झोन बदला

प्रा. रामदास केळकर 
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020
आपण जर वैज्ञानिकांचा इतिहास पाहिला तर त्यात तुम्हाला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवेल ती म्हणजे एकेक शोध म्हणजे चुकांच्या दुरुस्त्या. आतासुद्धा कोरोनावर लस यावी यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. याशिवाय एखादे औषध यावे म्हणूनही स्पर्धा सुरू आहे, पण एखादा शोध म्हणजे ‘पी हळद आणि हो गोरी’सारखे नाही
प्रा. रामदास केळकर 

माणूस म्हटला की त्याच्याकडून बऱ्या वाईट गोष्टी घडणे स्वाभाविक. बरेचदा  ह्यातूनच  आपला  स्वभाव बनत जातो, पण या स्वभावामध्ये चुका  शोधण्याची  सवय  मात्र  घातक  ठरते. समाजात यातून  वेगळे घटक दिसायला  लागतात. त्यात चुका  शोधणारे  व  टीका  करत  राहणारे, चुका  माहिती  असूनही  गप्प  राहणारे आणि चुका  दुरुस्त  करून त्या  सुधारणारे. आपल्याला व्यक्तिमत्व  विकास  साधण्यासाठी  शेवटच्या  झोनमध्ये ग्रीन झोनमध्ये  जायचे  आहे. मानवी इतिहासात जे  वेगवेगळे  शोध  लागू  शकले त्यात  पूर्वीच्या प्रयत्नात  दुसऱ्याने  टाकलेली  भर  तेवढीच  महत्वाची ठरली. त्यात  त्याला यश मिळाले. प्रयत्नात  भर  टाकली  म्हणजे काय? तर आधीच्या  चुका  त्यांनी  दुरुस्त  केल्या. नुसत्या  चुका दाखवत वर त्यावर  टीका टिप्पणी  करत  राहिले असते, तर  पुढचे  प्रयत्न  थिटे  राहिले  असते.
आपण  जर वैज्ञानिकांचा इतिहास  पाहिला तर  त्यात  तुम्हाला  प्रकर्षाने एक गोष्ट जाणवेल  ती  म्हणजे  एकेक शोध म्हणजे  चुकांच्या  दुरुस्त्या. आतासुद्धा कोरोनावर  लस  यावी  यासाठी  जगभर  संशोधन  सुरू  आहे. याशिवाय  एखादे  औषध  यावे  म्हणूनही स्पर्धा  सुरू  आहे, पण एखादा  शोध  म्हणजे ‘पी हळद आणि हो गोरी’सारखे नाही. त्यामागे अथक  परिश्रम तर  लागतातच. शिवाय तुमच्या  संयमाचीही  त्यात  परीक्षा दडलेली असते. पूर्वी  धर्म, सत्ता याची  भीती होती. त्यामुळे एखाद्याला  निष्कर्षही  जाहीर  करताना  हजारवेळा  विचार  करावा  लागे. काहींना  दुसऱ्या  राष्ट्राचा  आधार  घ्यावा लागे. पूर्वी कुठलीही  प्रगत  साधने  नसताना  केवळ निरीक्षणावर निष्कर्ष  काढले जात. अरिस्टोटल, गेलिलोव्ह, कोपर्निकस, न्यूटन  आदी  वैज्ञानिकांची  मांदियाळी  आठवा  आणि त्यांनी लावलेले  शोध पाहा. असो. व्यक्तिमत्व विकासात संयम आणि परिश्रम या दोघांची  विलक्षण  कसोटी असते. अनेकदा  या  गुणांवर  आपल्याला  यश  मिळते  खरे, पण ते  पचविण्यासाठी लागणारे  गुण  नसल्याने त्या  यशाला  तेवढी  किंमत  राहत  नाही. आपल्या  पदाचा मिळालेल्या सुविधांचा तसेच पावरचा ज्यांना  योग्य  उपयोग  करता आला  तर  सोने पे सुहागा. म. गांधीजींनी  नियम  तयार करण्यापूर्वी रांगेतल्या अखेरच्या  माणसाचा विचार  करायची  सूचना  केली  होती, पण आज नेमके  उलट  होताना  दिसते. पुढे  पुढे  करणारे  आर्थिक  लॉबीचा प्रभाव  असणारे  लोक आपल्याला  हवे  तसे  नियम तयार  करून घेतात. वाकवून पदरात  हवे  ते मिळवून घेण्यात यशस्वी  होतात. त्यांना  स्वार्थाशिवाय  अन्य गोष्टी  दिसत  नाहीत.  अधिकारीही  याला बळी  पडताना दिसतात. एकेकदा  नव्हे  तर  बरेचदा एखादे  संकट  आपल्याला  संधी  देऊन जात  असते. संकट  असो  की सुखद  स्थिती. ही  काही  कायम नसते. न्यूटन  या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाची  प्रसिद्ध  थिअरी  मांडली, त्यापूर्वी ब्लॅक  प्लेगची  साथ  होती. केम्ब्रिज  विद्यापीठ  बंद  पडले होते, तेव्हा  न्यूटन वुल्स्थरोपला राहायला गेले  होते.  इथे  त्याने  एक सफरचंद खाली  पडताना  पाहिले होते आणि  ते पाहून  त्याच्या डोक्यात  विचारचक्र  सुरू  झाले  आणि त्यातून  जगाला  गुरुत्वाकर्षणाची  थेअरी सापडली. आतासुद्धा  आपल्याकडे  कित्येक  घटना  घडत  असतात.  कुठे  रस्त्यावर  पाणी  येते, गटारे  तुंबलेली  आढळतात, माणसे  बेजबाबदारपणे  वागताना  दिसतात. कोरोना महामारीत तर  आपल्याला  सर्वत्र चुकाच  दिसू लागतात, पण यावर  उपाय  सुचवायला
सहसा  कुणी  येत  नाही. चुका  शोधणे ह्यात चूक  ती काय? पण त्यावर  मात कशी करायची  हे जर  कोणी दाखवून  दिले, तर  संपूर्ण  मानवजातीचे  कल्याण  त्यातून  साधता  येईल. यासाठी  घटनेच्या  पलीकडे  बघण्याची  दृष्टी  आपल्यात विकसित  होणे क्रमप्राप्त  असते. अर्थात ही  दृष्टी  सहजासहजी गवसत  नाही. त्यासाठी  परिश्रम, चिकाटी  अभ्यास  चिंतन या  सर्वांची  गरज  असते. अलीकडे ऑनलाईन  अभ्यास  करणे  भाग  पडत  आहे.  त्यात  अनेकांच्या अनेक  समस्या, पण त्या  दूर  करण्यासाठी  प्रयत्नशील असणारे  फार  थोडेच  असतात. एखाद्या विद्यार्थ्याला  गरिबीमुळे विशिष्ट  फोन  घेता  येत नसेल, तर एखाद्या  धनवान  माणसाने  त्याची  गरज पुरी करायची  उदाहरणे  फार कमी  आढळतात. बुक  बॅंक प्रमाणे लॅपटॉप, मोबाईल  बॅंक  आपण  सुरू  करू शकतो  का? असे विचार  येणे  व त्यावर  प्रत्यक्ष  कारवाई  होणे  याला व्यक्तिमत्व  विकासाचे उदाहरण  म्हणू शकतो. आपणही  ह्या दृष्टीने  विचार  करायचा  प्रयत्न  करूया. आपल्याकडून  कल्याणकारी  गोष्टी  होऊ  शकतील यात  तुमचाही विकास  साधला  जाईल.

संबंधित बातम्या