Blog : जाणत्यांचा सन्मान करुया

जगभराच्या लोकसंख्येतले ज्येष्ठांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर धोरणकर्ते आणि नागरी समाजानेही या समूहाची अगतिकता समजून घेण्याचा आणि आस्थापूर्वक सौजन्याने तिचे निराकारण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा.
Let us honor our elders
Let us honor our eldersDainik Gomantak

डॉ. मनोज सुमती र. बोरकर

उद्या, ता. 1 ऑक्टोबर रोजी आपण जाणत्या, ज्येष्ठांसाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करणार आहोत. वयानुरूप येणारी हतबलता आणि ज्येष्ठांच्याप्रति होत असलेले गैरवर्तन याकडे लक्ष वेधण्याचा हेतू त्यामागे आहे. जगभराच्या लोकसंख्येतले ज्येष्ठांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर धोरणकर्ते आणि नागरी समाजानेही या समूहाची अगतिकता समजून घेण्याचा आणि आस्थापूर्वक सौजन्याने तिचे निराकारण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा.

आयुष्याच्या एकंदर व्याप्तीपेक्षाही निरोगी जीवनाची लांबी ही अधिक महत्त्वाची असते, हे निर्विवाद. साधारण मानकानुसार 65पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिक संबोधले जात असले तरी माझ्या मते वय नव्हे तर आरोग्याच्या स्थितीलाच मानक मानणे उचित ठरेल. अर्थांत हे सर्वच मानक संबंधित व्यक्तीचे कार्यस्वातंत्र्य, वित्तीय सुरक्षा आणि एकूणच समाजाची आरोग्यविषयक जडणघडण अशा विविधांगी घटकांनी प्रभावित झालेले असतात.

आज रोगनिवारक वैद्यकशास्त्राने केलेली प्रगती, आंतरराष्ट्रीय सौहार्द आणि सहजीवनाचे महत्त्व जाणणारी सहवेदना यांच्या संयुक्त परिणामांती अधिकाधिक देशांत जाणत्यांचे उर्जस्वल, उत्पादक योगदान असलेले आणि म्हणून त्यांच्याप्रति नित्य कृतज्ञ असलेले असे ‘वयविहिन समाज’आकारास येऊ शकतील.

Let us honor our elders
Laptop Theft : लॅपटॉप चोरीप्रकरणी म्हापशात एकास अटक

आपण जन्मल्या क्षणापासूनच आपले वय मोजण्याची प्रक्रिया सुरू होते आणि आपण हेही मान्य करायला हवे की या प्रक्रियेचा अंत आपल्या देहावसनात होत असतो. जीवनपटाची ही लांबी क्षेत्र आणि वंशानुरूप बदलत असते. काही असले तरी अमर्याद आयुष्य कुणाला लाभत नसते, शेवट हा येतोच.

या प्रवासात येणारा एकेक थांबा आपण घड्याळ आणि भिंतीवरल्या कॅलेंडरच्या साहाय्याने मोजत जातो आणि त्याचे सोहळेही केक खाऊन व मेणबत्त्या विझवून साजरा करत असतो. त्याच दरम्यान आपले शरीर दुबळे बनत असते, अनेक शरीरांतर्गत प्रक्रिया क्षीण होत जातात व आपल्या क्षमतेवरही प्रतिकूल परिणाम होत असतो.

वयाची काही मर्यादा ओलांडल्यानंतर वाढदिवसाची कल्पनाही नकोशी वाटणारे अनेकजण माझ्या परिचयाचे आहेत, आपली आयुर्मर्यादा सरत चालल्याची जाणीव त्यांना असह्य वाटते. माझ्या मते ज्या दिवशी आपण जन्मतो तोच त्या अंतिम सत्याकडे नेणारा पहिला दिवस असतो. मी विज्ञानाचा विद्यार्थी असलो तरी 80च्या दशकांत तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी मला मिळाली. तेव्हाच्या माझ्या एका प्राध्यापिकेचे वक्तव्य मला आजही स्मरते.

त्या म्हणायच्या, ‘मी जीवनाविषयी फार काही सांगू शकणार नाही. पण एवढे निश्चितपणे सांगेन की मरण हे अनिश्चितपणे निश्चित आणि त्याच वेळी निश्चितपणे अनिश्चित असते!’ ते ऐकून माझा प्रचंड गोंधळ त्यावेळी उडाला होता खरा, पण आता अर्धशतकाच्या प्रवासात क्षणभंगुरता, समस्या आणि अनाकलनियाच्या नित्यदर्शनातून त्या वक्तव्यामागच्या खोल तत्त्वज्ञानाचा अंदाज आल्यासारखे वाटते.

का कोण जाणे, मला लहानपणीही पिकल्या केसांचे फार आकर्षण वाटायचे. केसांना टाल्कम पावडर लावून मी माझा तो मेक-अप आरशांत निरखत बसत असे. नियतीने माझ्या त्या पिकलेपणाच्या साधनेचे फळ देण्याचे ठरवले असावे, कारण चाळिशींत शिरतानाच माझे केस पिकू लागले आणि पन्नाशींत तर सफेद केशसंभाराच्या सोबतीला त्वचेवरल्या सुरकुत्यांचीही जोड मिळाली. गेल्या दशकभरांत तर माझ्या बाबतीत घडलेल्या अनेक विनोदी घटनांनी माझ्या पत्नीला- नीमाला मात्र क्षुब्ध करून सोडले आहे.

अनेकदां लोकांनी मला ‘आपण निवृत्त कधी झालांत?’असा सवाल केला आहे. पण निमाची सर्वाधिक अडचण दशकभरापूर्वी आम्ही दिल्लींत शॉपिंग करताना झाला. तो दुकानदार तिच्याकडे बोट दाखवून मला सांगायला लागला, ‘साब, ये कपडा आप के बेटी पर बहुत स्यूट करता है।’ त्यावेळी निमाच्या चेहऱ्यावरले रंग नवरात्रीच्या रंगावर वरताण करत झपाट्याने बदलत गेले आणि त्या आगंतुक प्रशंसेचे आम्हीही दिलखुलास हसून स्वागत केले.

काही असो, माझे पिकलेपण मी नेहमीच मिरवत आलो आहे. माझ्या एकंदर व्यक्तिमत्त्वाच्या ग्लॅमरला त्यामुळे चार चॉंद लागतात, अशी माझी धारणा आहे. तरुण दिसण्याची वृथा धडपड करणे म्हणजे चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करण्यासारखे आणि जीवनशास्त्रीय नियमांच्या विरोधात जाण्यासारखे आहे. सौंदर्यप्रसाधने आणि प्रोस्थेटिक्समुळे केवळ त्यांची विक्री करणाऱ्यांचाच फायदा होतो, ती वापरणाऱ्यांचा निश्चितच नव्हे. दिमाखात जाणते होण्याची संकल्पना आपण समजून घ्यायला हवी.

वय आपल्याला गाठतें तेव्हा पेशी सैल होतात, डोक्यावर रुपेरी जावळ पसरू लागते, केसांचे असलेले नाते हलके हलके तुटू लागते. पोटाजवळ मेद साठून घेरी वाढते, दात पडतात, दृष्टी अधू होते, अस्थी क्षीण होतात, त्वचेवर सुरकुत्यांचे जाळे पसरू लागते शिवाय आकलनशक्तीला मर्यादा येतात आणि काही व्याधीही वसतीला येतात. ह्या अपायकारक बदलांचे सातत्य ठरते ते आपली जनुकीय संरचना आणि पर्यावरणाच्या आघातशक्तीच्या संयुक्त परिणामांतून.

म्हातारपण नको असले तरी कुणी ते टाळण्यासाठी स्वतःहून तरुणपणातच मरणाला कवटाळत नाहीत. दीर्घायुष्य मिळालेल्यांना त्याचे मोल म्हातारपणातून द्यावेच लागते. वयोमान वाढण्यामागे कोणती जनुकीय प्रणाली आहे याचा शोध घेण्याचे निरंतर प्रयत्न जरी जारी असले तरी अजरामरत्वाच्या कल्पनेपासून आपण असंख्य प्रकाशवर्षे दूरच आहोत.

माणसांना वाटणाऱ्या अनेक भयात वार्धक्याचे भय अग्रस्थानी असते. कारण, वार्धक्य येणे म्हणजे निरवानिरवीच्या जवळ येऊन पोहोचणे. वार्धक्यामुळे बिनकामाचे असल्याचा, क्वचित घरच्यांना डोईजड झाल्याचा शिक्का बसतो, तो तर असह्यच असतो. लोकसंख्येचे अजिर्ण झालेल्या गरीब व संस्कृतीचे अनुबंध नसलेल्या समाजांत तर अनुत्पादित वयोवृद्धांच्या नशिबी नरकयातना येत असतात.

दंतकथा आणि पुराणकथांत खास आहार आणि पेयांच्या सहाय्याने जरा- मरणाला चार हात दूर ठेवणाऱ्या चिरतरुण देवादिकांची वर्णने आढळतात. त्यांच्यापाशी काही अमोघ शक्तीही असतात. ग्रीक मिथकांत तर अमरत्व प्रदान करणाऱ्या संजीवनीचा फारच बोलबाला आढळतो. मृत शरीरांतून प्रकट होणाऱ्या वायूंना हुंगल्यावर त्या मृतात्म्याच्या शरीरातली ऊर्जा म्हणे जिवंत माणसांत प्रविष्ट व्हायची. झिउस या ग्रीक देवाने अमाल्थिया या जादुई बकरीच्या शिंगातून उत्पन्न होणाऱ्या या एम्ब्रोसिया नामक पदार्थांचे सेवन केल्यामुळे तो अमर बनला होता.

या एम्ब्रोसियांत जराजर्जर शरीरांत नवचैतन्य जागवत त्याला तारुण्य बहाल करण्याची शक्ती होती. थॉमस एक्विना हा डॉमिनिकन पाद्री सांगतो की, एडनच्या उद्यानातल्या संजीवनवृक्षामुळे पृथ्वीतलावर निष्कासित केलेल्या एडमला ऊर्जा मिळून त्याला इहलोकांत दीर्घायुष्य मिळाले होते. झोरास्ट्रियनांच्या मिथकांतही ''हाओमा'' नावाच्या संजीवनीचे वर्णन आहे. हा शब्द आपल्या वेदांत आढळणाऱ्या ''सोम'' या शब्दाशी किती मिळताजुळता आहे, नाही! झोरोस्टरचा जन्मच मुळी त्याच्या मातेने दुधांत हाओमा मिसळून त्याचे सेवन केल्यामुळे झाला होता.

देवांचा राजा इंद्र आणि अग्नी अमरत्व प्राप्त व्हावे म्हणून सतत सोमरसाचे प्राशन करायचे. सुमेरियन दंतकथांत निहर्संगच्या दुधाचा उल्लेख आढळतो, ज्याचे सेवन देव आणि सम्राटांना अमरत्व व चिरतारुण्य बहाल करायचे. हिंदू पुराणकथांतली अमृतप्राप्तीसाठीच्या समुद्रमंथनाची कथा तर सर्वज्ञात आहे. या सगळ्या मिथकांचे तात्पर्य एकच आहे; जरामरणाच्या अपरिहार्यतेपासून दूर जाण्याचे, इहलोकांतील आपले वास्तव्य आणि प्राबल्य दृढ करण्याचे स्वप्न अगदी आदिम मानवानेही पाहिले होते.

मात्र जीवशास्त्र हा या संकल्पनेचा तितकाच ठाम आणि विवेकी विरोधक असून त्याला पृथ्वीतलावरील कोणत्याही सजिवाला अमरत्व मिळण्याची कल्पना नामंजूर आहे. वस्तुद्रव्य आणि ऊर्जा यांची आवर्तने जीवन- मृत्यूच्या अव्याहत चक्रातून व्हायलाच हवीत, असे हे शास्त्र मानते. ''मातीत मिसळतो आपण मातीतून उगवाया'', ही केवळ तत्त्वशास्त्रीय धारणा नसून आपल्या सजीवसृष्टीचा तो नित्यनेमच आहे आणि जरा ही त्या प्रक्रियेचा अभिन्न भाग आहे.

आईवडिलांच्या सेवेत रत असताना आपले प्राण गमावणाऱ्या श्रावणबाळाचा आणि वडिलांनी दिलेला शब्द राखण्यासाठी चौदा वर्षांचा वनवास स्वीकारणाऱ्या रामाच्या या भूमीत वयोवृद्ध पालकांच्या नशिबी येणाऱ्या यातना बघून आपल्या देशातील विसंगतीचे वैषम्य वाटते. पालकांची संपत्ती गोडीगुलाबीने हडप केल्यानंतर अत्यंत अपमानित अवस्थेत त्यांना घराबाहेर काढणारी किंवा एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन टाकणारी अगणित संततीही आपल्या अवतीभवती आहे. आपल्या समाजाच्या प्रागतिकतेवर लागलेला हा कलंकच म्हणायचा.

मी ज्या ज्या देशांना भेट दिली त्यात जपानचे आपल्या जाणत्याप्रतींचे वर्तन मला प्रभावित करून गेले. तो समाज जात्याच सहृदयी आणि सुसंस्कृत. त्यातही घरी वयोवृद्ध मंडळी अती आदरणीय समजली जातात. त्यांना घरांत आणि सार्वजनिक जीवनातही भरपूर सन्मान मिळतो.

सर्वसाधारण जपानी माणसाचे सरासरी आयुर्मान 84.91 वर्षे इतके असते. आपल्या या जाणत्यांना अपार मायेने सांभाळण्यासाठीची, त्यांनी समाजजीवनात समरसून वावरावे यासाठीची तरुणाईची धडपडही भारावून टाकणारी असते. तिथली सार्वजनिक वापराची स्थळे वयोवृद्धांच्या सोयीची असतात. त्या देशाने 1961 पासूनच आपल्या सर्व नागरिकांसाठी आयुर्विमा योजना कार्यान्वित केलेली आहे. याशिवाय प्रत्येक जपानी नागरिकाची काळजी दीर्घकाळ वाहणारी योजनाही तेथे राबवण्यात येते, त्यात घरगुती शुश्रूषेचाही समावेश असतो. या धोरणांमुळे जपानी वयोवृद्धांचा आत्मसन्मान कायम असतो.

गेल्या काही दशकांत आरोग्यसेवेत झालेल्या क्रांतिकारी सुधारणा, पोषणविषयक सुरक्षा आणि चांगले राहाणीमान यामुळे वानरवर्गी प्राण्यांत माणसाला सर्वांत दीर्घ जीवन लाभले आहे. जगातल्या सर्वच देशांतील लोकांचे आयुर्मान वाढले आहे. आपल्या देशातले सरासरी आयुर्मान 2022 साली 70.19 इतके आहे जे 1950 साली जेमतेम 35.21 होते. बांगला देशांतले आजचे सरासरी आयुर्मान 73.29 वर्षे तर श्रीलंकेचे 77.39 इतके आहे.

जगातली एक अष्टमांश लोकसंख्या आज भारतात राहाते. आपल्या सांस्कृतिक संचितात आणि नैतिक आचरणांत जाणत्याप्रतीच्या आदराला महत्त्वाचे स्थान आहे. तीच भावना आपल्या दैनंदिन कृतीतून दिसायला हवी. केवळ कायदे करून, वरवरचा मुलामा लावून चालणार नाही, आपल्या आचरणातून त्या भावनेचे प्रतिबिंब उमटायला हवे. ज्येष्ठांसाठीचे राष्ट्रीय धोरण निश्चित करून किंवा त्यांच्यसाठी राष्ट्रीय मंडळ करून काम भागणार नाही.

वयस्क व्यक्तींकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल घडून यायला हवा, त्यांच्या सुविधांसाठी आपण केलेल्या तरतुदींची अंमलबजावणी हृदयातून आस्थापूर्वक व्हायला हवी. आपल्याला हतबल, निराधार अवस्थेत वाऱ्यावर सोडलेय, असे त्यांना वाटता कामा नये. त्यांच्यापाशी अनुभवातून कमावलेले शहाणपणाचे संचित असते, जे तरुणाईला सहज उपलब्ध होते. ती कालानुरूप आलेली परिपक्वता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्राप्त करता येत नाही. जाणते ही आपल्या समाजाची प्रगल्भ मालमत्ता आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग विद्यमान पिढ्यांच्या उत्थानासाठी व्हायला हवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com