भय इथले संपत नाही..!

तरी मन मात्र त्या अंतिम सत्याच्या समीप येण्याच्या जाणिवेने काहीसे हादरले होते. अनंतात विलीन होण्याचे ते भय मनाला व्यापून राहिले खरे. पुन्हा पुन्हा तोच विचार मधुसंचयापासून दुरावलेल्या मधमाशीच्या अस्वस्थ विलापासारखा कर्णपटलाशी सलगी करू लागला.
भय इथले संपत नाही..!
BlogDainik Gomantak

डॉ. मनोज बोरकर

गेल्या महिन्यात मी माझ्या जीवनयात्रेतला आणखीन एक टप्पा पार केला आणि मला लाभलेले आयुष्य एका वर्षाने सरल्याची बेचैन करणारी जाणीव मन कुरतडू लागली. माझे अभिष्टचिंतन करणारे माझे कुटुंब, आप्तजन, मित्रपरिवार आणि सहकारी चिंतेच्या सुरकुत्यांनी व्यापलेल्या माझ्या मुखमंडलावर स्मिताची लकेर कोरू पाहात होते.

तरी मन मात्र त्या अंतिम सत्याच्या समीप येण्याच्या जाणिवेने काहीसे हादरले होते. अनंतात विलीन होण्याचे ते भय मनाला व्यापून राहिले खरे. पुन्हा पुन्हा तोच विचार मधुसंचयापासून दुरावलेल्या मधमाशीच्या अस्वस्थ विलापासारखा कर्णपटलाशी सलगी करू लागला.

वाढदिवस साजरा करण्याची ही पद्धतच मला जीवनक्षयाच्या उत्सवासारखी वाटते, हे प्रामाणिकपणे सांगायला हवे. सरत्या संचिताचा उत्सव कोणी साजरा करतो का?

Blog
फोंड्यात पाईप्सना आग लागल्याने लाखोंची हानी

मानवी मनोव्यापारांत मृत्यूची धास्ती इतकी नित्यवासी असते की आपण कधी तरी मरणार ह्या भयाने जीवन नावाचा महोत्सव मनःपूर्वक साजरा करण्याचेही विसरून जातो. मरणाच्या नुसत्या कल्पनेनेच आपली सारासार बुध्दी कुंठीत होते आणि विवेकाला विराम मिळतो.

हे भय आयुष्यभर आपल्या जाणिवेंत संस्कारित केले जाते, आपले आप्तस्वकीय आपला निरोप घेतात तेव्हा ते अधिक खोलवर जाऊन बसते. मरणाचे भय सर्वांनाच वाटते, कारण त्या अगम्य प्रदेशाच्या प्रवासातून माघारी आलेले कुणी आपल्याला माहीतच नसते.

ऐंद्रिय संवेदनाच्या आहारी गेलेल्या आपल्यातल्या काहींना मरण म्हणजे त्या सुखांचा असह्य परित्याग वाटतो. मरणाचे संदर्भ आणि परिप्रेक्ष्य वेगवेगळे असतात; कोण निवर्तले किंवा कोण मरणाच्या समीप आहे, यावर ते अवलंबून असतात.

आपल्या वाट्याला येणाऱ्या वेदना अणि दुःख संबंधित व्यक्ती आपली किती प्रिय होती, आपल्याला किती निकट होती, यावर अवलंबून असते. त्या व्यक्तीचे आरोग्य, वय आणि ज्येष्ठत्वही आपल्या दुःखाची व्याप्ती ठरवते.

जेमतेम आठ वर्षांचा असताना मला मरणाच्या भयव्याकुळ अस्तित्वाची जाणीव झाली. नाजूक प्रकृती असलेल्या आणि वारंवार वैद्यकीय उपचारांची गरज भासणाऱ्या माझ्या आईला मी अकालीच तर गमावून बसणार नाही ना, अशी भीती मला सतत वाटायची.

तिची वाचासिद्धी गेली आणि दशकभराचे अंथरुणातले जिणे नशिबी आले. अखेरच्या काही वर्षांत ती शय्याव्रणांनी त्रस्त होती, नाकातोंडातून नळ्याद्वारे तिच्या पोटांत द्रवपदार्थ घालून तिला जिवंत ठेवले जात होते. डायपर्सद्वारे तिला स्वच्छ राखले जात होते. तिच्या त्या खोल गेलेल्या डोळ्यांतली हतबल असहाय्यता मन विदिर्ण करायची.

पण तरीही 84 वर्षांचे आयुष्य तिच्या वाट्याला आले. तिच्या त्या अबोल एकाकीपणातून तिला थोडातरी विरंगुळा मिळावा आणि तिचा निजधामाचा प्रवास कमी क्लेशदायक असावा म्हणून मी आणि माझे कुटुंब तिच्या सान्निध्यांत बराच वेळ घालवायचो.

अनेकदा व्यथित होऊन मी विचार करायचो, अशा प्रकारचे कलेकलेने ग्रासणारे मरण तिच्या वाट्याला का बरे यावे, यापेक्षा झटक्यासरशी पडदा पडला तर तिला वेदनांपासून मुक्ती नाही का मिळणार? जेव्हा तो क्षण आला तेव्हा वेदनांपासून तिची आणि माझीही सुटका झाली.

नळ्यांद्वारे दिलेले अन्न तिने घेतले आणि जे डोळे मिटले ते पुन्हा न उघडण्यासाठी. तिच्या त्या म्लान चेहऱ्यावर एक स्मितहास्य तरळत असल्याचे मला दिसले; की मला झालेला तो भास होता?

माझे वडील 85 च्या परिपक्व वयात फुफ्फुसाच्या विकाराने निवर्तले. या व्याधींमुळे त्यांना एका सुपरस्पेशालिटी रुग्णालयांत महिनाभर व्हेंटिलेटरवर राहावे लागले.

तिथल्या प्रक्रियांतून जाण्याच्या वेदना अपेक्षित फलप्राप्तीच्या तुलनेत भयावह होत्या. त्यांची देखभाल करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी मला विश्‍वासात घेत माझ्यातल्या फलप्रामाण्यवादी वृत्तीला आवाहन करून पाहिले.

तिची प्रकृती सुधारेपर्यंत मला माझ्या आजीच्या स्वाधीन करण्यात आले होते. माझ्या पौगंडावस्थेतले दिवस तिच्या प्रकृतीतले अनेक चढ-उतार पाहातच मी काढले आणि जेव्हा मी चाळिशी ओलंडण्याच्या बेतात आलो, तेव्हा माझी आई- सुमतीला, एक प्रमस्तिष्क वाहिनीशी संबंधित विकार झाला.

‘त्यांना अशा हतबल अवस्थेत तुम्ही किती काळ ठेवणार आहात?’, असे साळसुदपणे विचारत त्यांनी वाढत्या खर्चाकडे माझे लक्ष वेधले आणि मला खेळ संपवून टाकण्याचा अनाहुत सल्लाही दिला. मनोमन त्याला शिव्या दिल्या पण बाह्यात्कारी त्यांनी असे कोणतेही धाडस करू नये असा इशाराच मी त्याला दिला.

‘त्यांना श्‍वासाचे वरदान दिलेल्या देवालाच तो निर्णय घेऊ द्या. त्यात तुमची आमची ढवळाढवळ नकोच’, असे मी त्याला निक्षून सांगितले. त्यानंतर आठवडाभरातच माझ्या वडिलांचे ते आयसीयूत असताना प्राणोत्क्रमण झाले.

शेवटच्या क्षणी बहुधा त्यांच्यासोबत कुणीही नव्हते. त्यांच्या अचेतन पार्थिवापाशी निस्तब्ध आणि दिङ्मूढ अवस्थेत मी उभा असताना मला जाणवली त्यांच्या चेहऱ्यावरची बरेच दिवस लोपलेली असिम शांती. कर्तव्यपूर्तीच्या माझ्या वैषयिक समाधानासाठी तर त्यांच्या वेदनांचा प्रवास मी लांबवला नव्हता ना? मला उत्तर गवसलेच नाही.

30 वर्षांच्या माझ्या व्यावसायिक जीवनात अनेक सहकाऱ्यांना गमावण्याचे दुर्भाग्य माझ्या वाट्याला आहे. कोवळ्या वयाच्या काही गुणवान विद्यार्थ्यांनाही अखेरचा निरोप द्यायची पाळी आली. आता जरा-मरणाने मी विचलित होत नाही, मात्र त्याविषयीचे कुतूहल अजूनही मनाला भंडावून सोडतें.

माझ्या अनेक सुहृदांच्या वाट्याला आलेला व्याधींचा ससेमिरा आणि त्यातून त्याना लाभलेली चिरनिद्रा मी पाहिलीय. प्रत्येक अनुभवाने मला अात्मपरीक्षण करायला लावले. मरणातल्या जीवनाचा- काहीसा तत्त्वज्ञानाच्या वळणाने जाणारा अर्थ मला आता आकलला आहे. जर मरण अटळ, अंतिम आणि नव्या जीवनाचा आरंभ असेल तर मग त्याचे भय का बाळगायचे?

प्रत्येक सजिवाच्या वाट्याला त्याच्या शरीरातील पेशींच्या अटळ क्षयाद्वारे मरण गाठतेच, याचे भान एक जीवशास्त्रज्ञ म्हणून मला आहे. क्षयामुळेच प्रत्येक प्रजातीच्या अस्तित्वाची शक्यता वृध्दिंगत होते, कारण संसाधनांचा अतिवापर टळतो, याचे आकलन पर्यावरणशास्त्राचा विद्यार्थी या नात्याने मला आहे.

आणि, पारिस्थितिक ऊर्जाविज्ञानांत स्वारस्य असल्यामुळे मला हेही माहीत आहे की वस्तुमान वा उर्जेचे निर्माण जसे शक्य नाही तसाच ऱ्हासदेखील. माझी श्रध्दा मला सांगते की केवळ आपले बाह्य शरीर तेवढे नश्‍वर आहे, तर आत्मा अक्षय आहे.

मग मला वाटू लागते, कशाला बाळगावे ते जरा-मरणाचे भय? वृत्तपत्रांतील सहवेदनेच्या जाहिराती वाचून मनोवस्था विषण्ण होणारी माणसे मी पाहिली आहेत. कृत्रिम अवयवांच्या आणि सौंदर्यप्रसाधनांच्या आडून आपले वाढते वय लपवू पाहाणारी आणि तरीही वार्धक्य लपवू न शकलेली माणसे माझ्या परिचयाची आहेत. बहुधा ह्या लपवाछपवीमागे तरुण ‘दिसण्याचा’ अट्टाहास असतो, तरुण ‘असण्याचा’ नव्हेच.

भोवतालची सामाजिक परिस्थिती संवेदनाविहिन होत असल्याच्या सद्यकाळात वार्धक्य आणि अंताचा सहजतेने स्वीकार करणे आव्हानात्मकच आहे. ज्यांच्या वाट्याला दीर्घायुष्य आले त्यांनी शेवटाचा स्वीकारही दिलेरीनेच करायला हवा.

अत्याधुनिक अशा आरोग्य सुविधांनी आपल्या देशातील जीवनमान उंचावले आहे आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढतेच आहे. दुसरीकडे उज्ज्वल भविष्याचा शोध घेत आपली तरुणाई ‘पळा पळा, कोण पुढे पळे तो...’ असे म्हणत परागंदा होते आहे. मागे राहातात ती म्हातारी, आजारी, आपली वाट शोधणारी जाणती.

जीवनाच्या उत्तरार्धांत अपुऱ्या आरोग्यसुविधांशी आणि आत्मजांच्या वियोगाशी सामना करत त्याना आलेला दिवस ढकलावा लागतो. सामाजिक जाणिवा असलेल्या काही धर्मादाय संस्था त्याना किंचित दिलासा देतातही, पण तोपर्यंत आशा आणि जगण्यातले स्वारस्य संपलेले असते. जेव्हा मरण हवेसे वाटते तेव्हा जगण्यात काहीच शौर्य नसते.

परिस्थिती प्रतिकूल असताना केवळ नैतिकतेचा बाऊ करून आयुष्य लांबवण्यात काहीच अर्थ नसतो. मरणाच्या असिम सत्याला आपण सन्मानाने स्वीकारायला हवे, मरणाकडे नव्या जीवनाचा पूर्वकाल म्हणून पाहायला हवे. मरणाच्या आगमनाविषयीच्या संदिग्धतेतच जगण्याचा आनंद अवीट होतो. मरण आपल्याला जीवनाविषयीची कृतज्ञता शिकवते, मनसोक्त जगण्याची प्रेरणा देते.

माझ्या मुलीची- मृणालची एक कृष्णछायेतली कविता- ‘दि मॉर्टिशिअन’- मला आठवते. ती म्हणते, ‘मरण जेव्हा उजेड आणि छायांदरम्यान अनाकलनीय विहार करत होते, दृष्य आणि अदृष्यादरम्यान लपूनछपून फिरत होते तेव्हा मी भयाची शेवटची सलही पुसून टाकली, आणि...एक नवे पार्थिव रक्त स्रवू लागले.’ ती पुढे म्हणते, ‘आपल्या कोषांतल्या निबिड शांततेत सुरवंटालाही आपण मेलेलोच आहोत, असे वाटत होतें...’ माझीही ठाम धारणा आहे की मरणाचे भय बाळगणे फिजुल आहे, कारण, भयकंपित होण्याइतकी परिपूर्ण माहिती आपल्याला आहे कुठे?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com