दृष्टिकोन

dainik gomantak
बुधवार, 17 जून 2020

खरंच का हो तुम्हाला असे वाटते की वीज खाते मुद्दाम वीजपुरवठा बंद करतात किंवा वीज गेल्यावर तत्परतेने काम करून आम्हाला वीजपुरवठा सेवा सुरळीत करून देत नाहीत ? मित्रांनो, तर आता थांबा सांगतेच तुम्हाला, अशी म्हण आहे की, 'पाण्यामध्ये मासा निद्र घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' म्हणजेच त्या माणसाच्या जागेवर उभं राहून पहा म्हणजे तुम्हाला कळेल की, वास्तव काय आहे. नंतर तुम्हाला त्याची बाजू पटेल.

सौ. नीलम महेंद्र ऊस्कैकर
..............................
दृष्टिकोन

नचिकेतचा वाढदिवस ऐन रंगात आला होता. घरात निवडक पै-पाहुण्यांच्या, मित्रांच्या गप्पा विनोदांना अगदी उधाण आले होते. एकामागून एक छोटेखानी कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. कुणी अंताक्षरी, तर कुणी
विविध खेळांच्या फर्माइशी करत होते आणि त्यातीलच काही हौशी कलाकार त्या पूर्ण ही करत होते. पार्टी मात्र
घरच्याघरी होती, कारण लॉकडाऊन होते ! पण आप्तांच्या सहवासात खूप छान, उत्साही वातावरणात खूप
दिवसांनी प्रत्येकाला अगदी ताजेतवाने वाटत होते.
...आणि अगदी अचानक दुधात मिठाचा खडा पडावा तशी झटकन वीज गेली. रंगाचा बेरंग झाला. वातानुकूलित यंत्रणा बंद, पंखे बंद, ध्वनियंत्रणा बंद सर्वत्र काळोखाचे साम्राज्य ! त्यात मिणमिणत्या मेणबत्त्या
मदतीला धावून आल्या ही जमेची बाजू पण सदैव झगमगाटाची सवय असलेल्यांना तो प्रकाश पचनी पडेना.
झालं मिनिटागाणिक यजमानांचा पारा चढायला लागला त्यात उकाड्याने जीव हैराण होऊ लागला. ठेवलेली
एकही वस्तू जागेवर सापडत नव्हती आणि या सगळ्याचं खापर वीज खात्यावर फोडले जात होते. शेवटी वीज
खात्याला फोन लावण्यात आला. अगदी उद्धट भाषेत वीजेबद्दल विचारणा करण्यात आली... हे एक सर्रास
उदाहरण आहे सध्याचं..
खरंच का हो तुम्हाला असे वाटते की वीज खाते मुद्दाम वीजपुरवठा बंद करतात किंवा वीज गेल्यावर तत्परतेने काम करून आम्हाला वीजपुरवठा सेवा सुरळीत करून देत नाहीत ? मित्रांनो, तर आता थांबा सांगतेच तुम्हाला, अशी म्हण आहे की, 'पाण्यामध्ये मासा निद्रा घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' म्हणजेच त्या माणसाच्या जागेवर उभं राहून पहा म्हणजे तुम्हाला कळेल की, वास्तव काय आहे. नंतर तुम्हाला त्याची बाजू पटेल.
छोटासा आपला गोवा, महाराष्ट्र व कर्नाटककडून वीज विकत घेतो पण दरदिवशी दिवाळीच आहे की काय
असा जणू भास व्हावा इतका लखलखाट गोव्यात असतो. महाराष्ट्रात तसेच कर्नाटकात दर आठवड्यात एक दिवस भारनियमन असते, पण गोव्यात मात्र सगळे आलबेल असते. त्यामुळेच कदाचित आपल्याकडे तो संयम कमी असावा...तरी असो.
खरंतर वीज गेल्याबरोबर वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे वीज कर्मचारी प्राप्त माहितीनुसार नादुरुस्त जागी पोचतात ...तिथे काही त्यांना गेल्यागेल्या लगेच दोष मिळत नाही तर प्रत्येक खांबावर चढून तो त्यांना शोधावा
लागतो ही इतकी किचकट प्रक्रिया आहे की त्याची कल्पनाच न केलेली बरी. कर्मचारी वर्ग खांबावर चढून दोष
शोधून वीजपुरवठा सुरळीत करण्यात गुंतलेला असताना कधी कधी एखादी दुर्घटना घडून म्हणजेच चुकून
एखाद्या ठिकाणच्या जनित्राचा 'रिटन सप्लाय' येवून वीजेचा झटका लागून तो कर्मचारी तिथेच गतप्राण
होऊ शकतो किंवा कायमचा अपंग होऊ शकतो. जीवाची बाजी लावून लढवणारे फक्त सैनिकच नसतात तर हे अगदीच कुणाच्याही लक्षात न येणारे वीज कर्मचारी सुद्धा असतात.
गावागावातून अशा काही जागा असतात जिथे वीजवाहिन्या शेतातून गेलेल्या असतात. गुडघाभर चिखलमिश्रित पाण्यात त्यांना सर्व साहित्य म्हणजे शिडी, वायर व दोरी घेवून शेतात उतरावे लागते. बरं चिखल इतका असतो की त्याची शिडी पण त्यात नीट उभी न राहता आत आत रुतत जाते तरीही कसलीही कुरबुर न
करता त्यांना दिलेले काम फत्ते करावेच लागते. जो पर्यंत ते पूर्ण होत
नाही तो पर्यंत जेवणाचा वेळ झाला
किंवा घरी जायची वेळ झाली तरी त्याची तमा न बाळगता ते आपले काम सुरूच ठेवतात, कारण आपल्या
इतकीच त्यांनाही वीजपुरवठा सुरळीत होण्याची काळजी असते आणि हे त्यांचे काम कुणाच्याही लक्षात येत नाही किंवा त्याची साधी वाहवाही देखील होत नाही...
जुने गोवे, कुंभारजुवे यासारख्या भागातील पाण्यात मगरींचे वास्तव्य आहे तरीही त्यांना आपली सेवा चोख बजावावी लागते. काही काही वीजवाहिन्या तर जंगल सदृश भागातून गेलेल्या आहेत. जिथे रानडुक्कर, भटकी पिसाळलेली कुत्री, सरपटणारे सापासारखे प्राणी यांच्यापासून बचाव करत आपला जीव धोक्यात
घालूनही हे वीज कर्मचारी आपले कार्य तडीस नेतात. बरं काही वीजवाहिन्या स्मशानभूमी जवळून गेलेल्या असतात म्हणून रात्रपाळीचे कर्मचारी वीज गेली की असे म्हणत नाहीत की आत्ता खूप रात्र झाली आहे वेळ पण खूप झालाय आम्हाला भीती वाटतेय, आम्ही उद्या सकाळी जाऊन बघतो. उलट, तत्परतेने आपल्या कामाबद्दल कसलीही कुरबुर न करता रवाना होतात. त्यांच्यामुळेच रात्री आपण थंड वाऱ्याखाली छान झोपू शकतो. आपली दैनंदिनीच मुळी विजेवर अवलंबून असते.
आज कोरोना काळात पोलिस, नर्स, डॉक्टर्स, सफाई कर्मचारी सर्वांच कौतुक होतंय आणि व्हायलाही हवं..
पण जरा अंतर्मुख होऊन विचार करा..लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेत वरील घटकांबरोबर त्यांच्या
खांद्याला खांदा लावून वीजखाते नव्हते का हो आपलं कर्तव्य बजावत..? तरीही का म्हणून त्यांच्या कार्याचा साधा उच्चारही प्रसार माध्यमांनी करू नये ? समजा कंटेनमेंट झोनमध्ये लाईट गेली तर तिथे वीजखात्यातील कर्मचारी जाणार नाहीत का ? की भीतीपोटी तिथे जाण्यास नकार देणार...?
या लेखा मागचा हेतू इतकाच की, वीज गेली की अगदी त्रागा करून आपला संयम न सोडता वीज खात्याला
शिव्यांची लाखोली न वाहता, त्यांच्या कामाला त्यांच्या अडचणींना, प्रसंगी त्यांना समजून घ्यावे हा आहे. आणि
हो... जशी आपल्याला वीज लवकर आलेली हवी असते तशीच ती त्यानां ही लवकर सुरळीत करायची असते हे लक्षात घ्या आणि आपला पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन सुधारावा ही विनंती !
वाचकहो, कोरोना काळातील जुन्याच शिलेदारांची नव्याने केलेली ओळख तुम्हाला नक्कीच आवडली असेल
अशी अपेक्षा करते. निदान वीजखात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जरी बदललात तरी खूप आहे. धन्यवाद !

संबंधित बातम्या