...आणि विझले निखारे पुन्हा सरले

जून 1946... एक दिवस असा उजाडला, ज्याने म्लान झालेल्या गोवा मुक्तीच्या चळवळीला पुन्हा अंगारांची शपथ घातली
Contribution of Ram Manohar Lohia in the liberation movement of Goa
Contribution of Ram Manohar Lohia in the liberation movement of GoaDanik Gomantak

वाल्मिकी फालेरो

मे 1944 पासून लाहोर किल्ल्यात बंदिवान असलेले राममनोहर लोहिया मुक्त झाले, तरी तुरुंगवासाने त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांचे मित्र, गोव्यातील असोळणा गावचे डॉक्टर ज्युलियांव मिनेझीस मुंबईत कार्यरत होते. आपल्या या मित्राने आपल्यासोबत गोव्यात यावे आणि काही दिवस आराम करावा, असा सल्ला डॉ. मिनेझीस यांनी दिला आणि तो मानून डॉ. लोहिया गोव्यांत आले. तारीख होती 10 जून 1946.

लोहिया गोव्यात आल्याचे वृत्त सर्वत्र पसरले आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची पावले असोळणाच्या दिशेने धावू लागली. 15 व 17 जून रोजी मुरगाव व पणजी येथे तरुण कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर लोहियांनी आपण सार्वजनिक सभांवरील बंदी झुगारून मडगाव येथे 18 जून रोजी सभा घेणार असल्याचे जाहीर केले.

(Contribution of Ram Manohar Lohia in the liberation movement of Goa)

Contribution of Ram Manohar Lohia in the liberation movement of Goa
गोव्याला सुरक्षित अन्न उपायांसाठी सतत तीन वर्षे प्रथम पुरस्कार

17 जून रोजी मिनेझीस यांच्यासह मडगावात येऊन त्यांनी दामोदर विद्यालयात काही राष्ट्रवाद्यांची भेटही घेतली. सभेला अपशकून करण्याचा पोर्तुगिजांचा बेत असल्याची कुणकुण लागल्यामुळे ते त्या रात्री असोळण्याला परतले नाहीत. शहरातच हॉटेल रिपुब्लिकामध्ये त्यांनी ती रात्र काढली.

पोर्तुगीज पोलीस असोळण्याला खडा पहारा देत राहिले. त्यांनी मडगावातील सर्व टॅक्सीचालकांनी प्रवासी घेऊन कुठेही जाण्याआधी पोलिस स्थानकांत यावे, असे फर्मान सोडले. पोलिसांनी सभास्थळालाही घेराव घातला. अर्थात आजूबाजूला लोक थव्यांनी उपस्थित होतेच. पोलिसांना चकवा देताना लोहिया आणि मिनेझीस टॅक्सीऐवजी घोडागाडीने सभास्थळी आले. कडे केलेल्या पोलिसांनी त्यांना आत सोडण्यास नकार दिला. मात्र ''बाजूला व्हा! '' असे अधिकारवाणीने सांगणाऱ्या लोहियांच्या आक्रमक व्यक्तिमत्त्वापुढे पोलिस शिपाईही ढेपाळले. तीन व्यक्ती लोहिया- मिनेझीस याना हार घालण्यासाठी पुढे आल्या. इतक्यात मडगावचा पोर्तुगीज पोलीस प्रमुख फॉर्च्युनातो मिरांदा याने लोहियांवर रिव्हॉल्व्हर रोखले.. लोहियांनी मिरांदाच्या खांद्यावर हात ठेवला व त्याला शांत राहायला सांगितले. मिरांदाला बाजूस सारून ते लोकांना संबोधित करण्यासाठी निघाले. त्याच क्षणी शून्यातून अवरल्यासारखे लोकांचे लोंढे- त्यांत महिलांचाही लक्षणीय सहभाग होता- चारी दिशांनी मैदानाकडे येऊ लागले.

लोहियांनी तोंडून एकही शब्द काढू नये असा आदेश कॅप्टन मिरांदा याने दिला. प्रत्युत्तरादाखल लोहिया उत्तरले ''हिंमत असेल तर मला अटक करा!'' मिरांदाने चिडून पुन्हा आपले रिव्हॉल्व्हर लोहियांवर रोखलें आणि त्याना थांबण्यास फर्मावले.

Contribution of Ram Manohar Lohia in the liberation movement of Goa
गोव्याचे गणित चुकते कसे?

त्याच्याकडे हसून पाहात लोहिया ठामपणे म्हणाले, '' मी बोलणारच. तुमचे ते पिस्तूल खिशात ठेवा, मला त्याची भीती वाटत नाही.'' मिरांदा चकित झाला, मात्र त्याने लोहियांना काही शब्दच बोलण्याची संधी दिली. त्याने तिथे उभ्या असलेल्या पोलिसाना दोन्ही वक्त्याना उचलून नजिकच असलेल्या ''क्वार्तेल'' अर्थांत पोलिस स्थानकांत नेण्यास सांगितले. मग लाठीमार करून जमाव पांगवण्यात आला.

पांगलेल्या जमावाने पोलिस स्थानकाकडे कूच केली व लोहिया- मिनेझीस यांना मुक्त करण्याची मागणी तो करू लागला. यावर उपाय म्हणून पोलिसांनी दोन्ही नेत्यांना लोकांना घरी जायला सांगा अशी विनंती केली. लोहियांना ही संधीच मिळाली, लोकांना उद्देशून ते म्हणाले, ''गोमंतकियानो, निर्भयपणे विचार करा, निर्भय होऊन बोला, निर्भय होऊन लिहा ''. लोहियाना रातोरात पणजीला नेण्यात आले आणि दुसरे दिवशी वास्को येथे नेऊन रेल्वेत बसवून कॅसलरॉक येथे रवाना करण्यात आले.

या घटनाक्रमामुळे मुक्तीच्या चळवळीने धडाडून पेट घेतला. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे पिताश्री महात्मा गांधीनी आपल्या हरीजन या दैनिकातून पोर्तुगिजांना इशारा दिला, '' मुक्त भारतांत गोवा पोर्तुगिजांच्या अंमलाखाली पृथक राहू शकत नाही; मुक्त देशाच्या कायद्यांत ते बसणारे नाही. काळाची पावले ओळखून पोर्तुगिजांनी सन्मानजनक माघार घेणेच योग्य ठरेल.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com