वजं’ का ‘ओझं’

Pratibha karanzkar
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

मुलीला सणासुदीला माहेरकडूनही काही दिलं गेलं पाहिजे या भावनेतून मुलीच्या घरी फराळ पाठवणं ही पद्धत पडली असेल. काही ठिकाणी या फराळाचे पदार्थ मोठ्या पातेलीत किंवा टोपलीत घालून त्यावर विणलेला रुमाल टाकून ते डोक्यावर घेऊन मुलीचा भाऊ तिच्या सासरी जातो. यामध्ये आपल्या नंतर भावानेही बहिणीची विचारपूस करावी तिच्या घरी जावं, म्हणून असा प्रघात पडला असावा

प्रतिभा कारंजकर

गणेशोत्सव म्हणजे दरवर्षी आनंदाची, सुखासमाधानाची पर्वणी घेऊन येणारा सण. सगळ्यांचीच मने त्याच्या आगमनाने प्रसन्नतेने, उत्साहाने भरून गेलेली असतात, अशा सणासुदीच्या वेळी घरातल्या स्त्रीवर मात्र कामाचा अतिरिक्त बोजा पडत असतो. पण त्या तो सहजतेने पेलवून धरतात. कारण त्यांच्याही मनात येणाऱ्या बाप्पाचे स्वागत करायची उमेद असते. मनाची प्रेरणा ही कधीही शारीरिक कष्टापेक्षा मोठी ठरते, जो उत्साह कामे करताना आलेला असतो त्यामागे भक्ती, प्रेम संस्कार, रीतिरिवाज यांचा पगडा असतो. त्यामुळे ते सहजप्राय होऊन जातं. त्याप्रमाणे केलं गेलं नाही, तर तिच्या मनाला रुखरुख लागून राहते. रोजच्या नैवेद्याच्या, गणपतीच्या, तयारी बरोबर फराळाचे पदार्थ करून ठेवायला लागतात. कारण गणपतीच्या निमित्ताने पै पाहुणे घरी येतात. त्यांना लाडू मोदक नवऱ्या प्रसाद म्हणून द्याव्या लागतात. शिवाय गोव्याच्या पद्धती प्रमाणे नवीन लग्न झालेल्या मुलीच्या सासरी अशा फराळांच्या पदार्थांची भेट म्हणजे ‘वजं’ पाठवायचं असतं, त्याची आधीपासूनच तयारी करावी लागते.
पूर्वीच्या काळी मुलीच्या घरी पाच नारळ त्याला हळद- कुंकू, पिर्डुका, जोडवी लावून ते सवाष्णीचे वाण म्हणून पाठवले जायचे, पण नुसतेच पाच नारळ कसे पाठवायचे, म्हणून मग आई आपल्या लेकीला आवडणारे गोडाधोडाचे चार पदार्थ करून पाठवू लागली असावी. लेक सासरी गेल्यावर आईच्या हाताच्या पदार्थांची तिलाही आठवण होत असेल या भावनेतून आई आपल्या हाताने बनवून पाठवत असे. पण तेव्हा ती केवळ गृहिणी असल्याने तिला अशा कामांना वेळ मिळत असे. शिवाय एकत्र कुटुंब पद्धतीत दहा जणींचा हातभार लागत असे. जमलंच तर शेजारच्या बायकाही मदतीला यायच्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात करणं शक्य होत होतं. गणपतीला मूळ घरी गोव्यातले, गोव्या बाहेरचे सगळे एकत्र यायचे. दिवाळी सारखे करंजा, मोडक, लाडू, चिरोटे, शंकरपाळी, तिखेपोहे, चिवडा चकली, शेव, कापं सगळं घरच्याघरी निगुतीनं केलं जायचं. त्यात तिला आपला सुगरणपणा दाखवायला वाव असे. पण आता स्त्री ही नोकरीपेशा असल्याने तिला घरासाठी एव्हढा वेळ देता येत नाही. एकटीने करण्याचे हे काम नव्हे त्यामुळे बरेचजण हे पदार्थ ऑर्डर देऊन बनवून घेतात. या बाजारच्या पदार्थांना तिच्या हाताची चव त्याला येणार नाही हे ठाऊक असते पण तिचाही नाइलाज असतो. पण त्यामुळे एक फायदा झाला. स्वयंरोजगार करणाऱ्या छोट्या मोठ्या स्वयंसेवी गटांना, घरगुती गृहोद्योग करणाऱ्या स्त्रियांना त्यामुळे व्यवसायाचे साधन मिळते. ऑर्डर आली की त्याही जोमाने कामाला लागतात. सणाला खर्चासाठी चार पैसे त्यांच्या हाती खेळू लागतात. हे जरी खरे असले तरी आताची परिस्थिती पाहता या ओझं देण्यामध्येही चढाओढ लागलेली दिसते कुणी सतरा जिन्नस बनवून पाठवले तर त्यावर कडी करण्यासाठी कुणी एकवीस बनवून पाठवू लागलेय. हे मनाला पटत नाही इथे आपापली ऐपत पाहून खर्च केला गेला पाहिजे. पण सध्या आपली आर्थिक स्थिती किती चांगली आहे याचेच जास्त प्रदर्शन होताना दिसते. एखाद्याची आर्थिक स्थिती तितकीशी चांगली नसेल तर त्याने कुठून पैसे आणायचे? की त्यासाठी कर्जबाजारी व्हायचे? कुठल्याही मुलीला आपले आईवडील, भाऊ असे त्रासात पडलेले बघणं आवडणार नाही. रितीभाती पद्धत इथपर्यंत थोडक्यात आटोपतं घेतलं पाहिजे.
निरनिराळ्या धर्मात, जातीत, आणि समाजात निरनिराळ्या रूढी परंपरा आणि कर्मकांड सांगितलेली असतात, प्रत्येक रूढी मागे पूर्वीच्या काळी काहीतरी अर्थ असणारच पण तो संदर्भ संपला ती परिस्थिती बदलली तरी ती रूढी बंद होत नाही, ती चालूच राहते.
मुलीला सणासुदीला माहेरकडूनही काही दिलं गेलं पाहिजे या भावनेतून मुलीच्या घरी फराळ पाठवणं ही पद्धत पडली असेल. काही ठिकाणी या फराळाचे पदार्थ मोठ्या पातेलीत किंवा टोपलीत घालून त्यावर विणलेला रुमाल टाकून ते डोक्यावर घेऊन मुलीचा भाऊ तिच्या सासरी जातो. यामध्ये आपल्या नंतर भावानेही बहिणीची विचारपूस करावी तिच्या घरी जावं, म्हणून असा प्रघात पडला असावा. सुनेच्या माहेरहून आलेले जिन्नस मग शेजारी पाजारी, नातेवाईकांच्या घरी पाठवले जायचे, ‘वानवळा’ म्हणून! इथे पुन्हा श्रीमंत गरिबीचा प्रश्न उभा रहात असेल. सून गरीब घरची की धनवान माहेरची ह्याचं प्रदर्शन होत असेल. आता तर वाढत वाढत या बरोबर कुणी कपडेलत्ते, सोन्याचे दागदागिने हेही पाठवताना दिसतात मग मूळ उद्देश मागे पडला असा वाटतं. आलेले जिन्नस चार घरी वाटून खायचे, ही आपली संस्कृती ‘एक तीळ सात जणात वाटून खावा’ हे शिकवणारी. गणेशचतुर्थी एक निमित्त असतं सगळ्यांनाच या सणाचा आनंद उपभोगता यावा, सगळ्यांच्या मुखी चार गोडाधोडाचे घास पडावेत ही प्रामाणिक इच्छा त्यामागे असावी. आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन हा भाग नसतो. अशा प्रवृत्तीचे लोकही समाजात बघायला मिळतात. ‘वजं’ हे माहेरच्या लोकांसाठी ‘ओझं’ बनून रहाता कामा नये. जे देणार ते स्वखुशीने आपुलकीच्या भावनेने दिलं गेलं पाहिजे. ज्या रीतीभाती आपण पाळत आहोत त्यात कालानुरूप बदल केला पाहिजे. माहेर गरीब आणि तुलनेने सासर श्रीमंत असेल तर सासरहून माहेरी ‘वजं’ जायला पाहिजे.
यंदा या लॉकडाऊन च्या काळात बरेच लोकांची नोकरी गेलेली पाहायला मिळते त्यांना अशा वस्तूंपेक्षा पैशाची गरज असेल तर तिथे ती त्यांची गरज भागवावी. अगदीच मनाला पटत नसेल तर शास्त्र म्हणून एखादी मिठाई नारळासोबत पाठवली तरी चालण्यासारखे आहे. कुणी कुणाला नावे ठेवायचा प्रश्न येणार नाही कारण बरेच जण यात भरडले जाताएत. अशावेळी मनात पण, किंतू न आणता जेव्हढं आपल्याला शक्य आहे तेव्हढं करावं. मुलीला तुम्ही दिलेली प्रेमाची मायेची आधाराची शिदोरी पुरेशी असते. ती मात्र भरभरून द्यावी हे खरे चतुर्थीचे ‘वजे’ म्हंटता येईल. बाकी या गणपती बाप्पाच्या कृपाशीर्वादाने मिळत गेलं तर याची भरपाई नंतर करता येईलच, असा विश्वास मनात ठेवून त्या बाप्पालाच “या संकटातून सगळ्यांची लवकरात लवकर सुटका कर” म्हणून प्रार्थना करूया आणि चतुर्थीचा सण यंदा आपआपल्या घरीच राहून साजरा करूया.

संबंधित बातम्या