गांजाचे भूत गाडून टाका कायमचे!!

गांजाचे भूत गाडून टाका कायमचे!!
Demand to curb the demand to legalise the cultivation of cannabis in Goa

अमली पदार्थावरून गोवा आधीच बदनाम झाले आहे. गोवा मुक्त होऊन ५९ वर्षे झाली, यंदा हीरक महोत्सवी वर्षही साजरे होत आहे. पण गोव्याच्या पर्यटनाला लागलेला अमली पदार्थाचा डाग पुसला गेलेला नाही, सरकारे आली आणि गेली, पण युवा पिढी बरबाद करणाऱ्या या व्यसनापासून रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कुठेच दिसली नाही. एक काळ होता, ज्यावेळेला अमली पदार्थाचे सेवन हे किनारपट्टी भागापुरते मर्यादित होते, पण आज हेच व्यसन ग्रामीण पातळीवर पोचले असून शाळा, विद्यालये आणि महाविद्यालयांच्या पवित्र प्रांगणात अमली पदार्थाचा विशेषतः गांजाचा शिरकाव झाला आहे. हा चिंतेचा विषय आहे. लोक दबक्‍या आवाजात बोलतात, पण स्पष्टपणे पुढे येत नाहीत. त्यामुळेच तर गुन्हेगार मोकाट फिरतात. मागच्या काळात "ट्रॅफिक सेंटीनल'' नावाचा उपक्रम सरकारने राबवला. त्यात काही चांगल्या गोष्टी घडल्या तर काही वाईटही. मात्र राज्यातील अमली पदार्थांचा व्यवहार मूळासकट नष्ट करण्यासाठी अशाप्रकारची एखादी योजना सरकारने आखून कुठल्या गाड्यावर, कुठल्या दुकानात, कुठल्या ठेल्यावर अमली पदार्थ उपलब्ध होतो, ते सांगा आणि बक्षीस न्या, नावे गुप्त ठेवू असे जाहीर केले तर...! बघा बरे विचार करून.

सद्यस्थितीत कोवळ्या मुलांकडून अमली पदार्थाचा सर्रासपणे वापर होत चालल्याने गोव्याची भावी पिढी नेमकी कुठल्या दिशेला जात आहे, गावागावात गर्दुले कसे तयार होत आहेत, त्याची छोटीशी झलक आपल्याला या प्रकरणावरून येईल. अमली पदार्थांचा वावर हा अजून कुठेच बंद झालेला नाही, उलट आता राज्यात गांजा लागवडीमुळे गर्दुल्यांची सोयच होणार असल्याने या प्रकरणावरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होणे साहजिक आहे.  

प्रत्येकवेळी आपण गोव्याबाबत एक बिरूद लावून फिरतो, ते म्हणजे निसर्गाने भरभरून उधळलेल्या सौंदर्यामुळे गोवा पर्यटनात अव्वल आहे. केवळ देशांतर्गत नव्हे तर जागतिक स्तरावर पर्यटनासाठी गोव्याला प्रथम पसंती दिली जाते. अर्थातच गोमंतकीयांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे आणि असायलाच हवी. पण पर्यटनाच्या नावाखाली राज्यात जर अनैतिक बाबी घडू लागल्या तर शरमेने मान खाली घालायची वेळ आपल्यावरच येणार, त्यामुळेच हा विचार प्रकर्षाने समोर आला आहे. आताही अमली पदार्थांचा वापर कमी आहे का, राज्यात...! किनारपट्टीबरोबरच राज्यातील मंदिर पर्यटनांच्या भागातही अमली पदार्थांची प्रकरणे उघडकीस येत आहेत. पर्यटकांपुरता हा अमली पदार्थ सीमित राहिलेला नाही, तर सिगारेटमधून गांजा तसेच अन्य अमली पदार्थ सेवन करण्याचे प्रकार वाढत असल्याने पुढील पिढी कशी असेल, याचे आताच आडाखे बांधलेले बरे...!

अमली पदार्थांच्या या व्यवहारात खास करून गांजाचा वापर सर्वाधिक होत आहे. पोलिसांकडून पकडण्यात येणाऱ्या प्रकरणातून हे स्पष्ट झाले असले तरी ही चाललेली छापेमारी म्हणजे हिमनगाचे एक टोक असल्याची कुणाचीही खात्री पटेल, म्हणूनच तर मुख्यमंत्र्यांनी हा विषयच गंभीरपणे घेण्याची गरज आहे. पालक म्हणून... शिक्षक म्हणून आपण आपली जबाबदारी निभावतोय काय, याचेही आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे. माझ्या शेजाऱ्याचा मुलगा व्यसनी झाला म्हणून मला समाधान मानायचे कारण नाही, कारण हीच वेळ उद्या माझ्यावरही येऊ शकते, यासाठी हा सारासार विचार व्हायला हवा. शिक्षकांनी केवळ "बे एके बे'' वर भर न देता जरा अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन मुलांची मानसिकता समजून घेण्याची ही वेळ आहे, हवी असल्यास तशी शिक्षण क्षेत्रात व्यवस्था करायला हवी. कारण राज्यभर पसरत चाललेल्या अमली पदार्थाच्या व्यसनात छोटी मुले अडकत आहेत आणि दुर्दैवाची बाब म्हणजे ही मुले शाळकरी आहेत. गांजा भरलेल्या सिगारेटचा मस्तपैकी दम मारताना आजची कोवळी मुले कुठल्या विश्‍वात रममाण करतात, आणि उद्या या गर्दुल्यांना अशा अमली पदार्थांची चटक लागल्यानंतर जर त्यांना वेळेत सोय झाली नाही तर हीच मुले पुढे कोणत्या थराला जाऊ शकतात, यासाठीच हे आत्मपरीक्षण करायला हवे. 

गोव्यात पर्यटनासाठी यायचे म्हटल्यावर मस्त पैकी झिंगायचे, असा समज बहुतांश पर्यटकांत असतो. दारुच्या बाटल्या हातात घेऊन अमली पदार्थाचा झुरका मारल्यावर या गर्दुल्यांना कोणत्या स्वर्गसुखाचा आनंद मिळतो, हे त्यांचे त्यांनाच माहीत. पण आयुष्य बरबाद करण्याबरोबरच बऱ्याचदा अख्खं कुटुंब उद्‌ध्वस्त झालेली उदाहरणे आपल्या आजूबाजूला घडलेली असताना आपण डोळे झाकून वावरणार आहोत काय? कोरोनाचा प्रभाव कमी झालेला नसताना आणि पाश्‍चात्य देशात पुन्हा एकदा कोरोनाने उचल खाल्ल्यानंतर नव्या विषाणूचा धोका असतानाही नववर्षाच्या पार्ट्या गोव्यात कशा बरे रंगल्या ते आणखी वेगळे सांगायची गरज आहे काय...! सामाजिक अंतराचा फज्जा तर उडालाच पण मास्कचा पत्ताच नाही, आणि दारू पिऊन मदहोष झालेली तरुणाई, त्याचबरोबर लहान मुले आणि वयस्कर मंडळीही आपल्याला राज्यातील किनारपट्टीवर दिसली. काय चाललेय हे...? 

अमली पदार्थांची उपलब्धी कोण कशी करतो, हे सरकारी यंत्रणेला माहीत नाही काय...! संबंधित पोलिस स्थानकांना बऱ्याचदा माहितीच नसते, की मुद्दामहून डोळेझाक केली जाते, ते सुज्ञास अधिक सांगणे न लगे.  एखाद्या पोलिस स्थानकाच्या हद्दीत राजधानीतून पोलिसांची दुसरी तुकडी येऊन कारवाई करते, त्याला काय म्हणायचे! किनारपट्टी भागातील मुलांची अवस्था पहा काय आहे ती! सगळीच मुले तशी नाहीत, पण जी मुले या अमली पदार्थांच्या व्यवहारात अडकली आहेत, त्यांच्याकडून कसे आणि कोणत्या प्रकारे व्यवहार सुरू आहेत ते आधी बघा. चिमुटभर गांजा अथवा अन्य प्रकारच्या अमली पदार्थाच्या व्यवहारातून बक्कळ पैसे कमावण्याची संधी ही मुले सोडत नाही. छोट्याशा श्रमातून जास्त पैसे कमावण्यासाठी अमली पदार्थांचा व्यवहार करण्याबरोबरच स्वतःही या अमली पदार्थाचे सेवन करणारी एक पिढी गोव्यात वाढतेय. त्याला आळा घालायला नको का? उद्या गांजा लागवड खुली झाली तर त्यावर नियंत्रण कोण ठेवणार, रान मोकळेच म्हणायचे की...! कुंपणाने शेत खाण्याचे प्रकार आपल्या डोळ्यांसमोर घडताना आणखी चांगल्याची अपेक्षा ती काय म्हणून ठेवायची?

सांगा औषधांसाठी गांजाची आवश्‍यकता असते, हे मान्य केले तरी ते किती प्रमाणात हेही पहायला हवे. सगळ्याच औषधांसाठी गांजा लागत नाही, मग हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या औषधांसाठी जर गांजाची आवश्‍यकता असेल तर त्यासाठी गोव्यात गांजाची लागवड करायची गरजच नाही, असे हे सर्वसामान्याचे मत आहे, जे रास्त आहे. अर्थातच, मुख्यमंत्र्यांना या सर्व प्रकाराची कल्पना आहे, मुख्यमंत्री सूज्ञही आहेत, त्यामुळेच गांजा लागवड सरकारने स्वीकारलेली नाही, हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे, मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागतच आहे, मात्र भविष्यात असा प्रकार होता कामा नये. कुणीतरी नव्याने गांजा लागवडीसाठी प्रयत्न करता कामा नये, यासाठीच तर हा आटापिटा असून गांजा लागवडीचा विषय डोक्‍यातून काढून टाका, गाडून टाका हे भूत...कायमचे!!

-नरेंद्र तारी

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com