गोव्यातील मंत्र्यांचा ‘ब्लेमगेम’ सुरू

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 6 मे 2021

गोवा राज्यात ‘कोविड’चे थैमान सुरू असल्याने आता कसे जगावे, असा प्रश्‍न अनेकांना भेडसावत आहे. अनेक ग्रामपंचायतींनी, नगरपालिकांनी लॉकडाऊन घोषित केले आहे. त्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोविडचे रुग्ण वाढत आहेत, मृत्यू अधिक होत आहेत, तरीही राज्य सरकार गांभीर्याने घेत नाही. अंशत: लॉकडाऊन करून सरकारने(Goa) पाहिले. पण काही फरक पडला नाही. नंतर पुन्हा काही गोष्टींवर निर्बंध लादले. तरीही परिस्थितीत काही फरक पडला नाही. यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांना आपणहून पुढे यावे लागले आहे. (Blame game between CM and health minister over oxygen shortage)

विरोधी पक्षाच्या आमदारांनीही एकजुटीने संपूर्ण लॉकडाऊनची(Lockdown) मागणी सरकारकडे केली. सत्ताधारी पक्षातील काही आमदार, मंत्रीही अशीच मागणी करतात. काही ठिकाणी लॉकडाऊन केले गेले त्यात निर्णय घेण्यात आमदार, मंत्री आघाडीवर होते. समोरची परिस्थिती आणि लोकांचा आग्रह यामुळे लोकप्रतिनिधींना असे पाऊल टाकण्यास प्रवृत्त केले गेले. राज्य सरकार मात्र तसा निर्णय घेत नाही. नाहक लॉकडाऊन करून अत्यावश्‍यक सेवेत अडथळा येऊ शकतो, अशी भीती मुख्यमंत्री प्रमोद सावंत(pramod sawant) यांनी व्यक्त केली आहे. आमदार, मंत्री यात का पडतात, असा प्रश्‍नही त्यांनी केला आहे. भाजपचेच आमदार, मंत्री लॉकडाऊनचा पवित्रा घेतात याचा अर्थ त्यांचा सरकारवर विश्‍वास राहिला नसावा किंवा मुख्यमंत्र्यांवर तरी भरवसा नसावा.

सूर नवा ध्यास नवाचं गोव्यातील शूटिंग बंद; सेटवर कार्यकर्त्यांचा राडा 

अन्यथा सरकार एक भूमिका घेते आणि हे लोकप्रतिनिधी जनहितार्थ वेगळी भूमिका घेतात, असे घडले नसते. राज्यात उद्‍भवलेली आणीबाणी पाहून मुख्यमंत्री सावंत हे आता भांबावलेले आहेत, तरीही धीराने काम करीत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांत त्यांनी आरोग्य खात्याची सूत्रे आपल्या हाती घेत उपाययोजनांचा आढावा ते घेत आहेत. सर्व गोष्टींवर देखरेख ठेवत आहेत. हे अगोदर झाले असते तर आजच्या एवढी परिस्थिती दिसली नसती. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी अनेक सूचना केल्या. पण त्या गांभीर्याने घेतल्या नाहीत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना काहीवेळा पत्र लिहून आवश्‍यक बाबींवर निर्णय घेण्याकडे लक्ष वेधले. मात्र तिथे दुर्लक्ष झाले, असे एक चित्र समोर आले आहे. गेले काही दिवस कोविडबाधित रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे.(Blame game between CM and health minister over oxygen shortage)

दलबदलू आमदारांवर गुन्हा दाखल करा; गिरीश चोडणकर 

काही रुग्ण ऑक्सिजनवाचून तडफडून मृत्यू पावले. रुग्णांच्या नातेवाईकांचे हे विदारक अनुभव ऐकताना मन हेलावते. सरकार असंवेदनशील असल्याची रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची भावना बनली आहे. ऑक्सिजन तुटवड्यावरून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यात सुसंवाद नव्हता, योग्य समन्वय नव्हता हेही उघड झाले. एकमेकांवर ढकलून देत ‘आपण चुकलो नाही’, असा पवित्रा घेतला गेला तेव्हा या मंत्र्यांना रुग्णांचे पडून गेले नाही, असे वाटल्यावाचून राहिले नाही. एकीकडे रुग्ण तडफडताहेत, खाटा पुरत नाहीत आणि ‘ब्लेमगेम’ सुरू आहे, हे काही चांगले लक्षण नाही. सरकार संवेदनशील असायला हवे. राज्यात काय चालले हे मुख्यमंत्र्यांना माहीत नसावे, हे आश्‍चर्य. त्यातल्या त्यात आरोग्य आणीबाणी सुरू असताना गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात तसेच अन्य इस्पितळांमध्ये काय स्थिती आहे, काय त्रुटी आहेत याची जाणीव नसावी हे दुर्दैवी आहे. शेवटच्या क्षणी धावपळ केली जात आहे. 

सर्व साधनसुविधा निर्माण होईपर्यंत आणखी किती जणांचा बळी जाणार आहे, रुग्ण किती वाढतील याचा अंदाज करता येत नाही. मृत्यूच्या खाईत ढकलण्याचा हा प्रकार, असे लोकांना वाटणार नाही कशावरून? मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांप्रती नुसते अश्रू ढाळले म्हणून काही मृत्यू पावलेली माणसे परत येणार नाहीत. पण संभाव्य बळी रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न झाले तर निदान अनेकांचे जीव वाचतील. त्या रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा दुवा तरी मिळेल. कोविडच्या महामारीत अनेकांना राजकारण करून आपली पोळी भाजायची आहे. सत्ताधारी पक्षातील आमदार आतानासिओ मोन्सेरात यांना इतके दिवस आरोग्यक्षेत्रात काय चालले आहे याची कल्पना नव्हती, असे नव्हे, पण राज्यात कोविडस्थिती बिघडत चालली असताना आरोग्यखात्यात खेळखंडोबा सुरू आहे, अशी टीका करण्याची त्यांना उपरती झाली. त्यांनी जी दोषारोप करण्यासाठी वेळ साधली ती चुकीची आहे. आज सर्वच आमदारांनी संघटित होत उपाययोजना करण्यासाठी हातभार लावायची गरज आहे. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे हे अकार्यक्षम आहेत, असे वाटत होते तर तेव्हाच मुख्यमंत्री अथवा भाजप नेत्यांकडे तक्रार करायला मोन्सेरात यांचे कोणी हात धरले होते का? काही मंत्री काहीच कामाचे नाहीत, असा आरोपही ते करतात.(Blame game between CM and health minister over oxygen shortage)

GOA COVID-19: कोरोनाची लागण झालेल्या 638 जणांचा आरोग्य यंत्रणेला पत्ताच नाही 

कठीण काळात ते जे काही सांगत आहेत ते खरे आहे, असे क्षणभर मानले तरी मग मुख्यमंत्र्यांना त्यांचे सहकारी काय करतात हे माहीत नाही किंवा मुख्यमंत्री अकार्यक्षम मंत्र्यांना सांभाळून घेतात, असा त्यातून अर्थ काढता येतो. म्हणजेच मुख्यमंत्र्यांवरही आमदार मोन्सेरात यांचा विश्‍वास नाही. भाजपमध्ये सत्ताकांक्षेने शिरलेल्या काही आपमतलबी आमदारांमुळे भाजप सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडत आहेत. केवळ सत्ता हेच लक्ष्य असलेले असे आमदार नको त्यावेळी राजकारणात ढवळाढवळ करतात तेव्हा सरकारचे लक्ष विचलित होते. आधीच कोविडमुळे चिंता आहे, त्यात अशा स्वार्थी राजकारणाचा शिरकाव झाला की मग सरकार प्रमुख कुठे कुठे लक्ष देणार?

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे स्वत: वैद्यकीय पार्श्वभूमी असलेले आहेत. त्यामुळे आरोग्यसेवेत सुधारणा करण्यासाठी त्यांना अधिक काही सांगायची गरज नाही. पण, सध्या जे चित्र दिसते आहे ते बदलण्याची नितांत आवश्‍यकता आहे. रोज माणसे अधिक संख्येने मरताहेत, हे काही चांगले लक्षण नाही. लोक उशिरा उपचारांसाठी येतात, अंगावर काढतात यावरून रोज दोष देणे आता बंद व्हायला हवे. सरकारने प्रशासनाला कामाला लावले पाहिजे. 

रुग्ण शोधून काढण्यासाठी यंत्रणा निर्माण करायला हवी. गावागावांतून सर्वेक्षण झाले, गृहअलगीकरणात असलेल्यांची माहिती रोजच्या रोज गोळा झाली, त्यांच्या तब्बेतीत काही चढ-उतार आहे काय, याविषयी काही कळाले तर योग्य उपचार करणे सोपे होईल. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ आणि कोविड इस्पितळांवर येणार ताण कमी करण्यासाठी अधिक लक्षणे नसलेले किंवा गंभीर नसलेल्यांची सोय काही इस्पितळांमध्ये करण्यासाठी पावले उचलली गेली आहेत हे बरे झाले. निदान या प्रमुख इस्पितळांमध्ये गर्दी होणार नाही. अजूनही कोविडचा उद्रेक वाढण्याचा धोका काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी आपण सज्ज असायला हवे. ऑक्सिजन कमतरतेमुळे काय बाका प्रसंग ओढवला याचा अनुभव गाठीशी ठेवून पुढील नियोजन करायला हवे. खाटा वाढवताना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर तसेच अन्य सेवकवर्गही कमी पडू नये यासाठीचे व्यवस्थापन व्हायला हवे. 

आता मागे वळून न पाहता प्रत्येक जीव वाचवायचा आहे, या इराद्याने सरकारने पुढे जायला हवे. डॉक्टर तसेच अन्य सेवकवर्गाला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या अडचणीही लागलीच सोडवण्यावर भर द्यायला हवा. ज्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या जिवावर आपण कोविडचा लढा लढण्यासाठी पुढे सरसावलो आहोत, त्यांच्याकडेही प्राधान्याने लक्ष पुरवायला हवे. लोकांनीही आपली जबाबदारी अधिक गांभीर्याने पार पाडायला हवी. बेपर्वाई पुरे झाली. आपण जरा जरी चूक केली तर ती जिवावर बेतू शकते, हे ध्यानात ठेवायला हवे. इस्पितळांमधील जागा, वैद्यकीय कर्मचारी मर्यादित आहेत. रुग्ण वाढले तर उपचार करण्याचे व्यवस्थापन कोलमडणार आहे. म्हणूनच सर्व ती काळजी आणि दक्षता बाळगणे हे लोकांच्या हातात आहे. त्यात कमी पडू नका. प्रत्येकाला जगायचे आहे. आपल्यामुळे कोणी अडचणीत येणार नाही, यासाठी सतर्क राहणे यातच सर्वांचे भले आहे.

संबंधित बातम्या