
वाल्मिकी फालेरो
पोर्तुगीज-ब्राझिलियन जेसुइट इतिहासकार, फादर फ्रान्सिस्को डी सूझा यांनी लिहिलेल्या ‘ओरिएंत कॉन्क्विस्तादोे अ जेसू क्रिस्टो पेलोस पॅड्रेस दा कंपान्हिया दा जीझस द प्रोव्हिन्सिया द गोवा’ (हे पुस्तक वास्तविक ३ खंडांत लिहिले गेले.
पहिल्या दोन खंडांत 1544-64 आणि 1565-85 या कालावधीचा समावेश आहे. हे दोन्ही खंड 1690-99 दरम्यान गोव्यात लिहिले गेले. दोन्ही खंड लिस्बनमध्ये 1710 (1770?) मध्ये प्रकाशित झाले आणि पोर्तुगालला पाठवलेला तिसरा खंड वाटेत किंवा लिस्बनला पोहोचल्यानंतर हरवला.
द एक्झामिनर प्रेस, बॉम्बे, 1881 (खंड 1) आणि 1886 (खंड 2) द्वारे प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीतले संदर्भ यावरील लेखांत घेण्यात आले आहेत.) या पुस्तकात गोव्याच्या ख्रिस्तीकरणाची गाथा सांगितली आहे.
फादर सौझा यांच्या मते, 1564 साली सासष्टीतील 700 स्थानिक रहिवाशांनी आणि 1565 साली आणखी 500 लोकांनी बाप्तिस्मा घेतला.
नंतरच्या वर्षात (1565), मडगावच्या 5000-6000 रहिवाशांचे ख्रिस्तीकरण झाले (आणि अल्बिसमध्ये शनिवारी होली स्पिरिट चर्चच्या पवित्र समारंभाला हजेरी लावली). मडगावला पूर्णपणे ख्रिश्चन गावात रूपांतरित केले.
मडगावमधील ख्रिस्तीकरणाला लाभलेल्या यशाने, गोव्यातील जेसुइट प्रांताधिकारी फादर आंतोनिओ दा क्वाद्रोस यांना सासष्टीतील चर्चची संख्या वाढवण्यास प्रेरित केले.
कोणत्या कारणांमुळे ख्रिस्तीकरण झाले, याचे विवेचन पुस्तकात नाही. फादर फ्रान्सिस्को डी सूझा यांनी ख्रिस्ती झालेल्या लोकांची संख्या जी ५,०००-६,००० अशी वर्णिली आहे ती, ‘वीतभर तवसे आणि हातभर बिया’ वाटते.
ओरिएंत कॉन्क्विस्तादोमध्ये नमूद केल्याप्रमाणे पुढील वर्षी (१५६६) आणखी ७०० लोक ख्रिस्ती झाल्यामुळे मडगाव ’पूर्णपणे ख्रिश्चन’ गाव झाले.
(हे संदर्भ तपासताना कॅलेंडर वर्षांमधील फरकामुळे होणारे घोळ लक्षात घेणे आवश्यक आहे. हा जवळपास दहा वर्षांचा फरक १५६३/६४ आणि १५६४/६५ पूर्वी प्रचलित ज्युलियन कॅलेंडर आणि पोप ग्रेगरी - १३ यांच्या नावावर असलेल्या ग्रेगोरियन कॅलेंडरमुळे आहे, जे १५८२ मध्ये सादर केले गेले होते परंतु वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या देशांनी ते स्वीकारले. ज्या वर्षी, एकाच घटनेचे पोर्तुगीज आणि ब्रिटिश इतिवृत्त वाचले जाते, तेव्हा ही अनेक वर्षांची तफावत आढळते.)
कुठ्ठाळीतील मंगेश शणै हे पहिले सासष्टीकर होते जे ख्रिश्चन झाले(पेद्रो मास्कारेन्हस), अशी समाजमानसामध्ये प्रचलित धारणा आहे. १५६२ आणि १५६४ दरम्यान, राशोल येथील जेसुइट फादर पेरो कुलासो यांनी मडगावमधील काही प्रमुख कुटुंबांना ख्रिस्ती केले.
होली स्पिरिट चर्च बांधले जाईपर्यंत (१५६४/६५) तिसवाडी येथे सासष्टीतील सुमारे १,००० ख्रिश्चनांनी बाप्तिस्मा घेतला होता.
१५६९साली मडगावमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिस्तीकरण झाले. म्हणजे १५७३साली मडगावमध्ये ७०० हून अधिक लोकांनी बाप्तिस्मा घेतला, त्यात तालुका प्रमुख (सासष्टीचे प्रमुख गांवकर) आणि अनेक ब्राह्मणांचा समावेश होता.
परंतु बाप्तिस्म्याच्या वेळी घालतात त्या पोशाखाच्या कमतरतेमुळे मडगाव आणि ओडलीमधील १,००० हून अधिक लोकांचा बाप्तिस्मा झाला नाही. विशिष्ट पोर्तुगीज पद्धतीमध्ये पोशाख केल्यावर नवख्रिस्त्यांचा बाप्तिस्मा झाला. हा पोशाख मिशनऱ्यांनी पुरविला होता आणि त्याच्या प्रचंड कमतरतेमुळे सासष्टीतील अनेक गावांमध्ये काही शेकडो लोकांची ‘प्रतीक्षा यादी’ तयार करण्यात आली.
याचा परिणाम असा झाला की, १५७३ च्या अखेरीस, गव्हर्नर आंतोनियो मोनिझ बार्रेतो यांनी फर्मान काढले की,‘सासष्टीतील कोणताही ख्रिश्चन गावकर इतर ख्रिश्चन गावकरांच्या उपस्थितीशिवाय - सार्वजनिक किंवा खाजगी - गावकरी सभेला उपस्थित राहणार नाही. जेथे ख्रिश्चन गावकर बहुसंख्य आहेत, तेथे हिंदू गावकरांना उपस्थित राहण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे.
जेथे संमिश्र उपस्थिती असेल तेथे गणपूर्ती झाली नाही तरच हिंदू गावकरांची नावे जोडता येतील; आणि, जेथे मिश्र पंथांच्या बैठकीमध्ये ठराव मंजूर केले जातात, तेथे प्रथम ख्रिश्चन गावकरांची नावे नोंदवली जातील. डिक्रीचे उल्लंघन करताना आढळलेल्या कोणासही २० परदौसचा दंड ठोठावला जाईल - आणि असा जमा केलेला दंड केवळ त्यांच्या बाप्तिस्म्याच्या वेळी नवख्रिस्तींच्या बाप्तिस्मा करायच्यावेळी घालावयाच्या पोशाखावर खर्च केला जाईल.’
१५ जानेवारी १५७५ रोजी राशोल येथे सुमारे एक हजार जणांचा सामूहिक बाप्तिस्मा झाला. या सर्वांत प्रभावशाली बाप्तिस्मा समारंभात मडगाव आणि ओडली येथील नवख्रिस्ती होते, असे स्पष्ट वर्णन फादर गोम्स वाझ यांनी २० जानेवारी १५७५ रोजी रोममधील त्यांचे वरिष्ठ एव्हरार्ड मर्क्युरिअन यांना लिहिलेल्या पत्रात केले आहे.
१५९६साल उजाडेस्तोवर ६,६०० ख्रिश्चन लोकसंख्येसह मडगाव हे सासष्टीतील सर्वांत मोठा ख्रिस्ती परगणा झाले होते. त्याखालोखाल ओडलीत ४,५०७ ख्रिश्चन होते. ११ जानेवारी १६३३च्या आदेशाने पुन्हा हिंदूंना सासष्टीतून हद्दपार करणाऱ्या व्हॉइसरॉय मिगुएल द नोरोन्हा यांनी त्याच वर्षाच्या उत्तरार्धात मडगावला भेट दिली तेव्हा १,००० हिंदू तालुक्यातून पळून गेले होते तर ३,००० लोकांचे ख्रिस्तीकरण झाले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.