला माडी नसली तरी माळा निश्‍चितच असायचा व याचा उपयोग ‘बिनमहत्त्वाच्या वस्तू’ व सणासुदीला लागणारी मोठी भांडी ठेवण्यासाठी होत असे. गणेशचतुर्थी व दिवाळी हे दोन मोठे सण. गणपतीसमोर फुगड्या खेळण्याची पद्धत कमी होत आहे. तसेच, गावातील प्रत्येक घरातील गणपती पहाणेही आता होत नाही. दिवाळीपूर्वी सामुदायिक पोहे कांडणे लुप्त झालेले आहे. तसेच घराघरांत जाऊन पोहे खाणे कमी झाले आहे. ‘व्हडली दिवाळी’ म्हणजे तुळशी विवाहास वाड्यावरील लोकांची उपस्‍थित कमी होत चालली आहे. गावातील लग्न समारंभ किमान चार दिवस चालत असे व लग्नाच्या आदल्या दिवशी व लग्नाच्या दिवशी गावातील सर्वांना जेवण असायचे. आता ही पद्धत संपल्यातच जमा असून, कुठल्या तरी सभागृहात सगळा लग्न समारंभ एकाच दिवसात उरकला जातो. खास गोमंतकीय शाकाहारी पदार्थांची जागा आता उत्तर भारतीय पदार्थांनी घेतली आहे. तुळशी विवाहानंतर दीड महिन्यांत पौष महिना येतो व त्या महिन्यात पारंपरिकरीत्या संपूर्ण गोव्‍यात विशेषत: ग्रामीण भागांत आठवडाभर चालणारा धालोत्सव असतो. फक्त महिलांचाच हा उत्सव असतो व दररोज रात्री दोन ते तीन तास गावातल्या मांडावर महिला धालो खेळतात. यामध्ये अनेक प्रकारची लोकगीते व फुगड्या असतात. शेवटच्या रात्रीला ‘मांड’ म्हणतात व त्या रात्री संपूर्ण रात्र धालो खेळतात. प्रत्येक रात्री अवसर येणाऱ्या मुलीला ‘रंभा’ असे म्हणतात. मुक्तिपूर्व काळात मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या त्या उत्सवाला सध्या थोडी मरगळ आलेली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आजची सुशिक्षित महिला ही नोकरी, काम-धंदा, व्यवसाय यांमध्ये स्वत:ला गुंतवून ठेवते व त्‍यामुळे सलग आठवडाभर रात्री उशिरापर्यंत धालो खेळणे तिला कठीण जात आहे. तरीसुद्धा अनेक महिला संस्कृती व परंपरेचा भाग म्हणून धालोत्सवात अजूनही सहभागी होतात. पूर्वी गावातील देऊळाच्या वार्षिक उत्सवाला सर्वसाधारणपणे ‘मोचेमाडकर नाटक मंडळी’चे दशावतारी प्रयोग असायचे. खाण उद्योगाने मूळ धरायला सुरुवात झाल्यानंतर खाणी असलेल्या ग्रामीण भागांतही स्‍थानिकांकडून ऐतिहासिक किंवा पौराणिक या संगीत नाटकांचे प्रयोग सुरू झाले. नाटकातल्या स्त्रीभूमिका पुरुषच करीत. प्रयोगाला ‘आदमिस्त्रादोर’ या तालुका अधिकाऱ्याकडून परवानगी घेणे अत्यावश्यक होते. ‘स्वातंत्र्य’ या विषयासंदर्भातील मजकुराची नाट्यसंहितेतून काटछाट केली जात असे. त्या काळात कडक फतवे निघत. एकदा पोर्तुगीज शासनाने कालोत्सवाला बंदी घातली; पण, गावातल्या ‘कल्पक’ बुदवंताने आम्ही ‘कालो’ करणार नाही, तर ‘काली’ करणार असल्याचे सांगून परवानगी मिळवली. शिगमोत्सवावर बंदी घातली असता डोंगरी येथील कल्पक व्यक्तींनी ‘इंत्रुज’ करणार म्हणून परवानगी घेतली व आजही तो इंत्रुज उत्सव साजरा केला जातो. शिगमोत्सवही त्या काळात थाटांत सुरू व्हायचा. गावातील प्रत्येक वाड्यावरचा मेळ ढोल–ताशांच्या गजरात घरोघरी दशावतारी खेळ सादर करीत. प्रत्येक मेळासाठी समई प्रज्वलित करून गूळ आणि पाण्याचा तांब्या ठेवत. भाटकाराच्या घरी पाच नारळ व थोडी जास्त रक्कम, तर इतर ठिकाणी एक-दोन नारळ व कमी प्रमाणात रक्कम अशी ‘तळी’ दिली जात असे. दशावतारी खेळाबरोबरच अनेक प्रकारची लोकनृत्ये सादर होत असत. त्या लोकनृत्यांपैकी ‘तालगडी’ हा प्रकार आता लुप्त झाला आहे, तर इतर अनेक लोकनृत्यांना राजाश्रय मिळाला आहे व वेगवेगळ्या राज्यांत व परदेशांतही सादरीकरण होत आहे.


पर्यटन व्यवसाय

मुक्तिपूर्व काळात व मुक्तीनंतरच्या अनेक वर्षांत पर्यटन व्यवसाय गोव्यात नव्हता; परंतु, राष्ट्रकुल सरकार प्रमुखांची १९८३ मध्ये नवी दिल्ली येथे बैठक संपल्यानंतर समापन बैठक गोव्यात झाली आणि गोवा देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनस्थळ म्हणून एकदम प्रकाशात आला. पर्यटनामुळे किनारी भागांत आर्थिक सुबत्ता जरी आली तरी मद्यपान, नशापान, वेश्‍या व्यवसाय व अन्य अनैतिक व्यवहार दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात असे. मसाज पार्लर व कॅसिनोच्या व्यवसायाखाली सर्व प्रकारच्या अनैतिक बाबी घडत असतात व भ्रष्टाचारामुळे राजकीय नेते त्या कृत्यांना मुक राहून अप्रत्यक्षपणे समर्थन देत आहेत. पर्यटन व्यवसायामुळे हॉटेल व्यवसाय, टॅक्सी व्यवसाय व अन्य आस्थापनांना जरी बरकतीचे दिवस आले असले तरी सर्व प्रकारचा सांस्कृतिक ऱ्हास पर्यटन व्यवसायामुळेच होत आहे हे कटू सत्य आहे.


भ्रष्टाचार

मुक्तिपूर्व काळांत आपल्या राज्यात लाचलुचपत व भ्रष्टाचार होतच नव्हता. कसल्याही कामासाठी लाच द्यावी लागत नसे. लाच देणे व घेणे हा प्रकार काय असतो हे कोणालाच माहीत नव्हते. परिचयानेच सगळी कामे होत असत. एखाद्या व्‍यक्तीने आपले काम केल्यास ग्रामीण भागातील व्‍यक्ती रानवटी जनावराचे मांस, बिबे, काजूगर, आंबे अशी भेट देत असत. शहरी भागात ही भेट म्हणजे चांगल्या माशांची गाथन किंवा मानशीची सुंगटे असायची. मुक्तीनंतरच्या काळात वर्ष १९८०पर्यंत भ्रष्टाचार जवळजवळ नव्हताच; परंतु, हळूहळू भ्रष्टाचाराने हात-पाय पसरले आणि आज भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे. शासकीय नोकरी मिळवण्यासाठी, शासकीय कार्यालयात अडून पडलेले काम होण्यासाठी, बदलीसाठी भ्रष्टाचार हाच एकमेव मार्ग आहे, असा लोकांचा ठाम विश्‍वास झाला आहे. याचा अर्थ सगळेच शासकीय अधिकारी व कर्मचारी भ्रष्टाचारी आहेत, असे मुळीच नव्हे; परंतु, राजकीय नेते व त्यांचे एजंट यांनीच हा भ्रष्टाचार पोसलेला आहे. गोव्यातील बांधकाम क्षेत्रात एका सदनिकेमागे किमान एक ते दोन लाख भ्रष्टाचाराच्या नावे राजकीय नेते व एजंट यांच्या खिशात जात असतात. मते मिळवण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी, सरकार घडवण्यासाठी, सरकार टिकवण्यासाठी भ्रष्टाचारातून मिळवलेला पैसा ओतला जातो. दुर्दैवाने गोव्यातील सुशिक्षित मतदारसुद्धा राजकीय पक्षांच्या व नेत्यांच्या प्रलोभनांना बळी पडतात.


सुस्तावलेला गोवा

मुक्तीनंतर गोव्यात लोकशाही व संविधानिक मूल्यांचा पाया घातला गेला. बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासाची सर्व दालने खुली झाली. विलीनीकरण की संघप्रदेश यावर आपण कौल दिला. कोकणी जरी राजभाषा असली तरी मराठी ही गोवेकरांची सांस्कृतिक भाषा आहे; परंतु, दोन्ही भाषांच्या द्वंद्वात इंग्रजी बाजी मारत आहे. गोव्याबाहेर आपल्या देशात व परदेशांत जाणारा गोमंतकीय उत्कृष्ट काम करणारा आहे; परंतु, गोव्यात रहाणारा गोमंतकीय काही प्रमाणात आळसावलेला आहे का, अशी भीती वाटत आहे. गोव्यातील वेगवेगळ्या उद्योगधंद्यात काम करणारे परप्रांतीय आहेत. गोवेकरांचीच दुकाने भाड्याला घेऊन उद्योग व्यवसाय करणारे परप्रांतीय आहेत. शेती, काजू बागायतीत काम करणारा बहुसंख्य मजूरवर्ग परप्रांतीय आहे. भाजीविक्रेते, फळविक्रेते… एवढेच नव्हे, तर मासे विकणारे व बेकरीत काम करणारेही प्रामुख्याने परप्रांतीय आहेत. खाण पट्ट्यातील ट्रक्सचे ड्रायव्हर्स, मदतनीस परप्रांतीय आहेत. मग गोमंतकीय काय करतात, असा प्रश्‍न उभा राहतो.


आपल्या गोव्याला घटक राज्याचा दर्जा ३० मे १९८७ रोजी मिळाला व त्यामुळे निर्णयाचा हक्क आपल्याला मिळाला. शिक्षणाने फक्त साक्षरताच वाढली का? पयावरणाच्या दृष्टीने आपण आज बरेच संवेदनशील झालो आहोत. मद्यपान, नशापान, तंबाखू सेवन, ऐषाराम, भौतिक सुख इत्यादींच्या बाबतीतही आपण संवेदनशील होण्याची गरज आहे. राजकीय पुढाऱ्यांकडे लाचारी न करता, ‘मी मत दान करणार; पण, कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही’, अशी धमक प्रत्येकामध्ये असणे आवश्यक आहे. गोव्याच्या हिताच्या दृष्टीने समंजस, उद्योगी, कष्टाळू, सुशिक्षित व सुसंस्कृत असा दूरदृष्टी असलेला समाज निर्मिती हीच आजच्या साठाव्या मुक्तिदिनी अपेक्षा!


‘‘स्मरुनी गोमंतदेवी मूर्ती सौख्यदा।
प्रेमभरे, हृदयभरे, नमन तव पदा ।’’

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com