सृष्टिधर्म हाच नव्या युगाचा धर्म मानावा
Enverment.jpg

सृष्टिधर्म हाच नव्या युगाचा धर्म मानावा

शतकाच्या शेवटच्या पर्वात या बेबंध यांत्रि-तांत्रिकरणाचे (Technicalization) दुष्परिणाम दिसू लागले. सुरवातील ते प्रदुषणाचे, आरोग्यासंबंधीचे होेते. नष्ट होत चाललेल्या नैसर्गिक साधनसामुग्रीचे होते. वर्षागणिक ते उग्र बनत चालले. भविष्यातील धोके स्पष्ट दिसू लागले. त्यातून पर्यावरण (Environment) रक्षणासाठी जगभर चळवळी उभ्या राहू लागल्या. शतकाच्या शेवटच्या टप्प्यात या यंत्र-तंत्रयुगाचे दुष्परिणाम, समाजव्यवस्थेवर, अर्थव्यवस्थेवर, एवढेच नव्हे तर कुटुंब व्यवस्थेवरही दिसू लागले. यावर वैश्‍विक स्तरावर विचारमंथन सुरू झाले. डिसेंबर १९९९ मध्ये गोव्याच्या आर्चबिशपनी दोन-तीन दिवसांचे विचारसत्र आयोजित केले. त्याचा विषय होता ‘नवीन सहस्त्रकासाठी बायबलमधून नव्या दिशेचा शोध’. त्यातील एका सत्रामध्ये व्याख्यान देण्यासाठी मला निमंत्रित करण्यात आले. त्यात मी असा विचार मांडला की येणारे युग पर्यावरणीय समस्यांचे असेल. आज प्रचलित असलेल्या हिंदू, ख्रिश्‍चन, इस्लाम या प्रमुख धर्मात काल्पनिक देव त्यांचे व थोडेसे मानवी नैतिकतचे आध्यात्म आहे. त्या धर्म तत्वातून नव्या युगाच्या समस्यांना तोंड देता येणार नाही. पर्यावरणीय समस्यांसाठी सृष्टितत्वांचे पूजन व त्याला अनुलक्षून शाश्‍वत अशा नीतितत्वांचा उहापोह हा अरण्यात वास्तव्य करून राहिलेल्या वैदिक ऋषींनी केला होता. त्या तत्वांना धरून आपल्याला पुढे जाता येईल. सृष्टिधर्म हाच नव्या युगाचा धर्म मानावा लागेल.

नवीन सहस्त्रकाच्या पहिल्या दशकात मी पर्यावरणावर पन्नासएक लेख दै. "गोमन्तक'मध्ये लिहिले. दुसऱ्या एका वृत्तपत्रात साठ-सत्तर लिहिले. माझ्या आजुबाजूला, देशात व जगात घडणाऱ्या घटना, निरिक्षणे, चिंतने यातून मला वाटू लागले की सध्याची कॉर्पोरेट व्यवस्था सृष्टीला व मानवजातीला विनाशाकडे घेऊन जात आहे. त्या व्यवस्थेत सुधारणा घडवून आणता येईल, का निराळीच व्यवस्था बनवावी लागेल हा माझ्यासमोर प्रश्‍न होता. यावर चिंतन करता दिसून आले की सध्याच्या व्यवस्थेचा ढांचाच मूलतः सृष्टिस्नेही किंवा मानवस्नेही नाही. तो पायापासूनच बदलावा लागेल.
मग प्रश्‍न उभा राहिला की या भूमीवर, मानवी समाजात पाय रोवून आणि जग व्यापून राहिलेली ही व्यवस्था पूर्ण बदलणे शक्य आहे का? पण सकारात्मक विचारांची ताकद घेऊन चिंतन करता दिसून आले, की होय, श्‍ाक्य आहे आणि ते संघर्षाशिवाय, कुठल्याही मोठ्या धोक्याविना. कोणीही हा सकारात्मक लढा लढू शकतो. या विचाराने मला सृष्टिधर्म हे पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त केले. ते लिहून मराठीतील वैचारिक वाङ्मय प्रकाशनाबद्दल प्रसिद्ध अशा पुण्यातील प्रकाशन संस्थेकडे गेल्यावर्षी सुपूर्द केले. लागलीच कोराेनाचा लॉकडाउन लागला, पुण्याच्या साथीची उग्रता त्यामुळे प्रकाशन सध्या रखडले आहे.

सृष्टीची विशालता, भूपृष्ठाची विविध रुपे, हवामानाची विविध क्षेत्रे, त्यात वसलेले महाकाय देवमाशापासून सूक्ष्म किडे-जंतूपर्यंत चर जीवांचे अधिवास, विशालकाय वृक्षांपासून शेवाळ-बुरशीपर्यंत असंख्य अचर जीवजातींची क्षेत्रे, तसेच हवा-पाणी-प्रकाश यांसह सृष्टीच्या विविधतेने विणलेले एक रहस्यमय विलोभनी वस्त्र याविषयी एखादाच टक्का ज्ञान माणसाला मिळाले आहे. तेवढ्यावर माणूस तंत्रज्ञानाच्या आयुधाद्वारे सृष्टीवर कब्जा मिळविल्याच्या उन्मत्त वल्गना करीत आहे. सृष्टीत माणसाने जो धुमाकूळ घातला आहे त्यामुळे मिनिटाला एकेक जीवजात कायमची नष्ट होत आहे. तिचा पुननिर्मिती आणि सृष्टीत पुनर्वसन या तंत्रज्ञानाला शक्य आहे काय? पर्यावरणाची एवढी जागृती होऊनसुद्धा ऑस्ट्रेलियात, ॲमेझोनमध्ये आज २१व्या शतकात लाखो हेक्टर अरण्यात आगी लावल्या जात आहेत. तेथे पुन्हा तशीच वने निर्माण करणे उच्च तंत्रज्ञानाला शक्य आहे का?

जेम्स लव्हलॉक यांच्या गाय्या सिद्धांतानुसार पृथ्वी हीच महाकाय एकसंध अशी जीवसंस्था आहे. माणसाचे शरीर ज्याप्रमाणे बर्फाळ प्रदेशातील शून्य अंशाखालील तापमानात आणि अरबस्थानातील ५० अंशावरील तापमानातसुद्धा ३७ अंशाच्या तापमानात राहते तसेच पृथ्वीही आपले सरासरी तापमान कोट्यवधी वर्षे १५ अंशावर राखत आलेली आहे. गेल्या काही अब्ज वर्षात सूर्याची उष्णता कमी होत चालली आहे. तरीही समुद्रातील बॅक्टेरिया पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या स्तरात ठराविक प्रमाणात योग्य प्रकारचे वायू सोडून सूर्यकिरणांची किती उष्णता पृथ्वीवर रहावी याचे नियमन करतात. पण माणसाने वाढविलेल्या तापमानावर सृष्टीकडे इलाज नाही. तसेच कोटीकोटी वर्षांपासून हवेतील प्राणवायूचे प्रमाण २१ टक्के राखण्याचे कामही पृथ्वीवरील वृक्ष, समुद्रातील निलहरित शेवाळ व बॅक्टेरिया करतात. त्याचप्रमाणे समुद्रातील क्षारांचे प्रमाण एकसारखे राखण्याचे काम समुद्रजीव करतात. पालापाचोळा, मृत वृक्ष व प्राणी यांचे पुनर्चऋण करून वनस्पतीच्या अन्नात रुपांतर करण्याची मुख्यतः बॅक्टेरियाची यंत्रणा काम करीत असते. पण प्लास्टिकचे निर्धोक पुनर्चऋण करण्याची यंत्रणा सृष्टीकडे नाही. आज आपले सरकार जैवीक कचरा नियोजनासाठी नवनवे तंत्रज्ञान आणल्याची घोषणा करते. पण प्रत्यक्षात जैविक कचऱ्याचे रुपांतर ज्वलन गॅस किंवा खतात करण्याचे प्रत्यक्ष कार्य करतात ते श्रीमान बॅक्टेरियाच. त्यांचे काम सुलभ व जलद व्हावे यासाठीची व्यवस्था आणि सुयोग्य प्रकारच्या बॅक्टेरियाची निवड एवढेच काम तंत्रज्ञान करते. अमर्याद ताकदीची ही सृष्टी माणूस नष्ट करू शकणार नाही.

।। काय हटविता हटतो सागर, हटेल एकीकडे
उफाळेल तो दुसरीकडुनी, गिळूनि डोंगर कडे।।

पण माणूस स्वतःचा परिसर व जीवनाधार नष्ट करून स्वतःलाच अडचणीत आणत आहे. जीवनसृष्टीचा पृथ्वीवरील कालखंड म्हणजे दिवसाचे २४ तास मानले तर माणसाची आतार्यंतची कारवाई शेवटच्या एखाद्या मिनिटाची. सृष्टीने काही खास अभिदाने देऊन माणसाला एक विस्मयकारी क्षमतांचा प्राणी बनविला. त्याने उन्मत भस्मासूर बनून वरदात्याच्याच डोक्यावर हात ठेवायचा प्रयत्न केला तर सृष्टीस माणसाला भूतलावरून नाहीसा करण्यास या शेवटच्या मिनिटानंतर एक सेकंदही लागणार नाही. कोविड १९ हा यःकिंचीत विषाणू म्हणजे वैज्ञानिक दृष्टीने त्याला पूर्ण सजीवही म्हणता येत नाही. अशा अर्धजीवीने मानवी विश्‍वाची किती दाणादाण उडवून दिली. जगातील महासत्तांना, ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, तंत्रज्ञानात अत्युच्य स्थान आहे, शासनाची मजबूत बांधणी आहे,  मोठमोठी शहरे जेथे सर्व बुध्दिमंतांचा, तंज्ज्ञांचा रहिवास आहे, सोयी आहेत अशांचा पहिल्या दणक्यात पाचोळा करून टाकला.

जैव इतिहासाच्या कालखंडात माणसाहून कितीतरी मोठा कालखंडच पृथ्वीवर वास करणारे डायनासोर वगैरे जातीचे महाकाय सरडे. त्यांच्या कालखंडाला "ज्युरेसिक' युग असे नाव आहे. सध्या आपण राहतो त्या युगाला "हॅलोसीन' हे नाव आहे. सध्या माणसाच्या करणीने या भूमीवर जीवसृष्टीत, तसेच भूपृष्ठावर, समुद्रात, आकाश मंडळात फार मोठे बदल घडलेले आहेत. घडत रहाणार आहेत. म्हणून आताच्या या कालखंडाला इथून पुढे "एंथ्रोपोसीन' म्हणजे मानवप्रभावित युग हे नाव तज्ज्ञमंडळी सुचवित आहेत. ॲन्थ्रोपोसीन  हे सृष्टीतील सर्वात छोटे युग ठरेल असे वाटते. वैज्ञानिकांचे मत आहे की सध्याची परिस्थिती अशीच चालू राहिल्यास मानव वंशाचे या पृथ्वीवरील अस्तित्व एक-दोन शतकांपेक्षा जास्त नाही आणि माणसाचे पृथ्वीवरील नाहीसे होणे सर्वथैव माणसाच्या कृतीमुळे घडणार आहे. मग काय करायचे? जगात एवढे विद्वान, विचारवंत, वैज्ञानिक आहेत. मोठमोठी संपन्न राष्ट्रे आहेत ते काहीच नाही का करणार? मग त्यांच्या भरवशावर आपण स्वस्थ बसायचे का? यावर गेल्या अर्ध्या शतकाचा अनुभव सांगतो नाही म्हणून १९०१च्या स्टॉकहॉम कॉन्फरन्समध्ये पृथ्वीला वांचाविण्याचा प्रश्‍न जगातील राष्ट्रांच्या समोर प्रकर्षाने आला. या प्रश्‍नावर पुढे रिओ परिषद, आयपीसीसी म्हणजे जगातील विविध सरकारांचे हवामान बदलावरील (वैश्‍विक तपमानामुळे) बदल यावरील मंडळ यांचा तत्त्ज्ञांचा अहवाल, क्योटो परिषद, कोपनहेगन परिषद, बाली परिषद, पॅरिस परिषद अशा परिषद होत आहेत. त्यांना उपस्थित रहाण्यासाठी शेकडो राष्ट्रांची प्रतिनिधीमंडळे, हजारो लोकांचे विमानप्रवास, टनांनी कागदांचा वापर यातून अजून निश्‍चित असे काहीही घडलेले नाही. "तू तू मैं मैं' चालू आहे. वैश्‍विक तपमानवाढ रोखण्याच्या कार्यक्रमासाठी प्रगत राष्ट्रांनी १०० अब्ज डॉलरचा निधी उभारावा, असे ठरले होते. अमेरिकेचा एक राष्ट्रपती त्याला तयार होतो. त्याच्यानंतरचा नाही म्हणतो, अशा चार राष्ट्रपतीनी उलटसुलट भूमिका घेतली आहे. अमेरिकेच्या या धोरणाप्रमाणे, इतर प्रगत राष्ट्रे वागतात. या परिषदांची दिशा ठरून दोन दशके लोटली. वैश्‍विक तापमान वाढत आहे. निदान ही वृध्दी थांबून एका स्तरावर स्थिर व्हावे यादृष्टीने नेकीचे प्रयत्न व्हायला हवे होते. सरकारांच्या अगदी खालच्या स्तरावर काय दिसते? गोव्यासारख्या पश्‍चिम घाटाचा वैश्‍विक मान्यता असलेला समृध्द पर्यावरण वारसा अभिमानाने जपण्याऐवजी खाणी आणि विकास प्रकल्पांच्या नावाने कुरतडला जात आहे. हे वनखाते प्रदूषण नियंत्रण मंडळे, पर्यावरण खाते कशासाठी? मत्र्यांची सोय आणि अधिकाऱ्यांना पगार देण्यासाठी? ही स्थिती राजकीय सत्ताधिशांची. त्यांचेच भाऊबंद व्यापारी-उद्योजक, त्यांची निर्लज्ज लूट चालूच आहे. संपत्तीचे प्रचंड  केंद्रीकरण होत आहे. श्रीमंतांची संख्या आणि संपत्ती वेगाने वाढते आहे आणि गरिबांची संख्या आणि हलाखी वाढते आहे. ही जागतिक स्थिती भारतातही आहे. १९८० मध्ये भारतात १ % श्रीमंतांकडे ६ टक्के संपत्ती होती. २०१७ मध्ये २२% आणि आज २०२१ मध्ये भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम्‌ म्हणतात ७३% झालेली आहे. दीड वर्षाच्या कोरोना काळात सर्व देशांची आर्थिक स्थिती डुगडुगू लाागली आहे. आणि श्रीमंतांकडे मात्र संपत्तीतील वाढ ३०% हून जास्त झाली आहे. सरकारही श्रीमंतांना मिंधे आहे. मग ते कोणत्याही पक्षाचे असो. पर्रीकरनी खाणवाल्यांचा ३५ हजार कोटींचा घोटाळा शोधून काढला. त्यातील प्रत्येक रुपया वसूल करण्याची घोषणा केली. निवडून आल्यावर त्यांच्याच पक्षाच्या सरकारनेही वसुली करण्याऐवजी खाणी पुन्हा त्याच खाणमालकांना मिळाव्या म्हणून प्रयत्नांची शिकस्त केली. सरकार-सावकारांची मिलीभगत निसर्गाला ओरबाडत रहाणार याविषयी आता शंका उरलेली नाही.

मग काय करायचे? त्या दोघांशी संघर्ष करण्याची ताकद आजच्या असंघटित समाजाला नाही, ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल. पण त्या दोघांना वगळून वाटचाल करण्यास कोणीही रोखू शकत नाही. या संस्था निसर्गाने निर्माण केलेल्या नाहीत. त्यांना स्वतःचा पाया नाही. आपली कमजोरी हीच त्यांची ताकद. आपण निसर्गाला बरोबर घेऊन जाऊया. त्याची ताकद अमाप आहे. ज्या सृष्टीने आपणास घडविले त्यांच्या जगण्याची सोयही तिने केली आहे. तिचा शोध घेऊया. प्रत्येक व्यक्तिकडे अमोघ शक्ती आहे याचा आत्मशोध पुढील वाटचाल दाखवेल. सर्व वस्तू बाजारानेच पुरवायच्या त्याशिवाय पर्याय नाही. ही समजूत काढून टाकूया. स्वावलंबनाचा अंगिकार करूया. केवळ कंझ्युमर होऊन बाजारांचे गुलाम बनण्याऐवजी प्रोझ्युमर बनूया. प्रोड्युसर आणि कंझ्युमर दोन्ही आपणच.

आपल्याकडे आकाशातून येणारे ऊन कोणी अडवू शकत नाही. त्याचा सुयोग्य वापर केला तर ऊर्जा आणि प्रकाश याबाबतीत आपण स्वावलंबी होऊ शकतो. आपण राहतो तेथे पडणाऱ्या पावसावर कुठल्याही कंपनीचा अधिकार नाही. शिवाय आपल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करून त्यापासून फळबाग वाढवू शकतो. घरच्या जैविक कचऱ्याचे कंपोस्ट खत करून गच्चीवर भाजीपाला पिकविला तर बाजारातील प्रदूषित, शिळ्या, निःसत्व अन्नपदार्थांचा वापर कमी होईल. "वापरा आणि फेका' ही प्रवृत्ती, ट्रँड आणि फॅशन याकडे पाठ फिरविली, पुनर्वापर आणि पुनर्चऋण ही तत्वे निसर्गाची तत्वे आचरणात आणली, कुठलाही संकोच न बाळगता त्याचा प्रसार केला, तर सरकार व बाजार आपले काय वाकडे करू शकतो? यातील बहुतेक सर्व गोष्टी मी गेल्या काही वर्षात केलेल्या आहेत. त्यातील समृद्धी आणि अमर्याद आनंद यांचा मी अनुभव घेतलेला आहे. यातून स्वतःचे आणि सृष्टीचे आरोग्य सुस्थितीत रहाते याविषयी कोणी वाद करू शकणार नाही. इतका मामला सरळ आहे. हवा, जलाशय, भूमी यांचे प्रदूषण नाही. पॅकिंगचा कचरा नाही. वस्तू वाहनातून वाहून नेताना होणारे प्रदूषण नाही. निसर्गाने सर्वत्र विखरून टाकलेली, एरव्ही फुकट जाणार असलेली साधनसामुग्रीच वापरलेली आहे.

सरकार-व्यापारी यांच्या केंद्रिकारी यंत्रप्रचूर, शोषणप्रधान, प्रदूषणकारी व्यवस्थेतून स्वतःची व निसर्गाची सुटका करून घेेण्यासाठी अशा अनेक मार्गांची चर्चा "सृष्टिमार्ग' या पुस्तकात केली आहे. त्यातील फक्त एक संकल्पना अत्यंत संक्षेपाने आज पर्यावरण दिनानिमित्त येथे सादर करीत 
आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com