ट्रम्प यांना घाम फोडणाऱ्या जो बायडेन यांचे अमेरिकेच्या राजकारणातील स्थान काय?

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

अमेरिकेच्या राजकारणातील एक अनुभवी सीनेटर म्हणून बायडेन यांनी कित्येक वर्ष अमेरिकेतील विविध समस्यांकसाठी रात्रंदिवस काम केले आहे. ट्रम्प यांना पराभूत करून राष्ट्रध्यक्षपदासाठी निवडून आल्यास जो अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष होण्याचा विक्रम करतील.

जोसेफ रॉबिनेट बाइडेन. अर्थात जो बाइडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. नुसते शर्यतीतच नाही तर आतापर्यांत पार पडलेल्या मत मोजणीनुसार जवळपास जिंकून येतील अशाच स्थितीत आहेत. २० नोव्हेंबर १९४२ रोजी जन्मलेले जो कदाचित आपला येणारा ७८वा वाढदिवस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणूनही साजरा करतील. गेली कित्येक दशके राजकारणात सक्रिय असलेले जो डेलावेअरमधून १९७३ पासून ते २००९ पर्यंत सलग निवडून आलेले आहेत. अमेरिकेच्या राजकारणातील एक अनुभवी सीनेटर म्हणून त्यांनी कित्येक वर्ष अमेरिकेतील विविध समस्यांकसाठी रात्रंदिवस काम केले आहे. ट्रम्प यांना पराभूत करून राष्ट्रध्यक्षपदासाठी निवडून आल्यास जो अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष होण्याचा विक्रम करतील. 

    अमेरिकेतील सिरॅक्यूज विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतलेल्या जो यांनी 1972मध्ये डेलावेअरमधून निवडून येत सर्वांत तरूण सीनेटर होण्याचा मान आपल्या नावे केला होता. सीनेटमध्ये असताना त्यांनी अनेक वर्षे परराष्ट्र समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. याच दरम्यान, त्यांनी 1991 मध्ये चेअरमनपद भुषवताना ‘गल्फ वॉर’ला जोरदार विरोधही केला होता. त्यानंतर 2002मध्ये इराक युद्धासाठीही त्यांनी संमती पत्रावर सही केली होती. मात्र, आपला निर्णय चुकल्याची कबुली देत त्यांनी याविषयी खंतही व्यक्त केली होती. 

त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत ओबामा सरकारमध्ये काम करायला सुरूवात केली. बराक ओबामा सरकारमध्ये त्यांनी उप-राष्ट्राध्यक्षपदाची महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळली होती. अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी निवडून आल्यास त्यांच्या या अनुभवाचा त्यांनाही आणि सबंध अमेरिकेलाही  उपयोग होईल हे निश्चित आहे. 

 2016 मध्ये बराक ओबामा अमेरिकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर जो यांनी डेमोक्रेटीककडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, पक्षाकडून त्यावेळी हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी देण्यात आली होती. जो यांनी वाट बघणे पसंत करत पुन्हा कामाला सुरूवात केली. यावेळी मात्र डेमोक्रेटीककडे त्यांच्या नावाशिवाय दुसरा पर्यायही समोर उपस्थित नव्हता. ट्रम्प यांना हरवणे कदाचित बायडेन यांना शक्य होणार नाही अशी चर्चा संपूर्ण जगात होत होती. मात्र, कोरोना महामारीचे न केलेले नियोजन आणि महामारी काळात ट्रम्प यांनी घेतलेले तर्कशुन्य निर्णय यामुळे त्यांचे महत्व कमी होऊन बायडेन यांना त्याचा लाभ झाला. त्यामुळे आता बायडेन निवडून येतील या स्थितीत आहेत.

 अमेरिकेतील समस्यांवर अनेक वर्ष आवाज उठवणारे बायडेन हे पर्यावरणाच्या समस्यांबाबत अतिशय गंभीर आहेत. देशातील अर्थव्यवस्थे एवढेच लक्ष वातावरणातील बदलांवरही लक्ष द्यायला हवे, असे त्यांचे आधीपासून म्हणणे आहे. स्त्रीयांच्या न्याय, हक्कासाठी ते याआधीही लढले आहेत. राष्ट्राध्यक्ष झाल्यावरही त्यांच्याकडून त्याच अपेक्षा असणे साहजिकच आहे. याशिवाय त्यांनी सीनेटच्या लीगल काऊंसिलचेही अध्यक्षपद भुषवले असून देशात घडणाऱ्या गुन्ह्यांवर, ड्रग्सच्या प्रकरणांवर ते काय नवीन निर्णय घेतात हेही बघावे लागेल.             

संबंधित बातम्या