दैनिक गोमंन्तक वर्धापन दिन 2021: षष्ट्यब्दीत पाऊल ठेवताना...

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 24 मार्च 2021

गोव्याच्या जनमानसात वेगळे असे स्थान निर्माण केलेला आपला ‘गोमन्तक’ आज हीरक महोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. गोवा राज्यानेही साठाव्या वर्षांत नुकतेच पदार्पण केले आहे. गोव्याच्या जडणघडणीचा साक्षीदार असलेला ‘गोमन्तक’ आजही आपल्या सेवेत त्याच धडाडीने आणि विश्‍वासाने उभा आहे.

गोव्याच्या जनमानसात वेगळे असे स्थान निर्माण केलेला आपला ‘गोमन्तक’ आज हीरक महोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. गोवा राज्यानेही साठाव्या वर्षांत नुकतेच पदार्पण केले आहे. गोव्याच्या जडणघडणीचा साक्षीदार असलेला ‘गोमन्तक’ आजही आपल्या सेवेत त्याच धडाडीने आणि विश्‍वासाने उभा आहे. सहा दशके आपण नियमितपणे भेटत आहोत. गोव्याच्या मातीत जन्मलेला आणि इथल्या मातीशी नाळ जोडलेला असा हा ‘गोमन्तक’ आपणा सर्वांचा एक घटक बनून राहिला आहे.

‘गोवा’ आणि ‘गोमन्तक’ यांचे अतुट असे नाते आहे. राज्याच्या विकासासाठी झटण्यासाठी आणि जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सुरू असलेले हे व्रत अखंडपणे सुरू आहे. आजवर गोव्याने अनेक चढउतार पाहिले, ते सर्व ‘गोमन्तक’ने आपल्यासमोर निष्पक्षपातीपणे मांडलेले आहेत. कोणाच्याही दबावाला बळी न पडता वाचकांप्रति असलेली निष्ठा जपताना सत्य ते मांडणे आणि वस्तुनिष्ठ असेल त्याचीच बाजू धरणे हे ‘गोमन्तक’ने आजवर केले आहे. खळबळजनक बातम्या पेरून वाचकांना अस्वस्थ ठेवण्यात आम्हाला रस नाही. समाजाचे प्रतिबिंब म्हणून ‘गोमन्तक’कडे पाहिले जाते आणि त्याला आम्ही तडा जाऊ दिला नाही आणि देणारही नाही.

अगदी गोवा मुक्त झाल्यापासून ‘गोमन्तक’ वाचकांशी इमान राखून आहे. सामाजिक बांधिलकी जोपासताना आम्ही कधीही नफ्याचा विचार केला नाही. गोव्याच्या प्रगतीत आपणही सहकार्य करावे, समाजासाठी चांगले विचार द्यावेत, असा सकारात्मक दृष्टिकोन बाळगून ‘गोमन्तक’ची वाटचाल सुरू आहे. गोव्याच्या जनतेसाठी, आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले. महिला, युवक, बालकवर्ग यांच्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करून त्यांच्या प्रतिभेला संपन्नता लाभावी म्हणून आम्ही नेहमीच प्रयत्न केले. गोव्याच्या मातीशी असलेले इमान राखताना प्रामाणिकपणे सर्व काही वाचकांसमोर मांडण्याचे धारिष्ट दाखवले. बातमीशी तडजोड न करणे हे ‘गोमन्तक’चे धोरण आजही आहे. नव्या युगात डिजिटल क्रांती होत आहे. आपला वाचकही त्यात मागे राहू नये, यासाठीही ‘गोमन्तक’ने डिजिटल समाजमाध्यमांद्वारे वाचकांपर्यंत पोचण्यात यश मिळवले आहे.

सध्याच्या गतिमान आणि धावपळीच्या युगात आपल्या वाचकाला काहीही कमी पडू नये, त्याला प्रत्येक बातमी त्या त्या क्षणाला वाचायला मिळावी यासाठी ‘गोमन्तक’ तत्पर आहे. केवळ बातम्या देण्यापुरते आम्ही मर्यादित न राहता अनेक समाजपयोगी उपक्रम राबवत आलो आहोत. समाजाच्या प्रत्येक घटकाला त्यात सामावून घेतले जात आहे. अशी संधी देणारे ‘गोमन्तक’ हे एकमेव वृत्तपत्र आहे.

गेले वर्षभर कोविडचे सावट आहे. सगळ्यांनाच त्याचा फटका बसला आहे. वृत्तपत्रसृष्टीलाही त्यातून जावे लागले आहे. तरीसुद्धा ‘न घेतले व्रत हे अंधतेने’ हा वसा घेऊन आम्ही आपल्या पाठबळावर आजही उभे आहोत. चोखंदळ वाचक, हितचिंतक, विक्रेते आणि जाहिरातदारांच्या पाठबळावर ‘गोमन्तक’ गेली सहा दशके आपल्या मनामनांत स्थान मिळवून आहे. गेल्या वर्षी वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेला स्नेहमेळावा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला रद्द करावा लागला होता.

या वर्षीही तशीच स्थिती आहे. ‘गोमन्तक’वर भरभरून प्रेम करणारा आणि विश्‍वास ठेवलेला आपला वाचकवर्ग दरवर्षी या आनंदसोहळ्यात आपल्या घरचे कार्य मानून सहभागी व्हायचा. पण गेल्या वर्षी ते शक्य झाले नाही, यंदाही तशीच स्थिती आहे. सरकार आणि प्रशासनातर्फे लागू करण्यात आलेल्या उपाययोजना आणि सुरक्षिततेसाठीच्या नियमांमुळे आम्हाला या वर्षीही स्नेहमेळावा आयोजित करणे शक्य झाले नाही. तरीसुद्धा आपण आमच्याबरोबर रोजच आहात, या सुखद अनुभवावरच आमचा हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. आपल्या शुभेच्छा आहेतच; त्या अधिक वृद्धिंगत करू या...

संबंधित बातम्या