'ईव्हीएम' नाही तर आपला नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी काँग्रेस घेतोय डिजीटल वोटिंग

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

राजकारणात भाजपच्या तुलनेत मागे पडलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी डिजीटल पद्धतीने निवडणूक घेण्यात येणार आहे. मतदानात सहभागी होणाऱ्या सदस्यांना डिजीटल आईडी देण्यात येणार असून प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएमला विरोध करणाऱ्या काँग्रेसने निवडलेल्या या मार्गाची मात्र चांगलीच चर्चा होत आहे.    

देशातील सर्वांत जुना पक्ष म्हणून काँग्रेसची एक वेगळी ओळख आहे. धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही तत्वाने चालणारा पक्ष म्हणून काँग्रेसला आजवर अनेकांनी पसंती दिली आहे. अनेक वर्ष सत्ता उपभोगलेला हा पक्ष आता मात्र लयास जाण्याच्या मार्गावर उभा आहे. अधूनमधून काँग्रेसमधील अनेक नेते या अधोगतीचं खापर त्यांच्या पक्ष नेतृत्वावरच नाव न घेता फोडत असतात. मात्र, तरीही गांधी घराण्याच्या बाहेर पक्षाचं अध्यक्षपद जात नाही. यावेळी आपला नवा अध्यक्ष निवडण्यासाठी काँग्रेस पक्ष एक नवीन शक्कल लढवली आहे. राजकारणात भाजपच्या तुलनेत मागे पडलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी डिजीटल पद्धतीने निवडणूक घेण्यात येणार आहे. मतदानात सहभागी होणाऱ्या सदस्यांना डिजीटल आईडी देण्यात येणार असून प्रत्येक निवडणुकीत ईव्हीएमला विरोध करणाऱ्या काँग्रेसने निवडलेल्या या मार्गाची मात्र चांगलीच चर्चा होत आहे.    

काँग्रेस अध्यक्ष निवडीसाठी ऑल इंडिया काँग्रेस कमीटी (एआयसीसी)चे  सदस्य मतदान करतील. मात्र, यात सर्वांचा समावेश करण्यात आलेला नाही. एआयसीसीचे डेलीगेट्सच या प्रकियेत भाग घेऊ शकतील. म्हणजेच काँग्रेसचे पदाधिकारी व जेष्ठ नेत्यांची एक यादी असून त्यात १५०० लोकांचा समावेश आहे. यांनाच एआय़सीसी डेलीगेट्स म्हटलं जातं. पक्षाशी संबंधित अनेक महत्वपूर्ण निर्णयांसाठी हे जबाबदार असतात. यात उदाहरण दाखल काही लोकांची नावे द्यायची झाली तर प्रियांका गांधी, रणदीप सुरजेवाला, शशी थरूर, अहमद पटेल, अजय माकन, केसी वेणुगोपाल, हरीश रावत या नेत्यांचा समावेश होतो.     

 २०१७मध्ये राहूल गांधी यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यावेळी एआयसीसी डेलीगेट्सची जी यादी होती. तीच यावेळीही कायम करण्यात आली आहे. त्यावेळी ज्यांनी मतदान केले तेच सदस्य यावेळीही मतदान करतील. नवीन अध्यक्ष निवडीची ही नवीन प्रकिया काय असेल यावर पक्षाची मतदार यंत्रणा काम करत आहे. या यंत्रणेत ५ सदस्य आहेत. मधुसुदन मिस्त्री, अरविंदर सिंह लवली, राजेश मिश्रा, कृष्णा गौडा, एस ज्योतिमणी यांचा यात समावेश आहे. या यंत्रणा सर्व मतदारांना डिजीटल आयडी देण्याची प्रक्रिया  करत असून. मतदानाची तारीख निश्चित झाल्यावर त्या दिवशी मतदार आपले मत ऑनलाईन पद्धतीने नोंदवू शकतील. हे मतदान गुप्त पद्धतीने करण्यात येणार असून कुठल्याही ठिकाणावरून मतदान करता येणार आहे. 

सद्यस्थितीत सोनिया गांधी या पक्षाध्यक्षपदी काम बघत आहेत. त्यांनी प्रदीर्घ काळासाठी पक्षाचं काम पाहिलं आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर राहत नसल्याने त्या पूर्णवेळ पक्षाचे काम करण्यास समर्थ नाहीत. त्यांनी छातीच्या दुखण्यामुळे काही काळ गोव्यात काढण्याचा निर्णय घेऊन त्या पणजीत काल दाखलही झाल्या. दिल्लीतील प्रदुषणापासून बाहेर जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता.  

संबंधित बातम्या