सकारात्मक विचारांची पेरणी

dainik gomantak
मंगळवार, 9 जून 2020

आजच्या घडीला माणसांन समाजात वावरत असताना जीवनाच्या प्रत्येक वळणावर विचार करतेवेळी आपलं मन जे सांगत तेच करणे उचित ठरते. कारण जे डोकं सांगत तो पर्याय असतो आणि आपलं मन जे बजावत तो खरी तर मान्यता असते.

शाम गावकर

आयुष्याचा प्रवास गांभीर्याने न घेतल्याने जीवनाची नौका भरकटताना दिसते. या अशा गोष्टीवर सकारात्मक विचार होण्याची गरज आहे. युवकांनी आपल्या भविष्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जीवनाची नौका पार करण्यासाठी विशेष मेहनत घेण्याची गरज आहे. अर्थहीन आयुष्य जगण्याच्या पर्णकुटीतून बाहेर पडण्यासाठी मनात सकारात्मक विचारा बरोबरच जीवनाच्या प्रवासात दिशादर्शन विचार प्राप्त करून देणाऱ्या साहित्याचे वाचन करावे.

समाजात वावरत असताना अनंत प्रश्‍न मनात घुटमळतात. खरं तर हे प्रश्‍न वैयक्तिक नसतात तरीही मनात घर करून राहतात. अशावेळी मन बेचैन होतं आणि सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून विचार करून मनात घुटमळणाऱ्या प्रश्‍नांच्या उत्तराच्या शोधार्थ मनाची भ्रमंती सुरू होते. समाजाप्रति माणसाची सामाजिक बांधिलकी अशावेळी जोपासावी लागते.
आजच्या घडीला सामाजिक बांधिलकी जोपासताना देखील अनंत प्रश्‍न आपसुकच आपल्या जीवनात प्रवेश करतात. वास्तविक त्याचं साधं सोयरसुतकही आपल्याला नसतं. मात्र, सामाजिक दृष्टीने विचार केल्यानंतर समाजाप्रति आपणही काहीतरी देणं लागतो या भावनेने सर्वसामान्य लोक प्रेरित होता. व समाजाची समस्या आपली समस्या होते. अशा परिस्थितीत माणसाने समाजाप्रति आपले देणे देतेवेळी स्वतःबद्दल विचार करणे उचित ठरणारे आहे आणि प्रत्येकाने समाजात वावरत असताना स्वतःला जगण्याचे उद्दिष्ट शोधण्याची गरज असते. असं मला वाटतं.
खरं तर, आजच्या घडीला माणसांन समाजात वावरत असताना जीवनाच्या प्रत्येक वळणावर विचार करतेवेळी आपलं मन जे सांगत तेच करणे उचित ठरते. कारण जे डोकं सांगत तो पर्याय असतो आणि आपलं मन जे बजावत तो खरी तर मान्यता असते. कारण माणसामधील प्रामाणिकता, धैर्य, महत्त्वाकांक्षा आणि खरेपणासारखी मूल्ये माणसाला घडविण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत माणसाचं चारित्र्य प्रमुख भूमिका बजावण्याचे काम करते. कारण चारित्र्य माणसाला घडविण्याचे काम करते, यामुळे आपण आयुष्यात काय काम केले यापेक्षा आपण आपले चारित्र्य राखण्यात यशस्वी झालो की नाही या गोष्टीला प्राधान्य द्यावे लागते.
आजच्या घडीला अशा परिस्थितीत माणसाच्या चांगल्या सवयी प्रमुख भूमिका बजावणाऱ्या आहेत. चांगल्या सवयी माणसाने अंगीकृत करावयाच्या असल्यास त्याची सुरवात लहान गोष्टीपासून करावी. अशा पद्धतीने प्रत्येक माणसाने आपल्या जीवनात अशा सवयींच्या गोष्टी दैनंदिन जीवनात नियमित केल्याने चांगल्या सवयी सहज लागू पडतात. आता चांगल्या सवयी कोणत्या, त्यावर मला याठिकाणी भाष्य करायचे नाही त्यासंबंधी प्रत्येकाने आपआपल्या दिशा ठरवाव्यात.
चांगल्या सवयी आत्मसात करत असताना थोडासा वेळ तुमच्या स्वतःसाठी नक्कीच ठेवा. जो तुमच्या स्वतःच्या सूचनेनुसार तुम्ही दुसऱ्यासाठी देऊ शकाल. कारण सर्वांत चांगली गोष्ट दुसऱ्यासाठी द्यावयाची झाल्यास ती वेळ समजावी, कारण आपण दुसऱ्यासाठी अशी गोष्ट देत असतो जी आपल्याला परत कधीच मिळणार नाही. मात्र त्या वेळेचे परिवर्तन चांगल्या विचारामध्ये घडून त्याची परिणीत विधायक स्वरूपात होणे सुखकर ठरणार ठरेल.
मित्रांनो, खुपवेळा माणूस, खास करून तो ज्यावेळी लहान असतो किंवा तरुण वयात येतो त्यावेळी तो इतरांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. त्याला 'एखाद्या' प्रस्थापित माणसासारखे व्हायचे असते, जे चुकीचे आहे माझ्या मते माणसाने दुसऱ्यासारखे होण्याचा कधीच प्रयत्न करू नये. शिवाय इतरांशी स्पर्धाही करू नये, इतरांच्या बाबतीत आपल्या मनात ईर्षा, मत्सर ठेवून काहीही साध्य होत नसतं. उलट आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो.
माणसाने इतरांप्रमाणे बनण्याऐवजी स्वतःमधील गुणवत्ता ओळखून तिचा योग्य वापर करून अंगातील कौशल्याला आवश्‍यक खतपाणी घातल्यास ते अधिक प्रेरणादायी ठरेल. शिवाय आपल्या मनात आश्‍वासक वृत्ती निर्माण होऊन आपल्या भविष्यासाठी ती प्रेरणा ठरेल. माणसाने आपले भवितव्य आपणच घडवायचे असते, त्यासाठी वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेतल्यास अधिकच उत्तम !
आजच्या घडीला समाजातील प्रत्येक माणसाला जीवन जगण्याचा मतितार्थ समजलेला आहे. त्याला जीवनाबद्दल वेगळे सांगण्याची गरज नसते. फक्त त्यांनी जीवन जगण्याचे उद्दिष्ट शोधायचे असते. उद्दिष्टासंबंधीची काळजी संपल्यानंतर स्वतःच्या जीवनाला दिशा देण्याची गरज लागते. यासंबंधी आपण अत्यंत प्रामाणिक असल्याची गरज आहे. कारण प्रत्येक माणूस जीवनातील दैनंदिन बाबीकडे गांभीर्यपूर्वक पाहत असतो. उदाहरण द्यायचं झाल्यास आपल्या एखादा छोटासा जरी प्रवास करायचा आहे. तर त्यावर आपण गांभीर्यपूर्वक विचार करतो. येण्याजाण्याची वेळ, त्यानुसार रेल्वे अथवा विमानाचे तिकीट, हॉटेलचे बुकिंग यावर आपण लक्षपूर्वक विचार करून कार्यक्रमाची आखणी करतो, मात्र आयुष्याच्या प्रवासात गाफील राहतो. आयुष्याचा प्रवास गांभीर्याने न घेतल्याने जीवनाची नौका भरकटताना दिसते. या अशा गोष्टीवर सकारात्मक विचार होण्याची गरज आहे. युवकांनी आपल्या भविष्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जीवनाची नौका पार करण्यासाठी विशेष मेहनत घेण्याची गरज आहे. अर्थहीन आयुष्य जगण्याच्या पर्णकुटीतून बाहेर पडण्यासाठी मनात सकारात्मक विचारा बरोबरच जीवनाच्या प्रवासात दिशादर्शन विचार प्राप्त करून देणाऱ्या साहित्याचे वाचन करावे. जीवन जगण्याचे उद्दिष्ट शोधण्याचा प्रयत्न लहान वयापासून झाल्यास ते दिलासादायक ठरेल. लहान वयात पालकांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात आश्‍वासक ठरते. शिवाय आपल्याकडे भवितव्याविषयी निर्णय घेण्यासाठी खूप वेळ असतो. अशावेळी चांगला मार्ग किंवा पर्याय शोधण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
खूपदा आपल्या मनात असणाऱ्या गोष्टी घडत नसतात. आपणासमोर अडचणीचे अनंत डोंगर असतात अशा परिस्थितीत योग्य मार्ग शोधताना धीराने पुढे जाण्याची गरज असते. कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याची कसब माणसांमध्ये असायला हवी तरच माणूस इच्छित ध्येय गाठण्यात यशस्वी ठरेल हे मात्र नक्की !
समाजात वावरत असताना आपण खूप वेळा बघितलं असेल काही लोक जीवनात मिळालेल्या छोट्याशा यशामुळे हुरळून जातात. अशा लोकांनी यश प्राप्त झाल्यानंतर ते पचविण्यासाठी लागणारी तयारी केलेली नसते. ती तयारी करण्याची गरज असते. यश मिळाले म्हणजे सर्वस्व मिळाले अशी धारणा करून घेणे चुकीचे ठरते. माणूस ज्यावेळी सर्वप्रथम जीवनात मिळालेल्या यशामुळे यशस्वी होतो, त्यावेळीच त्यांनी दुसऱ्यांदा यश प्राप्तीसाठी लागणाऱ्या तयारीला लागण्याची गरज असते. त्यासाठी अधिक परिश्रमाची आवश्‍यकता असते. परिश्रमातून खूपशा गोष्टी साध्य होत असतात. कुठलीही गोष्ट जीवनात चुटकी सरशी मिळत नसते तर त्यासाठी प्रयत्नाबरोबरच माणसांच्या अंगात हुशारी हवी, संयम हवा जिद्द व चिकाटीचीही आवश्‍यकता असते. अशा साध्या साध्या गोष्टीवर माणसांने सुरवातीपासूनच प्रयत्न करायला हवेत.
जगातील अनेक गोष्टी बदलल्या पाहिजेत असं आपणासर्वांना वाटतं, तरीही त्या बदलत नाहीत. जगात फारच कमी लोक असतील जे सध्याची परिस्थिती बदलण्याची इच्छाशक्ती बाळगून आहेत. तसा ते प्रयत्नही करतात, मात्र बाकीचे लोक बघ्याची भूमिकेत असतात, हे चित्र बदलणे याची खरी गरज आहे. सध्याचा काळ हा कोविड सत्संर्गाचा असल्याने समाजातील प्रत्येक माणूस भावनेच्या मोहपाशात अडकून पडल्याचे स्पष्ट होते. अशा अवस्थेत प्रत्येकाने मनातील भावना नक्कीच जपण्याच आवश्‍यकता आहे. परंतु अधिक प्रमाणात भावनांचा गुंता करून चालणार नाही, त्यांची बऱ्यापैकी गुंफण करून आपल आयुष्य सुंदर बनवण्याच्या दृष्टिकोनांतून सकारात्मक विचारांचे बिज जीवनात पेरण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या