कोरोनाची नव्या वर्षात नवी लाट, त्याने करू नये जग सपाट!

कोरोनाची नव्या वर्षात नवी लाट, त्याने करू नये जग सपाट!
Coronas new wave in the new year

गेल्या वर्षी म्हणजे २०२० सालच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये या विषाणूने आपल्या देशासकट जगाला घेरले. SARS-2  म्हणजे Sudden Accute Respirazry syndrome-2 ज्याला आपण कोविड-१९ म्हणून संबोधताे  ताे  विषाणू २०१९ साली सापडला आणि २०२० मध्ये त्याने जगात धुमाकूळ घातला. बळींची संख्या हा हा म्हणता शेकडो, हजारो, लाखो झाली तर रुग्णसंख्या काही कोटींच्या घरात गेली. दुर्दैवाने ती कमी होण्याची चिन्हे कमी, तर वाढण्याची चिन्हे अधिक दिसताहेत.


२०१९ च्या अखेरच्या महिन्यात अस्तित्वात आलेल्या या विषाणूच्या विषवल्लीने २०२० चे संपूर्ण वर्ष या महामारीच्या महालाटेने चिंताग्रस्त बनविले आणि आता डिसेंबर २०२० च्या अखेरीस या विषाणूने नवा अवतार धारण करीत ब्रिटनसह जगातील ५ मोठ्या देशांत धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोराेनाच्या या नव्या प्रजातीने नव्या वर्षात जगातील साऱ्यांचीच झोप उडवलेली आहे.


आपल्या भारत देशाचा विचार करता गेले वर्षभर या महामारीशी दोन हात करताना आपली दैन्यावस्था उडाली होती. तरीही त्यावर सर्वशक्तीनिशी मात करुन ही साथ आपण आटोक्यात आणू शकलो आहोत असा केंद्रापासून राज्य सरकारांना विश्‍वास  वाटत होता. या विषाणूवरची लसही आता दृष्टिपथात आहे. त्यामुळे जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीमध्ये भारतातून कोराेनाचा नायनाट होईल, असा अंदाज आणि उमेद  डॉक्टर्स, आरोग्यतज्ज्ञ, संशोधक व्यक्त करीत होते. या आशादायी वृत्तीने लोकांची चिंता  मिटत असल्याची चिन्हे दिसतानाच नव्या लाटेची दुःचिन्हे परत एकदा जगाला हादरवून साेडत आहेत.


सर्वप्रथम ब्रिटनमध्ये आढळलेल्या या विषवल्लीच्या अधिक घातक रुपामुळे पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात जगात  हाहाःकार माजेल व या नव्या संकटावर ताबा मिळवण्यासाठी सारे जग आपापसातले मतभेद िवसरुन आपापल्या देशांतील शास्त्रज्ञांच्या मदतीने लस लवकर बाहेर पडेल, ती परिणामकारक असेल व ती विनाविलंब भारतासकट या विषाणूने बाधित असलेल्या जगातील इतर विकसनशील देशांनाही तिचा उपयोग  होईल याकडे जगातील मुत्सद्यांनी अग्रक्रमाने लक्ष देणे आवश्‍यक आहे. कारण पूर्वीच्या  विषाणूपेक्षा हा विषाणू कितीतरी पटीने अधिक घातक असून त्याचा फैलावही अधिक झपाट्याने होत असल्याचे  प्रसिद्ध झाले आहे.  हे नवे संकट जगावर केव्हाही घोंगावत येऊ शकते अशी चाहूल मिळाल्यामुळे सर्वांनीच हे केवळ नवे संकट नाही, तर  नवे महासंकट आहे, याची खुणगाठ बांधून त्याच्या प्रतिकारासाठी जे जे करणे शक्य आहे, ते ते सर्व तत्परतेने करणे अत्यावश्‍यक आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे. 


मुळात हा विषाणू म्हणजे कमीत कमी सामान-सोबत असलेला एक फार स्मार्ट प्रवासी समजला जाताे. या विषाणूबरोबर असतो फक्त जिनोम. आणि हा जिनोम गुंडाळलेली एक प्रथिनांची पिशवी. हे इतके सामान घेऊन हा प्रवासी एखादी पेशी दिसली की, सरळ आत शिरतो. एकदा का तो आत शिरला  की मग हळूहळू हातपाय  पसरायला सुरुवात करतो. हा अतिसूक्ष्म जीव हे इतक्या सहजासहजी व तीव्रतीने करतो की काही कळण्याअगोदरच होत्याचे नव्हते व नव्हत्याचे होते होऊन जाते आणि माणसाच्या मानेवर जणू टांगती तलवार  लटकलेली असते आणि आता भय इथले संपत आहे असे वाटत असतानाच भय इथले संपलेलं नाही उलट त्या भयाची तीव्रता अधिक वाढलेली आहे, याची जाणीव होते आणि जीव कासावीस होतो.


 तुम्ही निर्भयी बना, तुम्ही आत्मनिर्भर बना, असे सांगून कोण, कुणाला अभय देऊ शकणार नाही. समजा, लस आली, तरी जगाला वेढलेल्या या महामारीचा विळखा इतका लवकर सैल होणे शक्य नाही. म्हणून हा विषाणू कायमचा गाडला जाईपर्यंत जागतिक आरोग्य संघटना (WHO), केंद्र सरकार, केंद्रातील सर्व आरोग्यविषयक यंत्रणा, राज्यातील आरोग्यविषयक संघटना आणि या महामारीशी दोन हात करण्यासाठी उभारलेली सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली, तरच आपला निभाव लागणार आहे. अर्थात त्याची कल्पना त्यांना नाही, असे कोणी म्हणणार नाही. पण हे सारे माहीत असूनही, ‘पण लक्षात कोण घेतो?’असे संबंधित अधिकारी, यंत्रणा नसतीलच असे छातीठोकपणे कोण बरे सांगू शकेल? या विषाणूपासून प्रत्येकाचे रक्षण करणे, त्यावर आवश्‍यक ते उपाय करुन त्यांना धीर देणे हे आपले आद्य व परम कर्तव्य आहे, याचा कृपया त्यांना विसर पडू देता कामा नये, ही नम्र विनंती अशावेळी कराविशी वाटते.


काय दैवदुर्विलास आहे बघा! खरंतर, कोराेना विषाणूच्या बाबतीत लस शोधण्यात िब्रटनने आघाडी घेतली आणि तेथे लसीकरणही सुरु झालेले आहे, पण विषाणूच्या या नव्या लाटेमुळे हे लसीकरणही  निष्प्रभ ठरेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. जगाच्या अनेक भागांमध्ये या विषवल्लीची निरनिराळी रुपे निरनिराळ्या भागामध्ये आढळून आली आहेत. जे विषाणू िब्रटनमध्ये आहेत त्यापेक्षा वेगळ्या रुपातील विषाणू मलेशिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांत आढळले आहेत. अशा या व्यामिश्र वातावरणामुळे शास्त्रज्ञही हिरमूड झाले, तर नवल  ते काय? 


काही का असेना, पण भरतीला देखील एक मर्यादा असतेच की नाही? तिथे पोहोचली की मग  आेहोटीला सुरुवात होते. या कोरोना विषाणूच्या लाटेलाही अशी मर्यादारेषा असणार किंवा असली पाहिजे व तेथूनच मग तिची आेहोटी सुरु होणार अशी मनाची ठाम समजूत करुन घेऊन तोपर्यंत आम्हाला रेतीत घट्ट पाय रोवून राहायचे आहे आणि या विषवल्लीला बजवायचे अाहे की आता आमची माघार नाही. आता माघारी जायची पाळी तुझी आहे.
एकंदरीत, कोरोनाच्या या नव्या लाटेमध्ये कमालीचा धोका आहे, हे ओळखून आपल्याला अगदी गंभीरपणे, खंबीरपणे नीट जबाबदारी ओळखून सामना करायचा आहे. मानव जातीपुढे आव्हान म्हणून नव्या वर्षात उभी ठाकलेली ही कोरोनाची नवी लाट जगातील मनुष्यप्राण्याला सपाट करुन जाऊ नये, यासाठी पाठ न दाखवता धैर्याने, शौर्याने आवश्‍यक पाठ आता सर्वांनी गिरवणे हेच आपल्या हाती आहे.
- शंभू भाऊ बांदेकर

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com