धाडसी प्रेरणादायी शेतकरी

रेखा डायस
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

यंदा टाळेबंदीमुळे राज्यात अनेकांनी आपल्या शेतात नव्याने लागवडी केल्या, त्यामुळे पडिक जमिनीत भात शेताबरोबरच विविध प्रकारची भाजीही दिसू लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिक भाजी उपलब्ध झाली आहे. याकामात युवापिढीही पुढे आली आहे, ही एक दिलासायदायक बाब आहे.

रेखा डायस

दोन-तीन दिवसापूर्वी पेपरमध्ये बातमी वाचली, धाडसी शेतकऱ्यांची बातमी होती. फातोर्डा भागात एका इसमाने वेगवेगळ्या ठिकाणी करारावर घेतलेल्या सुमारे साठ हजार चौरस मीटर शेतजमिनीत चाळीस टन भाताचे पीक घेण्याची प्रेरणादायी कामगिरी त्याने केली आहे. ही जमीन पडीक होती. खरीप हंगामात त्याने भात शेतीची लागवड केली, तर रब्बी हंगामात भेंडी, मिरची इ.चे पीक घेऊन दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.
अशीच प्रेरणादायी गोष्ट आमच्या गावात घडली. आमच्या वाड्यात एका माणसाची वडिलोपार्जित शेतजमीन वर्षोनवर्षे पडून होती. तो माणूस चांगल्या हुद्यावर मल्टिनॅशनल कंपनीत कामाला आहे. पण सध्या लॉकडाऊनमुळे घरीच असल्या कारणाने त्याने जमिनीच्या अर्ध्याभागात गवत चारा काढून नांगरणी करून भात पेरला. लावणी पण केली. त्यांच्याबरोबर शाळा-कॉलेज शिकणारी मुलेही मदतीला होती. आमच्या डोळ्यासमोर पडीक जमिनीची झालेली मशागत आणि फुललेली शेती बघायला खूपच छान वाटते. डोळ्यांना खूप सुखकारक दिसते.
आणखी एक किस्‍सा माझ्या शाळेतील सहकारी शिक्षिका तीन-चार वर्षांपासून त्यांचीच पडून असलेली जमिनीची मशागत करून भाताचे पीक दरवर्षी ती आणि तिचा नवरा काढतात. रब्बी हंगामात भाजी-भेंडी, वाल, मिरची, अळसाणेचे पीक काढतात.
सासष्टी तालुक्यात ‘‘आमचे शेतकार’’ नावाचा गट कृषी क्षेत्रात होणाऱ्या आधुनिक बदलासंबंधी शेतकऱ्यांना माहिती देण्याचे काम करीत आहे. या गटाने आजूबाजूच्या तेरा तालुक्यात सेंद्रीय साहित्य पुरवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. खत निर्मितीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. या संस्थेचे प्रमुख नीतेश बोरकर हे ऑटोमोबाईल इंजिनिअर असून ते स्वतः पूर्णवेळ शेती करण्यावर भर देतात. अशाप्रकारे नवनवीन प्रयोग केले तर आमचे राज्य लवकरच समृद्ध होईल. मागच्या आठवड्यात सेलिब्रिटी संपदा जोगळेकर- कुलकर्णीचे एक मनोगत वॉटसॲपवर वाचनात आले. तिची अभिनेत्री ही वाटचाल तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण ती आता शेतकरी झाली आहे. स्वेच्छेने ती म्हणजे २८-३० वर्षे लेखन, निवेदन, नाट्य दिग्दर्शन या आनंद देणाऱ्या कला जोपासल्यानंतर मी आणि माझा नवरा दोघांनी मिळून शेती करण्याचा निर्णय घेतला. फक्त काहीतरी नवीन करायचे या ध्येयाने’’ त्यासाठी त्यांनी कोकणात एका गावात शेतजमीन विकत घेतली.
संपूर्ण ओसाड जमिनीत विहिरीचा पॉइंट काढण्यापासून सुरुवात केली. ते आता ते भात, नाचणी व इतर कडधान्यांची शेती करतात. बारा वर्षांपासून त्यांची ही शेती चालू आहे. शेतीचे अजिबात ज्ञान नसणाऱ्या या जोडप्याने शेतीविषयक पुस्तक इंटरनेटवरून माहिती घेऊन आपले शेतीविषयक ज्ञान वाढवून स्वतःला जागरूक केले. सुरुवातीचे चार पाच वर्षे संपदा यांच्या मिस्टरांनी नोकरी करून शनिवार-रविवारी येऊन शेतीची कामे केली. ते एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्च पदावर मुंबईला कामाला होते.
अभिनेत्री ते शेतकरीण हा प्रवास खूपच कष्टदायक होता. सगळ्यांसाठी ही खूप प्रेरणादायी गोष्ट आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनी पडीक असून त्या लागवडीखाली आणण्यासाठी मधल्या पिढीने पुढे येणे आवश्‍यक आहे म्हणजे मग आपोआप पुढची तरुण पिढी यात रस दाखवू शकेल, ज्या लोकांना शेती करणे शक्य होत नाही, त्यांनी जमिनी कंत्राटावर शेती करण्यासाठी घ्याव्यात.

 

संबंधित बातम्या