‘फेक न्यूज’ नावाचा विषाणू

अनंत गाडगीळ
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

‘फेक न्यूज’ या प्रकाराने केवळ भारतातच नव्हे तर जगभर धुमाकूळ घातला आहे. यातून घडलेल्या अनर्थकारी घटनांमुळे नियमनाचा प्रश्‍न समोर आला आहे. या एकूणच समस्येचे स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करणारे विवेचन.

‘लॉकडाउनमध्ये अडकलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी वांद्रे रेल्वे स्थानकावरून विशेष गाड्या सोडण्याची शक्‍यता’ - एका वाहिनीवरील बातमी. ‘रशियाचे अध्यक्ष  पुतीन यांची कन्या ‘कोरोना’ची लस टोचून घेताच अत्यवस्थ’ - एका ब्लॉगवरील मजकूर. ‘पाचशे कोरोना रुग्णांना  हैड्रोक्‍लोरोक्वीनने क्षणात बरे केले’ - आफ्रो-अमेरिकन डॉक्‍टरबाईचा व्हिडिओ. ‘व्होडका’ प्याल्यामुळे कोरोना जातो, असा व्हायरल  फोटो...  अनेकांनी हे वाचले, पाहिले, ऐकले असेल. या सगळ्यांमध्ये एकच साम्य. हे सारे ‘फेक न्यूज’चे प्रकार. मात्र साऱ्यांचे दुष्परिणाम काय झाले? ऐन ‘कोरोना’च्या महामारीत वांद्रे स्थानकावर तीन तासांत तीन हजार लोक जमा होताच गोंधळ उडाला. डॉक्‍टरांना न विचारताच अनेक रुग्णांनी घरीच हैड्रोक्‍लोरोक्वीन घेतले. एक माथेफिरू हिलरींना शोधत त्या बालवाडीत बंदुकीसह घुसला. दारूची दुकाने उघडताच ‘व्होडका’ खरेदीसाठी झुंबड उडाली...        

‘फेक न्यूज’ का व कशासाठी तयार केल्या जातात, या मागची दोन कारणे असू शकतात. पहिले वैयक्तिक, विकृत मनोवृत्तीवाल्यांना आपल्या विरोधातील व्यक्तीची बदनामी करून मिळणारा आसुरी आनंद, तर दुसरे व्यवसायिक. व्हायरल ‘फेक न्यूज’सोबत जाहिराती दाखवून पैसे कमवायचा काहींचा व्यवसाय. अमेरिकी शोधपत्रकार मार्क डाईस यांच्या ताज्या पुस्तकात ‘फेक न्यूज’चे गंभीर वास्तव समोर आणले आहे. सोशल मीडियावर ‘फेक  न्यूज’ कशा तयार केल्या जातात, याबाबत ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने एक सर्वेक्षण केले. पॉल हॉर्नर या तरुण संगणकतज्ज्ञाने दूरचित्रवाणी वाहिनीच्या नावाशी साम्य वाटतील अशा नावाच्या वेबसाइट (संकेतस्थळ) तयार केल्या व त्यावर ‘फेक न्यूज’ लिहिल्या. इंग्रजी स्पेलिंग असे बदलायचे की जेणेकरून उच्चार मात्र खऱ्या संकेतस्थळासारखा वाटावा. अशा संकेतस्थळावर कुठलीही ‘फेक न्यूज’ टाकली की ती वाऱ्यासारखी पोहोचते हा अनुभव. शिवाय समांतर उच्चारामुळे, हे बनावट संकेतस्थळ आहे, हे  अनेकांच्या लक्षातही येत नाही. ‘हे उपरोधिक लिखाण आहे’, अशी हॉर्नरची तळटीपही असायची. म्हणजे कायद्यातून पळवाट. 

केवळ कुजबुज...
‘बझफीड मीडिया’चे संपादक क्रेग सिल्वरमन यांनी अनेक संकेतस्थळांवर पाळत ठेवता, एका पाठोपाठ ‘फेक न्यूज’ पसरवणारी १४० संकेतस्थळे उघडकीस आली. तीसुद्धा कुठून तर पूर्व युरोपातील मॅसेडोनियातील वेलॉस शहरातून.अमेरिकेच्या गेल्या अध्यक्षीय निवडणुकीतील एक गंमतीशीर उदाहरण : ‘सेलेब्रिटी डॉट कॉम’ने संकेतस्थळावर हुशारीने वाक्‍यरचना करीत ‘फिनिक्‍स शहरात एका हॉटेलमधील महिला वेटरने ट्रम्प यांना अमली द्रव्य ओढताना पाहिले अशी सर्वत्र कुजबुज आहे’, चक्क अशी बातमी लिहिली. यातील हुशारी पहा, ‘मूळ बातमी आमची नाही, आम्ही केवळ कुजबुज छापली आहे’, अशी तळटीप टाकत अंग झटकले. बातमीत कोण ट्रम्प ? त्यांच्या संपूर्ण नावाचा उल्लेख नाही. शिवाय, ना बातमीदाराचे नाव, ना घटनेची तारीख वा ठिकाण. कहर म्हणजे, ‘सिक्‍स्टी मिनिट्‌स या टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रमाने ‘फेक न्यूज’ कशा तयार केल्या जातात, हे सांगण्यासाठी या व्हायरल बातमीवर चर्चासत्र ठेवले. परिणामी बोगस बातमीची देशभर चर्चा झाली. आरडाओरडा होताच, ‘हॉटेलमधील खोलीचे दार उघडताच मला ते ट्रम्प असल्याचा भास झाला आणि त्यांच्या तोंडातून वेगळ्या वासाचा धूर येत होता,’ असा हास्यास्पद खुलासा त्या वेटरने केला. अशामुळे एखाद्याची बदनामी होते, करणारा मात्र नामानिराळा राहतो.

खोट्याची चलती?
न्यूयॉर्क व स्टॅनफोर्ड विद्यापीठांनी ‘फेक न्यूज’ संदर्भात एक सर्वेक्षण केले. पहिला गंमतशीर निष्कर्ष हा होता की बहुतांश वाचक सर्वप्रथम ‘फेक न्यूज’ वाचतात. दुसरा निष्कर्ष हा की केवळ ७ ते ८ टक्के लोकच ‘फेक न्यूज’ना बळी पडतात. राजकारणी खूश होतील असा आश्‍चर्यकारक तिसरा निष्कर्ष म्हणजे निवडणूक प्रचारात ‘फेक न्यूज’मुळे उमेदवाराबद्दलचे मतदाराचे मत अजिबात बदलत नाही. धक्कादायक निष्कर्ष म्हणजे अशा बातम्यांना ज्या वेबसाईटवर सर्वाधिक वाचकवर्ग लाभतो, त्यावर अनेक कंपन्या जाहिरातींचा पाऊस पाडतात.

‘ओपन स्पेस अँड ॲक्‍सेस’च्या ॲलेकझान्द्र बॉवेल व हर्मन माकसे यांनी २०१६ च्या अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी सहा महिने, ‘ट्‌विटर’च्या १७ कोटी खात्यांमधून दोन कोटी वापरकर्त्यांच्या तीन कोटी ‘ट्‌विट्‌स’चा अभ्यास केला असता, त्यातील २५ टक्के ‘ट्‌विट्‌स’ हे ‘फेक न्यूज’ स्वरूपाचे असल्याचे उघड झाले. ‘ट्‌विटर’वरील दोन कोटी खाती ही संगणक प्रणालीद्वारे तयार केलेली आणि बनावट असल्याची कबुली ‘ट्‌विटर’ने अमेरिकी प्रशासनाच्या चौकशी समितीसमोर नुकतीच दिली.  

पेरलेल्या बातम्या
‘फेक न्यूज’च्या भयानक परिणामाचे इतिहासातले उदाहरण-  १८९८ मध्ये रॅंडॉल्फ हर्स्ट व जोसेफ पुलित्झर यांच्या वर्तमानपत्राने अमेरिकी नौदलाच्या ‘यूएसएस मेन’ नौकेने क्‍युबातील हवाना बंदर उडविले अशी  ‘फेक न्यूज’ छापली. या बातमीमुळे स्पेन - अमेरिका युद्धाला तोंड फुटले. अलीकडचे उदाहरण, इराकमध्ये सद्दाम हुसेन रासायनिक शस्त्रास्त्रांचा प्रचंड साठा करीत आहे, अशा बातम्या जगातील अनेक वर्तमानपत्रांतून ‘पेरण्यात’ आल्या होत्या. अमेरिकेने इराकवर हल्ला केल्यानंतर गल्लीबोळ शोधले तरी कुठेही रासायनिक शस्त्रास्त्रे मिळाली नाहीत.  युद्धानंतर ‘संडे टाइम्स’ व ‘बीबीसी’ने ब्रिटनचे गुप्तहेर खाते ‘एम आय-६’नेच इराकविरोधी वातावरण तयार करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या असा संशयच व्यक्त केला.  

‘फेक न्यूज’मध्ये वाहिन्याही मागे नाहीत. अमेरिकेत काही वर्षांपूर्वी न्यूजर्सीमध्ये प्रचंड पाऊस झाला. ‘एनबीसी’ चॅनेलच्या पत्रकारबाईने सहा फूट पाणी भरले आहे असे वाटावे यासाठी चक्क बोटीत बसून बातमी देण्यास सुरुवात केली. तेवढ्यात, एक लहान मुलगा, तिच्या कॅमेऱ्यासमोरून पाण्यातून सहज चालत जाताना दिसला आणि तिचे बिंग फुटले.  जर्मनीमध्ये ‘फेक न्यूज’चे प्रमाण इतके बोकाळले की जानेवारीत कायदा करण्यात आला की संकेतस्थळ वा चॅनेलवरील ‘फेक न्यूज’ त्वरित न हटवल्यास ५०० कोटी रुपयांपर्यंत दंड केला जाईल. ‘फेक न्यूज’चा वाढत चाललेला हा भयानक विषाणू आपण वेळीच नष्ट करायला हवा.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या