Pele Story: जगानेही मानलं...असा खेळाडू होणे नाही!

Pele Story: फुटबॉलचा दिग्गज सितारा पेले यांनी शुक्रवारी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Legend Pele Story
Legend Pele StoryDainik Gomantak

लोकगंगेच्या प्रवाहामधून अनेक कहाण्यांचे द्रोण वाहात वाहात येतात. काल्पनिकांची चार फुले आणि भक्तिभावाचा दिवा वाहून आणणाऱ्या या लोककथांचे मूळ कोणते? हे कुठल्या अनामिकाचे भावपूजन? कुणास ठाऊक. बऱ्याचशा लोककथांचा जन्म पोथ्यापुराणांतून झालेला असतो, हे मात्र खरे. अशाच लोककथांच्या पुढे परिकथाही होतात. मिथकांची निर्मिती मात्र वास्तवाच्या खडकावरच होते. तिथे काल्पनिकाला वाव नाही.

किंबहुना, तुम्हा-आम्हासारख्या जनसामान्यांमधलीच कुणी व्यक्ती अशी काही बिजलसारखी कडकडत पृथ्वीवर उतरते, की अचानक साक्षात्कार होतो- हा आत्ताच एका मिथकाचा जन्म झाला. पेले या चिमुकल्या नावाचे मिथकदेखील असेच वास्तवाच्या कडेकपारीत जन्मले, वाढले, फोफावले, आणि बघता बघता त्याचा कल्पतरु झाला.

ब्राझीलमधल्या कुण्या कुग्रामात, गरीब कुळात जन्मलेले एडसन अरांटेस डो नेसिमेंटो नावाचे एक किरटे पोर वाढता वाढता सूर्यमंडळ भेदून गेले. त्याच्या विजयाची गाणी झाली, आणि गाण्यांना प्रार्थनेचा दर्जा मिळाला. त्याच्याठायी ईश्‍वरी अंश असल्याची खात्री पटून जगातील लक्षावधी भक्त त्याच्या तसबिरी भक्तिभावाने पुजू लागले.- आणि हे सगळे कशासाठी? तर टरबुजाएवढा चेंडू लाथेने लीलया गोलजाळ्यात ढकलल्याबद्दल! सारेच आक्रित.

मैदान गाजवणाऱ्या एका खेळाडूचे कौतुक वगैरे ठीक आहे, पण त्याचे एवढे देव्हारे का माजवावेत? असे कुणी तर्कटी विचारेल. पण जगण्यातल्या सर्वच गोष्टींना तर्काची मोजपट्टी लावण्यात गंमत नसते, आणि अशा प्रश्नांना उत्तरे देण्यात वेळही वाया घालवायचा नसतो.

आसपासच्या गणंग पोरांच्या नादी लागून लहानपणी रेल्वे लायनीवर भुरट्या चोऱ्या करणारा, पायमोज्यात कागदाचे बोळे भरुन त्याचा टाइमपास फुटबॉल खेळणारा, भावंडांची पोटे भरावीत, म्हणून आईला ‘मी बाहेर खाऊन आलोय’ असे खोटेच सांगून पाणी पिऊन झोपणारा, केवळ ईर्ष्येपोटी अनवाणी फुटबॉल खेळणारा, खेळात अचूकता यावी म्हणून सोळा-सोळा तास अथक सराव करणाऱ्या, वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ब्राझिलच्या विश्वकरंडकासाठीच्या संघात निवडल्या गेलेल्या एका अस्वस्थ मुलाची ही गोष्ट शुक्रवारी संपली.

गोष्ट संपली, पण मिथक संपले नाही. ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे केव्हाच संक्रमित झाले आहे. पेले यांनी शुक्रवारी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस ते गंभीररीत्या आजारीच होते. नुकताच कतारमध्ये फिफा विश्वकरडंक सोहळा पार पडला, तेव्हा उपस्थितांना ‘दर्शन’ द्यायलाही ते येऊ शकले नव्हते.

Legend Pele Story
Sunburn Festival: गोवा सरकार नेमकं कोण चालवतंय?

अर्जेंटिनाच्या विश्वकरंडक दिग्विजयानंतर ‘सार्वकालिक महान कोण? (जीओएटी- ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) या फुटबॉल जगतातल्या चिरंतन चर्चेला पुन्हा एकदा तोंड फुटले. त्याचे खरे उत्तर तेव्हा ब्राझीलमधल्या त्या इस्पितळातील खाटेवर कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या जोरावर टिकाव धरुन होते. पेले यांची मैदानातली कारकीर्द कधीच संपुष्टात आली होती.

एक ऑक्टोबर 1977 रोजी त्यांनी अंतिमत: आपले खिळेदार फुटबॉलचे खेळजोडे खुंटीला टांगले, तेव्हा आत्ता जगज्जेते म्हणून जयघोषात न्हाऊन निघालेले आणि पराभूत होऊन मायदेशी परतलेले दिग्गज फुटबॉल सितारे जन्मालासुद्धा आले नव्हते. कतारमध्ये नुकत्याच खेळलेल्या एकाही संघातल्या एकाही खेळाडूने पेलेचा खेळ याचि देही, याचि डोळा पाहिलेला नसेल.

पेलेचा महिमा दिसला तो चित्रफितींवर कोरलेल्या लढतींद्वारे, आणि गावगन्ना पारायण होणाऱ्या पेलेचरित्रामुळे. साठ-सत्तरीच्या दोन्ही दशकात मिळून उणीपुरी 22 वर्षे पेले यांनी जग पादाक्रांत केले. फुटबॉलचा खेळ जगाच्या कोनाकोपऱ्यात नेला, आणि सन्मानाने निवृत्त झाले. त्याआधी त्यांनी आपल्या ब्राझीलला एक-दोनदा नव्हे, तीनदा विश्वकरंडक जिंकून दिला होता.

ब्राझील ही फुटबॉल जगतातली महासत्ता मानली गेली ती पेले उदयानंतरच. किंबहुना, फुटबॉलचा इतिहास पाहू गेल्यास दोन ढोबळ कालखंड दिसून येतात. पहिला पेलेपूर्व आणि दुसरा पेलोत्तर! हे म्हणजे मानवी उत्क्रांतीचा इतिहास ‘चाकाचा शोध लागण्याआधीचा, आणि नंतरचा’ असा अभ्यासला जावा, त्याप्रकारचेच.

पेले यांनी झळकावलेल्या 1281 गोलांची आकडेवारी अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे, आणि फुटबॉलमधील त्यांच्या कामगिरीवर लक्षावधी पृष्ठे लिहून झाली आहेत. पण हिशेबाच्या खतावणीपलिकडेही पेले खूप काही होते. अनेकांसाठी ते प्रेरणास्थान होते, काहींसाठी चक्क दैवत होते, बहुतांसाठी मदतीला धावून येणारे तारणहार होते. पेले यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात खूप मोठ्या प्रमाणात समाजसेवा केली.

गरीबी, अडाणीपणा यांनाही माणुसकीच्या लत्ताप्रहारानिशी बाहेर घालवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गरजूंच्या औषधोपचारांसाठी त्यांनी देशोदेशी स्वयंसेवी संस्थांचे जाळे उभारण्यासाठी हातभार लावला. स्वत: प्रदर्शनीय सामन्यात उतरुन चांगल्या कामासाठी पैसा गोळा करण्याचा खटाटोप केला.

भारतातही कोलकात्यात एखादा सामना ते खेळून गेले आहेत. वास्तविक फुटबॉल या खेळाला हुल्लडबाजी आणि अंमली नशेचाही शाप आहे. क्रिकेटसारखा हा काही जंटलमन लोकांचा खेळ नव्हे. इथे रांगडेपण पणाला लागते. खेळताना आणि बघतानाही! पण पेले या दोन्ही तमोगुणांपासून दूर राहिले. किंबहुना म्हणूनच अखेरपर्यंत ते सर्वांसाठी आदर्शवत राहिले. पेले यांच्या खेळाकडे बघून एक पिढीच्या पिढी फुटबॉलच्या आकर्षणापायी मैदानाकडे वळली.

यापैकी सर्वांनाच ‘आपणही पेले व्हावे ’ अशी स्वप्ने पडत होती…पण पेले यांच्या आधी कोणीही पेले नव्हता, आणि नंतरही झाला नाही. डेव्हिड बेकहॅमपासून दिएगो मॅरादोनापर्यंत, झिनेदिन झिदानपासून लिओनेल मेस्सीपर्यंत आणि रोनािल्डन्योपासून नेमारपर्यंत सगळ्यांनाच आयुष्यात ‘पेले’ व्हायचे होते. ‘फुटबॉलमधला सार्वकालिक महान खेळाडू कोण?’ या प्रश्नाची अनेक उत्तरे मिळतात. पण या प्रश्नाच्या आधी ‘पेलेनंतर…’ हा प्रास्ताविक शब्दही अनुस्युत असतो.

Legend Pele Story
Book: सर्वस्पर्शी लेखनाची झगझगती 'नाममुद्रा'

पेले यांचे बालपण फार कष्टाचे गेले.घरची गरिबी होती. वडील डोडिन्यो यांची नोकरी बेतासबात, घरात खायला चार-पाच तोंडे. साव पावलोनजीकच्या बौरु नावाच्या वस्तीत एडसन अरांटेस डो नेसिमेंटो ऊर्फ डिको नावाचा एक वांड पोरगा वाढीस लागला होता. वडील डोडिन्यो स्वत: चांगले फुटबॉलपटू होते, पण काही कारणाने त्यांना चांगली कारकीर्द नाही घडवता आली.

लहानग्या डिकोला मात्र त्यांनी ब्राझिलियन फुटबॉलचे धडे दिले. ब्राझीलचा फुटबॉल हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. त्याला ‘जिंगा स्टाइल’ खेळ म्हटले जाते. काहीशी रांगडी, धसमुसळी आणि प्रतिस्पर्ध्याची फजिती करण्यात आनंद मानणारी ही आक्रमक शैली होती. फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय नीतीनियमांनी ही जिंगा शैली आताशा पार गोठवून टाकली आहे.

रोनाल्डो, किंवा रोनाल्डिन्योच्या खेळात ती कधी कधी दिसते. टरबुजाएवढा तो चेंडू पायावर, गुडघ्यांवर, खांद्या-डोक्यावर खेळवत ठेवण्याचा ‘सोंब्रेरो’ हुन्नर याच जिंगा शैलीतून निपजलेला. पेले या सगळ्यात वाकबगार होते. त्यांची ‘बायसिकल किक’ तर स्टेडियम अक्षरश: डोक्यावर घेणारी ठरायची. त्यांच्या सदऱ्यावरला ‘10’ चा आकडा तर जगन्मान्य शुभांक ठरला.

आजही ‘10’ आकड्याच्या सदऱ्याला केवढा तरी मोठा मान असतो. अर्थात हे ‘दस नंबरी’ अढळपद पेले यांनाही सहजासहजी मिळाले नाही. लहानपणी त्यांना. त्यांचे वडील डोडिन्यो, एक पिकलेला आंबा हातात देत. ‘पाय-खांदे-डोके यांचा वापर करत तो उडता ठेवायचा. जमिनीवर पाडायचा नाही. बराच काळ असा सराव केल्यानंतर तो खाताही आला पाहिजे,’ ही पूर्वअट असायची. पेलेसाठी आंबा हे खायचे फळ नव्हते, तसे ते असते तर पुढला इतिहास घडला नसता!

कोवळ्या वयात व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून खेळू लागलेल्या पेले यांची एक अतिशय हृदयस्पर्शी आठवण त्यांच्या चरित्रात नमूद केलेली आहे. त्या सुरवातीच्या काळात एक दिवस शिबिरातून परतल्यावर पेले यांनी आई, सेलेस्टेच्या हातात एक डबडे ठेवले. तो ट्रान्झिस्टर होता. त्या काळात ती अपूर्वाईची गोष्ट. ‘डिको, कशाला एवढा खर्च?’ वगैरे आईचे बोल ऐकून घेतले.

मग ते हळू आवाजात पुटपुटले, ‘‘ भविष्यात विश्चकरंडक स्पर्धेत मी कसा खेळलो, हे समालोचनातून तुम्हाला समजावे, म्हणून आणला…’’ योगायोग असा की यानंतर काही महिन्यातच डोडिन्यो आणि सेलेस्टेच्या लाडक्या डिकोने विश्वकरंडक संघात स्थान मिळवले होते…पुढे फुटबॉलजगतात पेले नावाचा जल्लोष सुरु झाला, तो आजतागायत सुरु आहे.

मिथके सहजासहजी जन्माला येत नाहीत. प्रतिभेची देणगी असतेच, पण त्यासोबत अपार कष्ट, वेदना, अवहेलना, अपमान यांचीही विषारी वेटोळी उलगडत, वळवळत येत असतात. चालती बोलती मिथके बनलेल्या या सिताऱ्यांना लाभणाऱ्या लोकप्रियता किंवा ऐश्वर्याने सामान्यांचे डोळे दिपतात, पण त्यापलिकडे एक वैराण प्रांत तुडवला गेला आहे, याची जाणीवही नसते.

पेले हे असेच एक मिथक आहे. तुलनाच करायची झाली तर, असेच एक सप्तरंगी मिथक भारतीय संगीतक्षेत्रात होऊन गेले आहे. सप्तसुरांनी अवघे जग जिंकून एक गानकोकिळा गेल्याच सहा फेब्रुवारीला अज्ञाताच्या प्रवासासाठी निघून गेली. पेले यांचे मिथक त्याच जातकुळीचे. अशा मिथकांना मरण नसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com