सूत्र..कळसूत्र.. सूत्रधार!

सूत्र..कळसूत्र.. सूत्रधार!
सूत्र..कळसूत्र.. सूत्रधार!

संस्कृत नाटकांमध्ये सूत्रधार जणू एक महत्वाची व्यक्ती असायची. तो नायक नव्हे पण पडदा उघडला की आधी त्याचा प्रवेश व्हायचा. ते नाटकातील पात्रही नसायचे.तर नाटक कसे आहे, काय आहे, ते प्रेक्षकांना नाटकाची पार्श्वभूमी तयार करणारे असायचे.पडदा उघडताच नटराजाचे पूजन,नांदी झाल्यावर मग नाटकाची प्रस्तावना सूत्रधार करीत असे. सूत्रधार हा एकटा कधीच यायचा नाही.

सध्या मिडियाच्या युगात बातम्या ऐकताना किंवा वृत्तपत्रात वाचतानाही एक शब्द नेहमी आपल्यापर्यंत येत असतो.आणि विशेषत्वाने आपले लक्ष वेधून घेत असतो.पहिल्या पहिल्यांदा हा शब्द समोर यायचा तेंव्हा आपल्याला हे सूत्र म्हणजे काय नवीन? असे वाटायचे.पण आता प्रसार माध्यमांनी तो शब्द वारंवार वापरुन अगदी गुळगुळीत केला आहे.आपण सूत्र या शब्दाला चांगलेच सरावलो आहोत.पण अर्थही नीटच लक्षात आला आहे की..!

सूत्र म्हणजे त्या संबंधीची मुख्य सूत्रे ज्यांच्या हातात असतात.. तिकडून आलेली खबर! थोडक्यात काय तर विश्वासार्ह बातमी! कधी कधी तर "विश्वसनीय सूत्रानूसार" अशीही व्दिरुक्ती करतात बातमीदार!

खरं तर सूत्र म्हणजे सूत,दोरा,धागा इत्यादी...

पूर्वीच्या काळी रंगमंचावर कळसूत्री बाहुल्यांचे खेळ होत असत.या खेळात कळसूत्री बाहुल्यांच्या हालचालीची सूत्रे वा दोऱ्या ज्याच्या हाती असत,त्याला सूत्रधार म्हंटले जाई.हा सूत्रधार स्वत: अदृश्य राहून बाहुल्या रंगमंचावर जणू स्वयंप्रेरणेने हालचाली करीत आहेत असे भासवित असे.

कळसूत्रीच्या खेळातील हा सूत्रधारच पुढे भारतीय नाटकांच्या रंगमंचावर अवतीर्ण झाला असे म्हणतात. हा सूत्रधारसुध्दा मनोरंजन कलेशीच निगडीत होता.

नाट्यप्रयोगाची सारी सूत्रे ज्याच्या हाती असत त्याला सूत्रधार असे संबोधले जाऊ लागले. भरताच्या नाट्यशास्त्रानूसार संस्कृत नाटकात सूत्रधार हा प्रयोगाचा संचालक असे.

संस्कृत नाटकांमध्ये सूत्रधार जणू एक महत्वाची व्यक्ती असायची. तो नायक नव्हे पण पडदा उघडला की आधी त्याचा प्रवेश व्हायचा. ते नाटकातील पात्रही नसायचे.तर नाटक कसे आहे, काय आहे, ते प्रेक्षकांना नाटकाची पार्श्वभूमी तयार करणारे असायचे.पडदा उघडताच नटराजाचे पूजन,नांदी झाल्यावर मग नाटकाची प्रस्तावना सूत्रधार करीत असे. सूत्रधार हा एकटा कधीच यायचा नाही.पहिल्या प्रवेशात तो जोडीने यायचा.जोडीनेच जायचा. सूत्रधार आणि नटी यांचाच पहिला प्रवेश असायचा, मग कधी मधेमधे लुडबुड करायचा, कधी पडद्याआडून बोलायचा पण भरतवाक्यापर्यंत महत्वाचे नाटकातील पात्रे, प्रसंग, दुवा जोडण्याचे त्यांचे कार्य चालू असायचे.एखादी गोष्ट घडताना प्रेक्षकांच्या मनात उठणारे प्रश्न ओळखून त्याची उत्तरे त्याच्या संवादातून मिळायची म्हणजे पात्रांच्या वागणुकीची कारण मिमांसा तो सहज बोलता बोलता करायचा असं म्हणायला हरकत नाही.अशी अनेक कामे त्याच्या संवादातून होत असत.

संस्कृत नाटकातील सूत्रधाराची परंपरा आरंभीच्या काळातील मराठी नाटकांनी उचलल्याचे दिसून येते.

किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्यसंस्थेने नाटकांमध्ये नवनवीन प्रयोग केले.आधी विष्णूदासी परंपरेने नाटकाचे प्रयोग होत असत.परंतू त्यांनी सूत्रधार आणि नटी ही संस्कृत नाटकांची परंपरा रंगभूमीवर आणली.तेंव्हा मराठी नाटकातही सूत्रधार आणि नटी दिसू लागले.

आता हाही काळ मागे पडला आणि नवीन काळाप्रमाणे नाटकातून सुत्रधार गायब झाला.

असे असले तरी हल्लीच्या मनोरंजनातसुध्दा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी,कलावंत आणि श्रोते,प्रेक्षक यांच्यामधे लागणारा दुवा आवश्यक असतो. तरी पण त्याचे सूत्रधार हे नाव कालौघात मागे पडले. निवेदक किंवा सूत्रसंचालक असे हल्ली म्हटले जाऊ लागले.

सूत्रसंचालन ही एक कला असल्याने सूत्रसंचालक किंवा निवेदक सुद्धा कलावंत आणि माहितगार असावा लागतो. हेही तितकेच जोखमीचे काम असते. काम सोपे वाटले तरी सोपे नसते.ते येरा गबाळ्याचे काम नाही. दृक-श्राव्य माध्यमांच्या मुळे त्याचे महत्त्व अधोरेखित होते. सूत्रसंचालकाने श्रोत्यांना गुंतवून ठेवणे गरजेचे असते. भावनेत वाहत न जाण्याचे भान त्याने ठेवावे लागते. कार्यक्रम खुलवता आला पाहिजे.तो वेळेत संपवण्याचे कामही त्यालाच बघावे लागते म्हणजे रटाळपणा येत नाही.तो जागृत असावा. त्याचे व्यक्तिमत्व आणि बोलणे ठाशीव असले तर श्रोते रमतात. मधूर भाषा, समर्पक शब्दयोजना करण्याचे कसब त्याच्या अंगी असावे लागते. सूत्रधाराची या काळातील ही मॉडर्न आवृत्ती अजून कार्यक्रमातील अढळ स्थान टिकवून आहे. 

पण जगाच्या आदीपासून अंतापर्यंत अख्ख्या विश्वावर अधिराज्य करणारा एकच सूत्रधार आहे. तो निवेदक वगैरे नाही. तो मनोरंजनासाठी नाही. कधी पडदा वर करायचा आणि कधी खाली पाडायचा हे त्याच्याच हाती असते. या आयुष्याच्या रंगमंचावर तो आपल्याला त्याच्या बाहुल्या म्हणून आणून सोडतो.दोऱ्या मात्र त्याच्या हाती ठेवतो. खरंतर कळसुत्रीच्या सूत्रधाराशीच त्याची तुलना करणे अधिक श्रेयस्कर नव्हे काय?

पडद्याआड राहून, माणसाच्या आयुष्यातील दोऱ्या  कधी वर खेचत तर कधी सैल सोडत, या रंगमंचावर आपल्याला क्षणभंगुर खेळात नाचवणारा,रमवणारा हा एकमेव कलाकार!...! माणसाने कितीही स्वकर्तुत्वाचा माज केला तरी त्याला जमिनीवर आणणारी कळ,दोरी केवळ याच्याच हाती असते. श्रीमंतीचा गर्व, पैसा-अडका ज्ञान, विज्ञान कोणाचीही इकडे सत्ता चालत नाही.हाच किमयागार, जगाचा नियंता!सर्व सूत्रे त्याच्याच हाती! आपण तर त्याच्या खेळातील कळसुत्री बाहुल्या!!

अरेच्या! काय गंमत आहे पहा..आपण तर अक्षरश:.. सूतावरुन.. स्वर्ग म्हणतात ना....तसे चक्क  सूत,...सूत्र,...सूत्रधार,... सूत्रसंचालक, ....कळसूत्रीला पुन्हा वळसा घालून... भगवंताच्या पायाशी येऊन पोहोचलो नाही का?लेख त्यानेच तर लिहून घेतला ना माझ्याकडून!..मजाच आहे ना?

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com