नाताळ सण मोठा, नाही आनंदा तोटा

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

हिंदू धर्मियांमध्ये जसे ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा’ असे म्हणतात, त्याचप्रमाणे ख्रिस्तीधर्मियांमध्येही तीच भावना ‘नाताळ’ सणाबाबत असते. 

हिंदू धर्मियांमध्ये जसे ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा’ असे म्हणतात, त्याचप्रमाणे ख्रिस्तीधर्मियांमध्येही तीच भावना ‘नाताळ’ सणाबाबत असते. तसे हिंदू धर्मियांचे दिवाळी, दसरा, पाडवा, गणेश चतुर्थी वगैरे अनेक आनंदाचे सण असतात व बाळ-गोपाळांपासून वयोवृध्दांपर्यंत सगळे या आनंदोत्सवात सामील होतात. पण, ख्रिस्ती बंधू-भगिनींमध्ये त्यांच्या आनंदाला उधान आणणारा एकमेव सण म्हणजे नाताळसण हा होय.

नाताळसण म्हणजे भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मसोहळा साजरा करण्याचा एक आनंदी मुहूर्त होय. दया, क्षमा, शांती आणि सद्‍भावना व परोपकार आदि सद्‍गुणांची शिकवण देणारा हा सण, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी एकमेकांबद्दलच्या प्रेमाचे संवर्धन करण्यासाठी आणि आपापसातील छोटे-मोठे मतभेद विसरुन ‘जगा आणि जगू द्या’ हा संदेश देणारा हा सण. ख्रिस्ती समाज त्याच भावनेने या आनंदोत्सवाकडे पाहतात व त्याच ईर्ष्येने तो साजरा करतात. प्रत्येक धर्मामध्ये सद्‍भावनेने, सद्विचाराने आणि सत्कर्माने जगण्याचा संदेश दिला जातो. हाच संदेश नाताळ सणामध्ये अंतर्भूत आहे. संत ज्ञानेश्वरांनी जी ‘हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना मांडली. तीच संकल्पना संत येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाच्या या सोहळ्यात आहे. प्रत्येक आस्तिक ख्रिस्ती समाज ही संकल्पना आपापल्या कुवतीनुसार बुध्दिनुसार पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. आणि इतर धर्मियांनाही आपल्या या आनंद सोहळ्यात सामील करून घेतो. जसे दिवाळी, चतुर्थीला हिंदू बांधवांकडे ख्रिस्ती, मुस्लिम बांधव येतात, ईदनिमित्त हिंदू, ख्रिश्‍चन, मुस्लिम बांधवांना शुभेच्छा द्यायला जातात त्याचप्रमाणे नाताळच्या निमित्ताने ‘खाओ, पिओ, मजा करो’ साठी हिंदू व मुस्लिम बांधव ख्रिस्ती बांधवांकडे जाऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करतात.

अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या या सणाबाबत मला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची ‘ययाती आणि देवयानी’ मधील गीताची आठवण होते. कविश्रेष्ठ या गीतात म्हणतात,
सर्वात्मका शिवसुंदरा
स्वीकार या अभिवादना ।
तिमिरातुनी तेजाकडे
प्रभु आमुच्या ने जीवना ।।
सुमनांत तू गगनात तू
ताऱ्यांमध्ये फुलतोस तू ।
सद्‍धर्म जे जगतामध्ये
सर्वांत त्या वसतोस तू ।।
चोहींकडे रुपे तुझी
जाणीव ही माझ्या मना ।।
दिवाळी काय, ईद काय किंवा नाताळसाठी काय या सर्वांमध्ये असणारा प्रभू, अल्ला, येशू हे  सर्वव्यापी आहेत आणि सर्वांना प्रकाशाची किरणे दाखवत जगाला सद्‍धर्माचा संदेश देत आहेत. अशावेळी सर्वधर्मियांनी त्या भगवंताला मनोभावे अभिवादन करणे म्हणजेच सर्वांसाठी सुख, शांतीची प्रार्थना करणे होय.

खरं तर साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक धर्मातील प्रत्येक सणामागे काही ना काही धार्मिक, पौराणिक, आध्यात्मिक संदर्भ असतात. हे संदर्भ प्रत्येक काळाला लागू पडतात. काळ ज्या गतीने पुढे सरकतो त्या गतीने मात्र मनुष्य स्वभावात बरा असो किंवा वाईट असो, फारसा फरक पडत नाही. जीवनाचे संदर्भ अनेकवेळा बदललेले दिसतात, पण मूलभूत संकल्पनांमध्ये विशेष फरक पडलेला दिसत नाही. समाजरचना काळापरत्वे थोडीफार बदलते हे खरे. पण त्याचा ढाचा बदलत नाही. मनुष्य प्राण्याच्या ठिकाणी सत्वे, रज आणि तमोगुण यांचे प्रमाण असतंच. पण व्यक्ती तितक्या प्रकृतीनुसार ते प्रमाण वेगवेगळं असतं. तरीही या तिन्ही गुणांचं अस्तित्व मात्र नाकारता येत नाही. अशावेळी मानव जातीमध्ये तारतम्य रहावं. त्यांच्या मतांना नैतिक अधिष्ठान प्राप्त व्हावे व त्यांच्या विचारामध्ये सुसूत्रता राहावी, सुसंस्कृतता राहावी या हेतूने ज्या संत-महंतांनी, महापुरुषांनी, नारीरत्नांनी जो मौलिक संदेश देऊन ठेवला आहे, त्या भव्य, दिव्य संदेशाचे, त्यांच्या आदेशाचे, त्यांच्या कर्तृत्वाचे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साजऱ्या होणाऱ्या सणांच्या जयंती-पुण्यतिथीच्या माध्यमातून आपण त्यांना स्मरण करतो. नाताळ सणही तसाच आहे. भगवान येशू ख्रिस्ताचा संदेश हा असाच मानव कल्याणार्थ आहे, असे मानून हा आनंदोत्सव साजरा केला जातो. त्याचा आपापल्यापरीने आनंद लुटत आपल्या ख्रिस्ती बंधु-भगिनींना शुभेच्छा देणे हे ओघानेच आले.

यावेळी ‘नाताळ’ ची पूर्वपीठिका जाणून घेणे औचित्यपूर्ण ठरावे. आपण एखाद्याचे बोलणे किंवा वागणे भलतीकडेच जात असेल, तर त्या व्यक्तीच्या बोलण्याला किंवा वागण्याला नाताळ, नातंत्र असे संबोधतो. त्याचा ‘नाताळ’ शी काहीही संबंध नाही. ‘नाताळीस’ या शब्दापासून ‘नाताळ’ची उत्पत्ती झाली. ‘नाताळीस’ म्हणजे जन्म घेणं, अर्थातच याचा संबंध येशू ख्रिस्ताच्या जन्माशी निगडीत आहे.

इसवी सन २८५ पासून ‘ख्रिसमस’ हा सण साजरा होऊ लागला. ‘नातालीस’ पासून या शब्दाला मग मराठीत ‘नाताळ’ संबोधलं जाऊ लागले. ‘नाताळ’ ख्रिसमस’ या शब्दांनी रुढ पावलेल्या ‘ख्रिसमस’ चा अर्थ काय बरे? ‘ख्रिसमस’ हा शब्द ‘खिस्त’ या शब्दावरून आला आहे. तर ‘खिस्त’ हा शब्द ‘खिस्तोस’ या शब्दावरून आला आहे व ‘अभिषीक्त राजा’ असा त्याचा अर्थ आहे. म्हणूनच ख्रिस्ताला ‘अभिषीक्त राजा’ म्हणूनच ओळखतात.
जेथे हा इतिहास घडत गेला, त्या रोम साम्राज्यात आधी सूर्याची उपासना केली जायची. मात्र इसवी सन २१३ मध्ये या रोम साम्राज्यात ख्रिस्ती धर्माला राजाश्रय मिळाला आणि त्याचा परिणाम मग सूर्याच्या उपासणेऐवजी ख्रिस्ताची उपासना करण्यात झाला. अर्थातच त्याकाळी ‘कॅलेंडर’ नव्हते. पुढे कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका अस्तित्वात आल्यानंतर ‘२५ डिसेंबर’ हा दिवस भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून निश्चित करण्यात आला. तेव्हापासून आज मितीपर्यंत २५ डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस ख्रिसमस-नाताळ म्हणून संपन्न करण्यात येतो.

या ख्रिसमसच्या, नाताळच्या म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने अनेक प्रथा आणि परंपरांचं पालन होतं. कोणत्या बरे या प्रथा किंवा परंपरा आहेत?
हा सण साजरा करताना गायीचा गोठा, ख्रिसमस ट्री, नाताळचा तारा, नाताळ भेटकार्ड आणि नाताळ सणाची गाणी आदि गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जात. कारण या प्रत्येकामध्ये बरीच प्रतीकं आणि संदेश यांचा अंतर्भाव केलेला आहे आणि त्याची महती आजही तितक्याच श्रध्दायुक्त भावनेने सांगितली जाते.

या सणामध्ये उभारण्यात येणाऱ्या गायीच्या गोठ्याचं महत्त्व फार आहे. संत फ्रान्सिस आॅसिसिकर यांनी ही परंपरा सुरू केली. त्यांनी जिवंत पात्रांद्वारे येशू ख्रिस्ताचा जन्मसोहळा उभा केला. उंट, मेंढ्या, तीन राजे, देवदूत, मेरी आणि तिचं छोटं बाळ या जिवंत पात्रांद्वारे त्यांना येशूजन्माची कथा लोकांपर्यंत पोहोचवयाची होती.

कालांतराने युरोपमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आणि मग जिवंत पात्राच्या जागी मग मूर्ती बसवल्या जाऊ लागल्या. आता मूर्ती बसवण्याची प्रथाच रुढ होऊन गेली आहे. या देखाव्यात येशूचे पालकत्व असणाऱ्या मारीया आणि जोसेफचे प्रेमळ रुप आपणांस दिसते. तीन राजे हे ज्ञानी लोकांचे प्रतीक आहेत ते ताऱ्याच्या दिशेने शोध घेत आले म्हणजेच त्यांच्या ठायी संशोधनवृत्ती होती. येशू जन्माच्यावेळी अवती-भवतीचे मेंढपाळ जमले. त्यांच्या ठायी कुतुहल आणि आनंद होता. येशूचा जन्म गोठ्यात झाला ही बाब आयुष्यात साधेपणा राखण्याचा संदेश देते. देवदुताने येशू ख्रिस्ताच्या जन्माची आनंदीवार्ता सांगितली. यातून सकारात्मकता पोहोचविण्याचा संदेश मिळतो. एखाद्या दुःखी किंवा कष्टी माणसाला आनंदाची वार्ता द्यावी, त्याच्या मनात सकारात्मकतेचं बीज पेरुन त्याचे नैराश्य दूर करावे, असा संदेश यातून मिळतो. अशा या नाताळसणाद्वारे सर्वांना कोरोना महामारीच्या महासंकटातून मुक्तता लाभावी, असा सकारात्मक विचार करून सर्वांना नाताळाच्या शुभेच्छा देऊया.

-शंभू भाऊ बांदेकर

संबंधित बातम्या