Human Migration: कुपगळ येथील राखेचे ढिगारे

राखेच्या ढिगाऱ्यांची ठिकाणे उत्तरेकडील मैदानी प्रदेश आणि कोकण या संपूर्ण प्रदेशात आहेत.
Human Migration
Human MigrationDainik Gomantak

गेल्या भागात आपण स्थलांतरित झालेली गुरेढोरे आणि पशुपालक यांचा प्रवास थोडक्यात पाहिला. उत्तरेकडील मैदानी प्रदेश आणि कोकण यांच्यातील लोकसंख्येच्या आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीवर अधिक प्रकाश टाकला.

एकेकाळी गुलबर्गा ते मधुगिरीपर्यंत पसरलेला आधुनिक कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशाचा काही भाग या पशुपालकांच्या संस्कृतीचा व अस्तित्वाचा मूक साक्षीदार आहे. योगायोगाने, राखेच्या ढिगाऱ्यांची ठिकाणे या संपूर्ण प्रदेशात आहेत.

राखेचे ढिगारे हे कुजलेल्या, जळलेल्या आणि हजारो वर्षांच्या कालौघात काच झालेल्या शेणाच्या थरांनी बनलेले असतात. त्यात सहसा मातीची भांडी, दगडी अवजारे आणि प्राण्यांच्या हाडांचे काही तुकडे असतात.

प्रामुख्याने ख्रिस्तपूर्व 3000 आणि ख्रिस्तपूर्व1200 दरम्यानच्या काळात, ते आकारात मोठ्या प्रमाणात बदलले. त्यांचे आकारमान 28 चौ.मी. ते 4951 चौ.मी. आणि उंची 1.5 मीटर ते 10 मीटर एवढी वाढते. आजपर्यंत 100 हून अधिक राखेच्या ढिगाऱ्यांचे दस्तऐवजीकरण केले गेले आहे. (संदर्भ : जोहानसेन, 2004 : अ रीकन्सिडरेशन ऑफ साउथ इंडियन ऍशमाउंड्स, जर्नल ऑफ अँथ्रोपोलॉजिकल आर्किऑलॉजी, 23, 309)

त्यांच्या उत्पत्तीबद्दल विपुल प्रमाणात लोककथा उपलब्ध आहेत. त्यांपैकी काही वालीचे अवशेष आहेत असे मानले जाते(रामायणातील किष्किंधा राज्य ज्यावर वालीचा भाऊ सुग्रीव राज्य करत असे). राक्षसांचे ते अवशेष असावेत असेही काही लोककथा सांगतात. इतर लोक त्यांना मोठ्या प्रमाणावर स्मशानभूमी मानतात. प्रारंभी पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या मते कचरा कुंड्या, गुरांचे गोठे, चुना-वीट-काच-लोखंड यांचे ढिगारे किंवा जळलेल्या शेणाचे ढिगारे असावेत.

असंख्य ठिकाणी विस्तृत उत्खनन केल्यानंतर आणि ढिगाऱ्यांच्या सामग्रीची रासायनिक तपासणी केल्यानंतर, आता हे सर्वमान्यपणे स्वीकारले गेले आहे की, राखेचे ढिगारे हे शेणाच्या ढिगाऱ्यांचे अवशेष आहेत जे अनंतकाळ सातत्याने साचत गेले.

ढिगाऱ्याच्या सुरुवातीच्या थरांमध्ये सरळ रेषेतील खड्डे, त्यानंतर काही ढिगाऱ्यांच्या परिघाभोवती उभारलेले शेणाचे बांध यावरून कदाचित शेणाचे ढिगारे विधीपूर्वक जाळले जात असावेत या गृहीतकाला बळकटी प्राप्त होते.

राखेच्या ढिगाऱ्यांचे काचमणी किंवा गारगोटीच्या स्वरूपात परिवर्तित होणे हे पेंढा/गवताचे तुकडे/शेणातील कणांमध्ये सिलिकाच्या उपस्थितीमुळे असू शकते. सिलिका वितळून मिसळण्यासाठी एवढे तापमान कसे तयार केले गेले, हा खरा प्रश्‍न आहे.

पुष्कळ स्थळांवरील राखेच्या ढिगाऱ्यांचे थर तपासले असता, 1200 सेंटिग्रेड तापमानात अनेकवेळा जाळले गेले असल्याचे समोर येते. शेणाच्या थरांमधील जवळजवळ निर्जंतुक मातीचे पातळ आणि विस्तीर्ण स्तर अनेक जागांवर आढळले आहेत. प्रत्येक हंगामी / वार्षिक वापरानंतर, शेणाचा ढीग मातीने आच्छादित केला जात असे.

गुरांच्या गोठ्यापासून गाईर (शेण टाकण्याची जागा) दूर असे. अनेक जागे राखेच्या ढिगाऱ्यांची जागा मानवी वस्तीपासून खूप दूर असल्याचे आढळले आहे. घरगुती वापराच्या भांड्यांचे अवशेष ढिगाऱ्यांजवळ अभावानेच आढळले, जे इतरत्र म्हणजे ढिगारे नसलेल्या ठिकाणी विपुल प्रमाणात आढळले आहेत. यावरून ढिगारे तयार करण्याची जागा आणि निवासाची जागा दूर असावी, असा निष्कर्ष निघतो.

राखेच्या ढिगाऱ्यांच्या संरचनेत आणि स्थानामध्ये गुरांच्या कळपांच्या गतिशीलतेबद्दल मूलतः दोन गृहीतके आहेत. एक म्हणजे शेतकरी आणि पशुपालकांच्या सहजीवन गरजांशी जुळवून घेण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कळपांची हंगामी हालचाल.

फुलर यांनी नोंदवलेल्या संगनकल्लूच्या प्रकरणावरून हे उत्तम प्रकारे स्पष्ट होते. संगनकल्लू गावात दोन राखेची स्थळे आहेत, त्यापैकी एक डोंगरमाथ्यावरील दोन वस्त्यांमधील एका शिखरावर एक लहान टेकडीचा ढिगारा आहे आणि दुसरा कुपगळ येथे तीन मोठ्या ढिगाऱ्यांचा समूह आहे.

फुलरच्या म्हणण्यानुसार या राखेच्या ढिगाऱ्यांचा पुरातत्त्वीय अभ्यास हे सांगतो की, या ढिगाऱ्याभोवतालची वस्ती फिरस्त्या लोकांची होती व येथे बियाण्यांच्या खाद्यपदार्थांवर प्रक्रिया केली जात नसे. तेथील त्यांचा निवास व गुरांचे गोठे तात्पुरत्या स्वरूपाचे होते. अशा हंगामी वस्त्या पावसाळ्यानंतर (ऑक्टोबर-नोव्हेंबर) कापणीच्या काळात त्या ठिकाणी वसल्या असण्याची शक्यता आहे, जेव्हा कापणीसाठी अतिरिक्त मजुरांची गरज भासली असावी आणि नुकत्याच कापणी केलेल्या शेतात गुरेढोरे चरत असतील.

याउलट, पीक बहरण्याच्या हंगामात या वस्त्यांना व गुरांना तेथून जावे लागत असावे. कापणीचा काळ हा बहुधा सणांचा काळ होता आणि वरवर पाहता राखेवर शेण जाळण्याचा विधी याच काळात झाला असावा.

हिवाळ्याच्या महिन्यांत कोरडा ऋतू जवळ आला की, गुरेढोरे कदाचित पशुपालकांसह गावांभोवतीच्या विस्तृत प्रदेशात वस्ती करत. कोरड्या हंगामात पशुपालकांनी वेगळ्या ठिकाणी तळ ठोकलेला दिसतो. जिथे त्यांची गुरे पुन्हा ठेवली गेली, तिथे शेण जमा झाले आणि नंतर ते जाळले गेले.

या विखुरलेल्या छावण्यांचे अवशेष कोणत्याही कायमस्वरूपी निओलिथिक खेड्यांपासून दूर असलेल्या अनेक विलग पडलेल्या राखेच्या ढिगाऱ्यांमध्ये आढळतात. (संदर्भ : फुलर, २००० : ऍशमाउंड्स अँड हिलटॉप व्हिलेज - द सर्च फॉर अर्ली ऍग्रिकल्चर इन सदर्न इंडिया, आर्किओलॉजी इंटरनॅशनल, ४, ४५)

एका वर्षात गुरांच्या कळपांची लांब पल्ल्याची हालचाल, हे गृहीतक आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. सिंधू-सरस्वती मैदान आणि दख्खन दरम्यान फिरणारी गुरेढोरे ही लक्षपूर्वक अभ्यासण्याची बाब आहे. हे स्थलांतर बहुधा कुरण सुकले आहे तिथून, जिथे हिरवे कुरण उपलब्ध असेल त्या ठिकाणापर्यंत झाले.

या प्रवासात त्यांनी अशा जागा निवडल्या जिथे त्यांची गुरेढोरे जंगली श्‍वापदांपासून सुरक्षित राहतील. सर्वांत मनोरंजक गोष्ट अशी आहे की, हे स्थलांतर केवळ ताज्या कुरणांच्या शोधासाठी झाले नाही. व्यापारासाठीही हे फिरस्ते पशुपालक एका जाग्यावरून दुसऱ्या जागी जात असत. त्यांनी सिंधू-सरस्वती मैदानातील उत्पादने दख्खनच्या बाजारपेठेत नेली.

कदाचित कोलारमधील सोनेही या व्यापाराचा एक भाग असू शकते. सोन्याबरोबर अनेक मौल्यवान रत्नांचाही व्यापार ते करत असावेत. अर्थातच दोन भिन्न संस्कृतींमधून विविध प्रकारच्या घरगुती वस्तूंची देवाणघेवाण झाली असावी. सिंधू-सरस्वती खोऱ्यातून दख्खनपर्यंत या काफिल्यांनी गहू आणि जव नेले असावे.

या गुरांच्या फिरत्या कळपांनी दोन सहस्राब्दी किंवा त्याहून अधिक काळ लागून नर्मदा ओलांडली. निश्चितपणे त्यांनी एका संस्कृतीचे घटक दुसऱ्या संस्कृतीपर्यंत नेले. गुराढोरांचे, मानवांचे आणि संस्कृतीचे आदानप्रदान त्यांच्या फिरस्त्यातून झाले.

राखेच्या ढिगाऱ्यांसारखे, गुरेढोरे यांच्या स्थलांतराचे व प्रसाराचे पुरावे हे केवळ त्यांच्याच स्थलांतराचे पुरावे नाहीत, तर दख्खनमध्ये गंगा-सिंधू मैदानातून इतरत्र गेलेल्या क्षत्रियांच्या स्थलांतराचेदेखील पुरावे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com