आपत्ती आणि देवदूत

Shanta lagu
बुधवार, 22 जुलै 2020
मुलगा सांगू लागला. वाटेत गाडी थांबवली आणि बहिणीला घेऊन तो सुसाट निघून गेला. लोकांना कहाणी सांगितली. त्यांनी पोलीस स्टेशन दाखवले. पोलिसांनी तक्रार लिहून घेतली. लगेच शोधपथक मागावर गेले. पण लगेचच मुलगी सापडली. ती निरागस वयातील पोर भेदरून गेली होती. ती सुरक्षित आईबापांच्या हवाली केली आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
शांता लागू

सध्या करोनाच्या काळात नुकतेच आपण पाहिले शहराकडून आपापल्या गावाकडे मजुरांचे तांडेच्या तांडे चालत गेले. पायी चालणे किती दूर आणि खूप मोठा पल्ला चालायचा आहे. लवकर पोहोचायचे आहे. वाटेत थांबत, बसत, पुन्हा उठत, उठून चालू लागत हे माणसांचे तांडे. लॉकडाऊनमधे आम्ही मात्र घरात बसून ऐषारामात टीव्हीवर बातम्या बघत राहतो. पण ज्याचे जळते, त्यालाच कळते! त्यांची घरेदारे विस्कटली. नोकरी गेली. हाती पैसा नाही. कुटुंबकबिला पाठी आणि बरोबर घेऊन मुक्कामी तर पोहोचायचे आहे. तिथे गेले तर गाव आत घेईलच, असे अशी शाश्वती नाही. गावाने आत घेतले, तरी विलगीकरणात दोन आठवडे काढायचे. विलगीकरणानंतर मूळ जुन्या घरात पोहोचायचे. बरं, तिथे वावर असणारे स्थायिक भाऊबंद पुन्हा घरात प्रवेश देतील का? हा प्रश्न आ वासून उभा! मधला प्रवास तर किती अवघड! बाळांचे पाय चालून दमतात तसेच स्वतःचे पण काय कमी दमतात?
टी. व्ही. वर एक बातमी बघितली होती. असेच चालून दमलेले कुटुंब बाडबिस्तारा बाजूला ठेवून विश्रांती घेत होते.रस्त्यातच बसकण मारलेली! त्यांच्यावर काय प्रसंग ओढवला पहा!
गाव अवघ्या तीन तासावर आले होते. एक मोटरसायकल स्वार या कुटुंबापाशी थांबला. म्हणाला, "लेकराबाळांना ताणपटत नेता त्यापेक्षा या मुलाला आणि त्याच्या बहिणीला माझ्याबरोबर नेतो. मी पुढच्या गावाच्या वेशीपर्यंत त्यांना सोडतो. तुम्ही पाठोपाठ चालत या की!"
त्यांना वाटलं देव पावला. दोन्ही लेकरे आनंदून गेली. टाटा करीत हात हालवित गेली त्या माणसासोबत! मागून आई बाप चालू लागले.
थोड्याच वेळात धाकटा आठ वर्षाचा मुलगा समोरून चालत येताना दिसला. छातीत धस्सं झालं.
मुलगा सांगू लागला. वाटेत गाडी थांबवली आणि बहिणीला घेऊन तो सुसाट निघून गेला. लोकांना कहाणी सांगितली. त्यांनी पोलीस स्टेशन दाखवले. पोलिसांनी तक्रार लिहून घेतली. लगेच शोधपथक मागावर गेले. पण लगेचच मुलगी सापडली. ती निरागस वयातील पोर भेदरुन गेली होती. ती सुरक्षित आईबापांच्या हवाली केली. आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिस मात्र खऱ्या देवदूतासारखे धावून आले. पोरीला त्यांनी शोधून काढले आणि त्या कुटुंबाला नीट गावी पोहोचवण्याची व्यवस्था केली, पण त्या आई-बापांना पोरीचे तोंड दिसेपर्यंत, काळजीपोटी कसे विचित्र, भयभीत अवस्थेत अनेक तास काढावे लागले असतील त्यांची कल्पनाच करवत नाही. अशा कितीतरी कहाण्या काही प्रकाशात न आलेल्या, आपल्या कानावर न आलेल्या गुलदस्त्यात राहिलेल्या, अलिखित घडून गेल्या असतील ते परमेश्वरालाच ठाऊक
पण, प्रवास सोपा नाही एवढे मात्र खरे! असे संकटकाळी हताशपणे कामधंद्याची शहरे सोडून प्रवास करणे किती यातनामय असेल..?
एखादीचे दिवस भरत आले असले, तर रस्त्यात बाळंतपण उरकावे लागले, तेही प्रसारमाध्यमे सांगत होती. अगदी काही दिवसांच्या नवजात बाळांना घेऊन ऐन एप्रिल-मे महिन्यात सूर्य वरुन आग ओतत असताना... सोपे नव्हतेच काही! असे संपूर्ण देशात इकडून तिकडे इकडे तिकडून इकडे स्थलांतर सामान्य माणसांना करावे लागले. चोरीमारी, दगाफटका, फसवणूक सगळं सोसून त्या मजुरांच्या, गरिबांच्या ओंजळीत शेवटी काय पडलं असेल हे सांगता येत नाही पण परिस्थितीने ही वेळ आणली.
नोकरदारांच्या सुद्धा नोकऱ्या गेल्या. पगार कापले गेले. कमी पगारावर जास्ती काम करावे लागले. त्यांना शक्य होते ते जागीच राहिले पण काही 'थांबून तर काही फायदा नाही' असा विचार करून तेथून ते आपापल्या गावी पोहोचले असतील सुद्धा!
बेकारीचे ओझे खांद्यावर घेऊन पोहोचलेले हे होतकरू तरुण ते तरी

सुखात असतील काय? घरात वयस्कर आई-वडील, कधी धाकटी शिकणारी भावंडे शहराकडून आलेल्या भावाकडे नेहमीप्रमाणे मोठ्या आशेने बघू लागली असतील तेव्हा त्या तरुणांच्या मनात किती कालवाकालव झाली असेल. प्रवास सोपा नाही, पण रिकाम्या हाताने घरी पोहोचणे तेव्हढेच अवघड नव्हते काय?
सुखासुखी कोणी स्थलांतर करीत नाही. अगदी प्राणी किंवा पक्षीसुध्दा विशिष्ट कारणाशिवाय मैलोन् मैल प्रवास करून स्थलांतर करीत नाहीत. मग माणूस तरी का करेल? फायदा किंवा नाईलाज ही दोन सबळ कारणे!
करोनाने उद्‍भवलेल्या परिस्थितीत अनिच्छेने लोकांनी गावे सोडली. कोणी मूळ गावी गेले तर कोणी गाव बदलले.या परिस्थितीमुळे लोकांच्या मनातील भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळच्या आठवणींना जागे केले. आपत्तीनंतर स्थलांतर हा जगरहाटीचा नियमच आहे. पुन्हा दुसरीकडे बस्तान बसवायचं. पुनःश्च हरी ओम्" ...म्हणत उमेदीने काही करू लागायचं.
फाळणीच्या वेळी सुध्दा असेच झाले. दोन्ही बाजूंनी निर्वासितांचे लोंढे वहात होते. कोणी अर्ध्या वाटेत एकमेकांना भिडले, कोणी वाटेतच गळाठले, संपले. कोणी सीमेपलीकडे पोहोचले. पण स्थलांतर सोपे नव्हतेच. चिंतेचे मोहोळ सर्वदूर पसरलेले!
त्यावेळचा स्वानुभव प्रसिद्ध अभिनेत्री आणि नर्तिका हेलन यांनी एका मराठी कार्यक्रमात सांगितला. त्या लहान होत्या. आई प्रेग्नंट होत्या. अशा परिस्थितीत वडील कुटुंब बरोबर घेऊन चालत निघाले. वाटेत खाण्यापिण्याचे हाल झाले. पोट भरण्यासाठी वाटेवरचे गवत आणि फुलेसुध्दा खाल्ली!! अशी वेळ कोणावर कधीच येऊ नये.
मी फक्त पायपीट, क्लेशकारक प्रवास या मुद्यांसाठी फाळणीच्या वेळच्या अनुभवांशी साम्य दाखवले इतकेच. एरवी बाकी गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत हेही येथे नमूद करते.
वर कितीतरी नकारात्मक बोलून झाले. पण आपण पूर्ण नकारात्मक व्हायला नको. फसवणूक, आर्थिक कोंडी, मानसिक कोंडी हे आयुष्याचे काही कंगोरे दिसले.. तरी या काळात नाण्याची दुसरी बाजू आपणा सर्वांना दिसली आणि अजूनही दिसत आहे. कारण आपत्ती हटायलाच तयार नाही.
दुसरी बाजू म्हणजे संकटकाळात मिळालेली मदत! मग ती सरकारी असो किंवा बिनसरकारी... आपत्तीग्रस्त माणसांपर्यंत पोहोचताना दिसत आहे. कुठे अन्न तर कुठे पाणी, कुठे औषधोपचार तर कुठे खचलेल्या मनाचे समुपदेशन कुठे कायद्याची अंमलबजावणी चोख झाली आणि होत आहे. हेही नसे थोडके! माणुसकीचे दर्शन खूप ठिकाणी झाले.
तेव्हा देव पावला, देव भेटला असे वाटत असणारच की! जणूकाही पंढरपूरचा विठोबा आला. पोलीस डॉक्टर समाजसेवी संस्थांच्या रूपाने असे नक्कीच चांगले, माणुसकी राखणारे, अनुभव आले. यंदा पंढरपूरची वारी नाही झाली. दिंड्या निघाल्या नाहीत. पालख्या निघाल्या नाहीत. एव्हढेच काय पण सर्वच देवांच्या यात्रा जत्रा, महोत्सव रद्द झाले. सर्वच धर्मीयांचे सण झाले नाहीत. होणार नाहीत. म्हणून माणसांच्या मनात हळहळ, रुखरुख वाटते खरी! विठ्ठलाची वारी चुकली. वारकऱ्यांचे मन खट्टू झाले.
पण करोनाच्या पार्श्वभूमीवर लाखो जणांनी वारी सारखीच पायपीट केली. कुटुंबाची पालखी खांद्यावर घेऊन परिस्थितीने ती वारी घडवून आणली. खरे कोणत्याच परिस्थितीत पंढरपूरची वारी न चुकवणाऱ्या वारकऱ्याला मात्र विठोबाचे दर्शन घेता आले नाही, तरीपण माणसातला देव जागोजागी पाहायला मिळाला आणि बघणाऱ्याला वारी पूर्ण झाली असे वाटले. हा सारा काळाचा महिमा असेच आपण म्हणू शकतो. त्या माणसातील देवांना साष्टांग दंडवत...!

संबंधित बातम्या