मोबाईलवर मिळेल ब्रेन स्ट्रोकची पूर्वसूचना

मोबाईलवर मिळेल ब्रेन स्ट्रोकची पूर्वसूचना
blog on brain strokes

सम्राट कदम

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक दुर्धर आजारांनी माणसाच्या शरीरात घर केले आहे. अचानक उद्‌भवलेल्या आजारांमुळे व्यक्ती प्रसंगी मृत्यूच्या दारात गेल्याचे दिसते. हृदय, यकृत, फुफ्फुस आणि मेंदू अशा नाजूक अवयवांशी निगडित आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. हृदयविकाराच्या झटक्‍याबरोबरच मेंदूला बसणारा झटका म्हणजेच ब्रेन स्ट्रोकचे प्रमाणही वाढले आहे. आहाराची पद्धत, मानसिक ताणतणाव, व्यसन आणि व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळे दिवसेंदिवस अशा आजारांनी मानवी आरोग्याला विळखा घातला आहे. हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोक हे दीर्घकाळ परिणाम करणारे विकार आहेत. त्यांची पूर्वसूचना वेळेत मिळाली तर ते टाळणे शक्‍य आहे. आजवर ब्रेन स्ट्रोकचा बाह्य लक्षणांच्या आधारे अंदाज बांधला जात होता, परंतु आपत्कालीन स्थितीत त्याचा काही फायदा होत नाही. शास्त्रज्ञांनी आता एक असे उपकरण विकसित केले आहे, की जे ब्रेन स्ट्रोक येण्याआधी स्मार्ट फोनच्या माध्यमातून इशारा देईल. अमेरिकेतील पेन स्टेट आणि ह्यूस्टन मेथॉडिस्ट हॉस्पिटल येथील संशोधकांनी ही प्रणाली विकसित केली आहे.

मेंदूला ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी झाल्यास मेंदूच्या पेशी मृत होतात. परिणामी मेंदूच्या कार्यप्रणालीत अडथळा निर्माण होतो. स्ट्रोकला पॅरालिसीसचा ॲटॅक किंवा पक्षाघात असेही म्हणतात. मेंदूतील रक्तसंचारात अडथळा निर्माण झाल्यास किंवा धमनी अथवा रक्तवाहिनी फुटल्यास कायमस्वरूपी मज्जातंतूची हानी होऊन मृत्यू होऊ शकतो. स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी चारपाच तासांच्या आत उपचार होणे गरजेचे आहे. बोलायला आणि समजण्यात अडथळा निर्माण होणे, चेहरा, हात, पाय आदी सुन्न होणे, अंधूक दिसायला लागणे आदी स्ट्रोकपूर्वीची लक्षणे आहेत. या लक्षणांकडे व्यवस्थित लक्ष दिल्यास त्याची पूर्वसूचना मिळू शकते. शास्त्रज्ञांनी अशाच लक्षणांवर लक्ष ठेवणारी प्रणाली विकसित केली आहे. पेन स्टेटचे माहितीशास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. जेम्स वॅंग म्हणतात, ‘‘रुग्ण प्रत्येक मिनिटाला स्ट्रोकची लक्षणे अनुभवत असतो तेव्हा त्याचे निदान होणे गरजेचे आहे. कारण नंतर स्ट्रोक आल्यानंतर आपत्कालीन विभागातील डॉक्‍टरांना परिस्थिती हाताळणे हाताबाहेर जाते. पुढे न्यूरोलॉजिकल सर्व्हे, रेडिओॲक्‍टिव्हिटी बेस पाहणी करणे अवघड जाते.’’ डॉ. वॅंग आणि संशोधकांच्या चमूने माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे एक संयंत्र विकसित केले आहे. जे पूर्वसूचना तर देतेच, पण त्याचबरोबर जलद निदानही करते.

व्यक्तीची बोलण्याची पद्धत, चेहऱ्यावरील हावभाव आणि हालचालींचे अध्ययन करून ही प्रणाली स्ट्रोकचे निदान करते. यामुळे आपत्कालीन स्थितीत डॉक्‍टरांना जलद निर्णय घेण्यास मदत होते. तसेच रुग्णालाही हॉस्पिटलला जाण्यापूर्वी आवश्‍यक ती खबरदारी घेणे शक्‍य होते. ब्रेन स्ट्रोकसारख्या आपत्कालीन स्थितीमध्ये प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झाला आहे. यामुळे अचूक पूर्वसूचना आणि निदान शक्‍य झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे प्रणाली विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विदा संचांची (डेटा सेट) गरज पडते. शास्त्रज्ञांनी टेक्‍सासमधील ८० ब्रेन स्ट्रोक रुग्णांच्या माहितीचा वापर केला. त्यांचे बोलणे, हावभाव आणि हालचालींच्या नोंदींचा वापर यात करण्यात आला आहे. प्रत्यक्ष प्रणालीचा वापर करण्यात आला तेव्हा ७९ टक्के अचूक निदान केल्याचे सीटी स्कॅनच्या साह्याने सिद्ध करण्यात आले. मेंदूत कोट्यवधी चेतापेशी आहेत. त्यांच्या कार्यात झालेला बिघाड मानवी मेंदूवर मोठा परिणाम करतो. माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित ही प्रणाली अशा चेतापेशींच्या कार्यक्षमतेवर लक्ष ठेवणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या या प्रणालीचा अधिक परिणामकारक वापर करण्यासाठी अजून प्रयोग करावे लागतील.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com