लहानपणापासूनच पोलिस गणवेशाचे आकर्षण...

गोवा पोलिस कोणत्याही परिस्थितीवेळी दिलेली कामे हाताळण्यास सक्षम आहेत.
अरविंद गावस माजी पोलिस अधीक्षक (आयपीएस)
अरविंद गावस माजी पोलिस अधीक्षक (आयपीएस)Dainik Gomantak

पोलिसाचे आकर्षण हे लहानपणापासूनच वडील पोलिस खात्यात असल्याने होते. पोलिस गणवेशबाबत खूप आकर्षण होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर पोलिस सेवेत जाण्याचा मनापासून निश्‍चय केला होता. त्यातच पोलिस खात्यातील अधिकारी विश्‍वनाथ वारिक यांचा पोलिसी ठसका माझ्या मनावर बिंबला होता. त्यांची धडाडी व दरारा तसेच त्यांची सेवा करण्याच्या पद्धतीकडे मी आकर्षित झालो. त्यांच्यापासून मला पोलिस सेवेत नोकरी पत्करण्याची स्फूर्ती मिळाली आणि मी पोलिस खात्यात 1987 साली रूजू झालो. त्यानंतर थेट उपअधीक्षक पदासाठी दिलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालो.

पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पोलिस खात्यात नोकरभरती नव्हती म्हणून मी साडेचार वर्षे शिक्षकाची नोकरी पत्करली. माजोर्डा येथील सेंट अँथनी हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले. विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे केलेले काम मला पोलिस सेवेतही उपयोगी पडले. त्या काळात मी सांगे येथील पोलिस क्वॉटर्समध्ये राहत होतो. त्यावेळी तेथील सांगे पोलिस स्थानकाचे प्रमुख विश्‍वनाथ वारीक हे होते. त्यांचा दरारा असल्यामुळे गुन्हेगार त्यांना पाहूनच पळायचे. त्यांचा पोलिसी खाक्या व रुबाब तसेच लोकांना न्याय देण्यासाठीची धडपड पाहून मी पोलिस अधिकारी बनायचे ठरवले.

1987 साली पोलिस खात्यात उपनिरीक्षक पदासाठी जागा भरण्याची जाहिरात आली आणि मी त्यासाठी अर्ज केला. मी उपनिरीक्षक पदासाठी निवडलो गेलो. महाराष्ट्रातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात मिळालेले प्रशिक्षण यातून पोलिस सेवेचा खरा अर्थ कळला. हणजूण येथील नामांकित उद्योजक वाडिया यांची बेकायदा रेव्ह पार्टी बंद करताना माझ्यावर मोठा दबाव आला. मात्र, मी म्हापसा उपअधीक्षक म्हणून ठाम राहिलो. वाडिया बंधूंना अटक करून कोठडीत डांबले. त्यामुळे माझी काही गय नाही अशी चर्चा होऊ लागली. मात्र, ‘सत्यमेव जयते’नुसार सत्याने काम केल्याचे मला समाधान होते.

Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

पोलिस खात्यात माझ्याबरोबर काम करणारे हाताखालील अधिकारी व कॉन्स्टेबल तसेच गुप्तचर यंत्रणा उत्कृष्ट होती. कोणतेच पुरावे नसलेल्या प्रकरणांचा छडा लावताना काहीवेळा स्वतःचा जीव धोक्यात घालून तपासकामात मला साथ केली. राज्यात खळबळ माजवून दिलेल्या क्रॉस प्रभंजन प्रकरणाचा छडा लावण्यास अहोरात्र मेहनत माझ्याबरोबर पोलिस पथकांनी घेतली व त्याचे फळ अखेर मिळालेच. आयपीएस ॲग्मूटमध्ये समावेश झाल्यानंतर पोदुचुरी येथे तीन वर्षे काम केले.

गोवा पोलिस कोणत्याही परिस्थितीवेळी दिलेली कामे हाताळण्यास सक्षम आहेत. सध्या संगणकाचे युग असल्याने सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. त्यामुळे राज्यात सीसी टीव्ही सर्वेलन्स तसेच सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी अत्याधुनिक उपकरणे खरेदी करण्याची गरज आहे. अजूनही राज्याची स्वतंत्र फोरेन्सिक सायंटिफिक लेबोरेटरी (एफएसएल) कार्यान्वित झालेली नाही ती लवकर सुरू होणे गरजेचे आहे. त्यामुळे डीएनए तसेच दस्तावेज तपासणी तत्पर होऊन तपासकामाची गती वाढू शकते. पोलिस सेवेत काम करताना लोकांना न्याय देऊ शकलो याचे मला समाधान आहे.

अरविंद गावस माजी पोलिस अधीक्षक (आयपीएस)

पोलिस खात्यातील अधीक्षक अरविंद कृष्णा गावस (आयपीएस) हे काल 30 सप्टेंबरला 34 वर्षांच्या सेवेनंतर पोलिस सेवेतून निवृत्त झाले. धडाडीचे तसेच कडक शिस्तीचे पोलिस अधिकारी म्हणून त्यांची खात्यामध्ये ख्याती होती. संपूर्ण सेवेतील काळात त्यांच्यावर एकही डाग लागला नाही. पोलिस खात्याच्या प्रशासनामध्ये त्यांचा हातखंडा होता. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पोलिस सेवेबाबत व्यक्त केलेले मनोगत...

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com