मनाची भूक

मनाची भूक
मनाची भूक

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. रविवार होता तो. रात्रीच जेवण आटोपलेलं. व्हॉट्सॲपवरील पोस्ट्‌स वाचता वाचता आमच्याच एका कौटुंबिक स्नेह्यानं फॉरवर्ड केलेला मेसेज वाचून झाल्यावर यजमानांच्या मनात त्या मित्राला फोन करून बातचीत करण्याचा विचार उफाळून आला. खूप दिवस झाले. त्यांच्याशी ‘रुबरू’ होण्याचं राहूनच गेलेलं. विचार मनात येताच वेळ न दवडता मिस्टरांनी फोन लावला अन्‌ क्षणात बाहेर कोसळणाऱ्या पावसप्रमाणे गप्पांची ‘बारिश’ सुरू झाली.

 जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे तसेच आमचे स्नेहीसुध्दा बोलके अन्‌ समविचार असल्यामुळे गप्पांचा फड रंगत चाललेला. विषयाला बंधनच नव्हते. शरीराने दुरावलेले तरी ‘शब्दसेतू’ने जोडत चालल्यामुळे गप्पांच्या ओघात एक तास सहज निघून गेलेला शेवटी एकमेकांचा निरोप घेतांना आमच्या स्नेह्यानं  ‘खरोखरीच’ खूप बरं वाटलं. तुमच्याशी बोलून अशी मनापासून प्रांजळ कबुली दिली. त्यात कोणतीही अतिशयोक्ती नव्हती. त्यांच्या हृदयातील भावना ओठांवर आलेल्या. 

एखाद्या वेळेस प्रत्यक्ष भेट अशक्य असली, तरी चार शब्द एकमेकांशी बोलून आपण मनाची भूक भागवू शकतो. मग ती फोन सारख्या माध्यमातून का असेना. अशावेळी समोरील व्यक्ती बोलघेवडी, चतुरस्र असली तर ‘सोने पे सुहागा’च. त्यांच्यामार्फत अनेक गोष्टींचं ज्ञान नकळत पाजलं जातं. आजकालच्या व्यस्त दैनंदिनीमुळे खास करून आजच्या सद्यःस्थितीत एकमेकांची भेट होणं दुर्मीळ होत चालले असतांना एखाद्या मित्र-मैत्रिणीला अथवा नातेवाइकांना एक ‘कॉल’ केल्याने मनाची मरगळ काही प्रमाणात कमी होते.

द्विधा मनःस्थितीत तर चार शब्द व्यक्त करणे, दुसऱ्यांचे चार शब्द कानी पडणे, खूप मोलाचं ठरत असत. अशावेळी समोरील व्यक्ती सूज्ञ तसेच हितचिंतक असावी लागत. हे विशेष! आयुष्याच्या वाटेवर असंख्य माणसं भेटतात, पण विचारांची नाळं जुळणारी माणसं मनाच्या तळाशी घट्ट रुतू असतात. अशा माणसांशी बोलल्याने, आपल्या भावना व्यक्त केल्याने खूप हलकं वाटत असतं. 

पूर्वीचे दिवस आठवलं की, डोळ्यांसमोर उभी ठाकतात. ती दाटीदाटीने वसलेली राहत्या वाड्यांवरील घरं येता - जाता एकमेकांच्या दारात थांबून चार गोष्टी केल्यानं थकलेलं मन हलकं होत असे. आनंदी बातम्या कानी पडताच मन प्रसन्न होई, काही वेळा दुखणी व्यक्त केल्याने उपायही पदी पडतात. तसेच बऱ्याचवेळा मनातील अज्ञानातील अंधार मिटण्यास मदतही होत असते. चाळीत वास्तव्य केलेल्यांना याचा बऱ्यापैकी अनुभव आलेलाच असेलच. 

मानवाचं जीवन म्हणजे ऊन-पावसाचा खेळ. कधी कधी तणाव तर कधी कधी निरुत्साह ‘डोकं’वर काढलं असता. अशावेळी उचला फोन आणि फिरवा. एखाद्या मित्र-मैत्रिणीचा, नजीकच्या अथवा दूरच्या नातलगाचा नंबर अन्‌ व्हा मुक्त. विषयाचे बंधन ठेवत सुरू व्हा आणि बघा काही क्षणातच आपलं ‘डाऊन’ झालेली मनाची ‘बॅटरी चार्ज’ नक्कीच होईल. मनात साचलेल्या असंख्य गोष्टींना बाहेरची वाट मिळाल्यानं मन हलकं होईल, मूड नक्कीच बदलेल. एकटेपणात तर गारठलेल्या मनाला ऊब देण्यास, संवाद हा खप महत्त्वाचा. अनेकवेळा ‘इगो’ आपल्या मनावर अधिराज्य गाजवण्यास टपून बसलेला असतो. नेहमी आपण का म्हणून त्याला किंवा तिला फोन करावा,असा विचार मनात घर करू लागताच. त्या विचाराला तिथल्या तिथेच गाडून टाकावा अन्‌ व्यक्त व्हावं. आपल्या बरोबर समोरील व्यक्तीचा सुध्दा मूड बदलला तर मग क्या बात!

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com