Blog: 'लग्नसोहळ्याला' नातेवाईकांच्या आनंदमेळ्याचे नाही; तर एक बाजारु व्यावसायिकाचे रुप प्राप्त!

Blog: लग्न म्हणजे आजकाल पदव्यांपेक्षा कल्पक कृतिशीलता महत्त्वाची झाली आहे.
Wedding Stage
Wedding StageDainik Gomantak

Blog: माझ्या मित्राचा मुलगा वैद्य गौतम आपल्या मुलाच्या मुंजीची निमंत्रण पत्रिका घेऊन आला. पत्रिका नावीन्यपूर्ण होती. लिफाफ्यासारखी घडी केलेली, पण कपड्याची होती. आमची पत्रिकेच्या या प्रकारावर बरीच चर्चा झाली. महागड्या ग्लॉसी पेपरच्या कलापूर्ण पाकिटात, तशाच कलापूर्ण महागड्या पत्रिका छापल्या जातात.

लग्न झाल्यानंतर त्या कचऱ्यात. कितीही वैशिष्ट्यपूर्ण, देवादिकांची सुंदर चित्रे असली तरी, वधू आणि वर यांच्या फोटो अल्बमाशिवाय कोणी जपून ठेवत नाही. आपल्या पत्रिकांची विल्हेवाट कचऱ्यात होऊ नये या विचाराने त्याने हा कल्पक प्रकार तयार केला.

पांढरा रुमाल, त्यावर पत्रिकेची छपाई, छपाईसाठी शाई वापरली ती चोळून धुतल्यावर पूर्णपणे निघून जाणारी. नंतर तो रुमाल म्हणून फाटेपर्यंत वापरता येतो. मुंजीला मी जाऊ शकलो नाही. काही दिवसांनी गौतमने मुंजीनिमित्त एक भेटवस्तू आणून दिली. ती म्हणजे त्यांच्याच कुळागरातील पोफळीच्या पोवल्यांपासून बनविलेले बॉक्स. त्यात मिरी, दालचिनी वगैरे त्यांच्याच कुळागरातील मसाले.

खादी ग्रामोद्योगाकडून घेतलेल्या यंत्रामध्ये यंत्रामध्ये दोन 15 बाय 25 से. मि. चे पोवल्यांचे ट्रे करून ते उलथा एक, दुसरा पालथा असा बॉक्स बनवलेला. सर्व वस्तू उपयुक्त,घरच्या, सेंद्रिय बनावटीच्या. ‘जशाच्या तशा’दुसऱ्या उपयोगासाठी वापरता येण्याच्या त्यातील पाकिटांचा कागद फक्त टाकाऊ बाकी टाकाऊ काही नाही. त्या पोवळ्याच्या बॉक्सचे दोन भाग मी ट्रे म्हणून माझ्या टेबलावर वापरतो. एकात पेन-पेन्सिल - पिना वगैरे, दुसऱ्यात माझी औषधे किंवा इतर काही. गौतमच्या कल्पकतेपेक्षा त्याने विचारांची जी दिशा पकडली तिचे मला जास्त कौतुक.

गेल्या आठवड्यात आमच्या ‘निर्मल विश्व’ संस्थेतील कुमार याच्या कन्येचा विवाह झाला. मंडपाची सजावट तिचा मामा राजू याने केलेली. सुपारीची भरगच्च गर्द पिवळी शिपटी, केळीची झाडे, नारळीच्या झावळ्या यांची भरदार सजावट. कृषिसंस्कृतीतील संपन्नतेचे रंगतदार दर्शन. रांगोळ्या, रुखवत यांची नेटकी मांडणी बघून समाधान वाटले ते अनेक कारणांमुळे. पहिली गोष्ट या सजावटीत नात्यागोत्यांतील मंडळीचा सक्रिय सहभाग.

Wedding Stage
New Zuari Bridge: पूल नेमका सेल्फीसाठी बांधलाय की लोकांसाठी? मुख्यमंत्र्यांनाच पडलांय विसर

आजकाल लग्नसोहळे हे नातेवाइकांच्या उत्स्फूर्त सक्रिय सहभागाचे, आनंदमेळे हे रूप हरवून बसले आहेत. त्यांना एक बाजारू व्यावसायिक रूप प्राप्त झाले आहे. सोहळ्यासाठी मंडप उभारण्याची गरज नाही. मंडपपूजा हा केवळ धार्मिक उपचार. गावांतील उचित आणि आपल्या मुहूर्ताला रिकामा असलेला चांगला असा हॉल शोधून पैसा भरून त्या तारखेला बुक करणे.

हॉल डेकोरेटरला त्याच्या पर्यायांत बसेल अशी आपली निवड ठरवून त्याचा काँट्रॅक्ट देणे, प्रकाशयोजना, ध्वनियोजना, फोटोग्राफी व्हिडिओग्राफी, यांचे निरनिराळे काँट्र्ॅक्ट, कॅटरिंगचा काँट्रॅक्ट, पुरोहितास धार्मिक विधीसाठी यज्ञकुंड, होमाला लागणारी लाकडे , लाह्या या सर्वांचे काँट्रॅक्ट, वधूला नेसविणे सजविणे वेशभूषा यातीलही व्यावसायिक आहेत. हे सोहळे, उत्सव बाजारात विकत मिळणारी वस्तू बनले आहेत.

एक सेवा, इव्हेंट मॅनेजमेंट या व्यवसाय गटाच्या अखत्यारीतील. भरपूर पैसे खर्च करू शकतो तो झकास कार्यक्रम घडवून आणू शकतो. त्या दिमाखालाच चांगला कार्यक्रम म्हटले जाते. अशा परिस्थितीत वधूपक्षातील नातेवाइकांनी घेतलेला सहभाग. त्याची आठवण सर्व संबंधितांना जन्मभर राहील असे स्वरूप द्यायचे झाल्यास चालू पद्धतींचा त्याग करावा लागेल.

विकतची परप्रांतांतून आयात केलेली फुले, तयार खांब, कमानी कुंड्या वगैरे ठराविक बाजारी फॉर्म्युला न वापरता आपल्या परिसरातील पर्याय निवडण्याची कल्पकता वापरावी लागते. यातूनच माणसाच्या सृजनशीलतेला चालना मिळते. आमच्या संस्थेतील एक निवृत्त प्राध्यापिका यांनी घरातील जुन्या न वापरता राहिलेल्या जरीकाठी साड्यांपासून भेट देण्यासाठी इतक्या योग्य अशा सुंदर पिशव्या बनविल्या की, बाजारात तशा मिळणे मुश्कील.

वाढत्या मुलांचे कपडे लगेच आखूड घेऊ लागतात. पूर्वी हे चांगल्या स्थितीतील कपडे जवळच्या नातेवाईकांत दिले जायचे. माझ्या मुलांचे कपडे त्यांच्या मामीने तिच्या मुलांसाठी मागून नेले होते. ते त्यांना कपडे विकत घेण्याची कुवत नाही, अशी परिस्थिती नव्हती. पण वाढत्या मुलांचे कपडे, खेळणी, पाळणा ही शुभ मानली जायची. पण आजच्या खोट्या दिमाखापायी ही प्रथा बंद झाली आहे. माझ्या नातवंडाचे 8-10 वर्षांवरील कपडे टाकवत नाही; त्याचे काय करायचे म्हणून सुनेने बांधून ठेवले होते.

गेल्या वर्षी माझी मुलगी माहेरी आली होती. तिने चौकटीवर खिळे ठोकून एक हातमाग तयार केला व काही निरनिराळ्या रंगाच्या जुन्या कपड्यांच्या चिंध्या करून माझ्या बारा वर्षांच्या नातवाकडून जाजमाच्या बैठकीसारखी एक बैठक विणून घेतली. माझ्या सुनेने नंतर उरलेल्या कपड्यांपासून जाजमाचा एका पट्टा करून घेतला, तो जुन्या कपड्यांच्या चिंध्यांपासून केलेला आहे, हे सांगितल्याशिवाय कळणार नाही.

Wedding Stage
Sewage System: मलनिस्सारण प्रकल्प होणे अत्यंत गरजेचे अन् अनिवार्य

केरळचे प्रसिद्ध आर्किटेक्ट लॉरी बेकर जुन्या, टाकाऊ वस्तूंपासून अप्रतिम सुंदर घरे बांधण्यासाठी प्रसिद्ध. देशभरातून ती पाहण्यासाठी बरेच जण, आर्किटेक्ट इंजिनिअरसुद्धा जायचे. त्यातील एका ‘शहाण्या’ इंजिनिअरने प्रश्न केला, ‘तुमचे हे प्रयोग लहान स्तरावर ठीक आहेत. मास हाउसिंगला कसे करणार?’ हा प्रश्न खऱ्या बुद्धिवाद्याचा नव्हता.

आजच्या मास प्रॉडक्शनच्या व्यवस्थेला पर्याय असू शकतो का नाही, यावर विचार करण्याची कुवत नसलेल्या वाहवत जाणाऱ्या, बुद्धिवादी म्हणविल्या जाणाऱ्याचा तो प्रश्न होता. बेकरनी त्याला मार्मिक उत्तर दिले. ‘माइन इज नॉट मास प्रॉडक्शन. इट ईज प्रॉडक्शन फॉर दि मासेस.’ मी मास प्रॉडक्शन म्हणजे बहु उत्पादन करीत नाही, पण बहुजनांसाठी करतो.

अल्विन टॉफ्लर हे गाजलेल्या त्यांच्या थर्ड व्हेव (तिसरी लाट) या पुस्तकात म्हणतात, ‘प्रॉडक्शनचे म्हणजे घाऊक उत्पादनाच्या मक्तेदारीचे युग आता संपलेले आहे. लोकांना तोच तोचपणा आवडेनासा झालेला आहे. टी शर्टचे उदाहरण घ्या. टी शर्ट एकाच फॅक्टरीमध्ये बनविले गेले तरी त्याचे निरनिराळ्या डिझाइनचे पेंटिंग पन्नास ठिकाणी होते.

माहिती तंत्रज्ञान, कम्युनिकेशन तंत्रज्ञान यामुळे कामाच्या ठिकाणी न जाता 60 टक्के कामाचे प्रकार घरी बसून करता येतात. कामे ऑनलाइन करणे हा हक्क बनू पाहत आहे. कामासाठी वाहनातून प्रवास, त्यामुळे प्रदूषण अपघात टाळता येतात. तसेच मास प्रॉडक्शनचे होईल. बऱ्याचशा वस्तूंच्या उत्पादनाचे विकेंद्रीकरण होईल.’

फोटोग्राफरची दुकाने आता बंद पडली आहेत. प्रत्येकजण फोटोग्राफर झाला आहे. त्यासाठी फारसे नैपुण्यही लागत नाही. माहितीचेही तेच होईल. बांदिवड्याचा एक तरुण जैवविविधतेच्या उपक्रमाखाली गावांतील दुर्लक्षित अशा निरनिराळ्या वनस्पतींचे फोटो काढीत सुटतो. त्यात एक अळंब्याचा प्रकार असा सापडतो की, तो जगात अजून कुणाला सापडला नव्हता! जागतिक जैवविविधता यादीत ते ज्याला सापडले त्याच्या नावांची नोंद होते.

जिथे सापडली त्या गावाचे नाव, त्याला दिले जाते. या ज्ञानक्षेत्रातील उच्च विद्याविभूषित बरेच असून त्यांना तो मान मिळत नाही. काही क्षेत्रांतील मक्तेदारी कोसळून पडत आहे. उषा, माझी पत्नी कुठल्याही सामाजिक किंवा बौद्धिक क्षेत्रापासून हातभर लांब राहून केवळ गृहिणी हीच भूमिका जन्मभर निभावत असलेली. मोबाईल हातात आल्यापासून घराच्या बागेतच फुले, वनस्पती, प्राणी, कीटक यांचे अनोखे प्रकार व त्यांना वाचवण्याच्या कृती यांचे फोटो, व्हिडिओ काढते आणि ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री’मधून ते व्हायरल होतात.

बॉटनी, बायॉलॉजी, झुऑलॉजी या शास्त्रांचा गंधही नसला तरी तंत्रज्ञानमार्गे ही क्षेत्रे सामान्यांनाही खुली झालेली आहेत. ज्ञानाच्याही केंद्रीकरणाच्या, मक्तेदारीच्या भिंती कोसळून पडत आहेत. तेथे इतर क्षेत्रांचा काय पाड? गरज आहे कृतिशील होण्याची आपल्या ‘ज्ञानाच्या’ पदव्या उराशी ठेवून कोचावर लोळत पडणाऱ्यांना काहीही मिळणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com